Crop Damage:पीक नुकसानीचे क्षेत्र दाखविले कमी

अतिवृष्टी (Excessive Rain) व सततच्या पावसामुळे (Continuous Rain)नदी-नाल्यांच्या पातळीत वाढ होत पूर परिस्थिती निर्माण झाली. यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले.
Crop Damage
Crop DamageAgrowon

नागपूर : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून करण्यात आले. शासनाकडून दोन हेक्टरच्या मर्यादेत नुकसानीची मदत मिळते. त्यामुळे दोनपेक्षा अधिक हेक्टरमध्ये नुकसान असतानाही फक्त दोन हेक्टर गृहीत धरण्यात आले. त्यामुळे नुकसानीचे क्षेत्र रेकॉर्डवर कमी आले आहे.

अतिवृष्टी (Excessive Rain) व सततच्या पावसामुळे (Continuous Rain)नदी-नाल्यांच्या पातळीत वाढ होत पूर परिस्थिती निर्माण झाली. यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. नागपूर जिल्‍ह्यात १ लाख १४ हजार, तर नागपूर विभागात ४ लाख ७७ हजार हेक्टरमध्ये पिकांचे नुकसान झाल्याचे प्रशासनाच्या अहवालात दर्शविण्यात आले. प्रत्यक्षात या पेक्षा जास्त क्षेत्रात पिकांचे नुकसान असल्याचे सांगण्यात येते.

शासनाच्या निकषानुसार, शेतकऱ्यांकडील असलेल्या कितीही हेक्टरमधील पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले असले तरी दोन हेक्टरच्या मर्यादेतच मदत देण्यात येते. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करताना शेतकऱ्याकडे चार हेक्टर क्षेत्र असून सर्व पिकांचे नुकसान झाले असताना फक्त दोनच हेक्टरमधील पिकांचे नुकसान ‘रेकॉर्ड’वर गृहित धरण्यात येते. एक वरिष्ठ अधिकाऱ्याने याच प्रकारे सर्वे करण्यात येत असल्याचे सांगितले. परंतु यामुळे शेती पिकांच्या नुकसानीचे क्षेत्र ‘रेकॉर्ड’वर कमी येते. एकूण क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीचे क्षेत्र हे प्रशासनाकडून दाखविण्यात आलेल्या आकड्यांपेक्षा जास्त असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे.

प्रशासनासाठी सोयीचे

दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत मिळत असल्याने मदत निधीचा आकडा तयार करून शासनाकडे पाठविणे प्रशासनाच्या दृष्टिकोनातून सोयीचे होते. आपल्या सोयीसाठी प्रशासनाकडून संपूर्ण हेक्टरमधील नुकसानीचा आकडा गोळा न करता फक्त दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी हेक्टरमधील पिकांचा आकडा गोळा करण्यात येतो.

नुकसानीची तीव्रता दिसते कमी

नुकतेच केंद्राचे पथक पाहणी करून गेले. त्यानंतर प्रशासनाकडे नुकसानीची माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांकडील संपूर्ण जमिनीचे नुकसान दर्शविले असते तर नुकसानीचा आकडा हा जास्त दिसून आला असता. त्यामुळे केंद्राच्या पथकाला नुकसानीची तीव्रता अधिक जाणवली असती, असे जाणकार शेतकऱ्यांनी सांगितले.

प्रशासनाच्या पद्धतीमुळे पिकांच्या नुकसानीचे खरे क्षेत्र समोर येत नाही. त्यामुळे ही पद्धत बदलली गेली पाहिजे. सर्व क्षेत्राची माहिती गोळा केली पाहिजे. नुकसान भरपाईच्या रकमेतही वाढ करायला हवी.

राजानंद कावळे, शेतकरी नेते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com