
टाकरवण, जि. बीड ः जगण्याचे साधन बनलेला लोहारकीचा व्यवसाय (Lohar Business) आधुनिक युगात अडचणीत सापडला आहे. शासनाकडून समाजाची अवहेलना होत असल्याने प्रगत पिढी या व्यवसायाकडे कानाडोळा करीत आहे. परिणामी हा व्यवसाय व कला सांभाळणारी पिढी दिवसेंदिवस कमी-कमी होत असल्याचे विदारक चित्र सध्या ग्रामीण भागात बघायला मिळत आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे (Modern Technology) विविध उत्पादित अवजारांमुळे या पारंपरिक व्यवसायाला खीळ बसली असून हा व्यवसाय संकटात सापडला आहे.
हस्तकलेला जास्तीचा भाव उरला नाही. पर्यायाने वडिलोपार्जित कला लोप पावण्याच्या मार्गावर आहे. या बांधवांच्या उपजीविकेचे परंपरागत साधन म्हणजे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी आणि घरगुती उपयोगाची लोखंडाची साहित्ये, अवजारे बनविणे. या व्यवसायात महिलांचे मोठे योगदान आहे.
त्यासाठी भट्टी लावणे, तप्त लाल लोखंडावर घण मारणे, ग्राइंडर मशीन नसल्यास कानसीने जोर लावून हत्यारे घासणे, बनवलेली हत्यारे-अवजारे आसपासच्या गावांतील आठवडी बाजारात जाऊन विकणे ही कामे महिलाच करतात.लोखंडी अवजारे बनविण्याकरिता चामडी भाता व भाता ओढण्यासाठी महिला किंवा मुलांचे सहकार्य घेतात. ऐरण, घन, वासला, आरी, पटास, कानस, सांडशी घेऊन लोखंडाला आकार देत शेती अवजारे तयार करून संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह यावरच सुरू असतो.
दोन मुले व पत्नीला घेऊन लोहारकीच्या व्यवसायानिमित्त गाव सोडून ६ ते ७ महिने बाहेरगावीच असतो. आज या गावात तर उद्या दुसऱ्या गावात ही भटकंती ठरलेली आहे. सहा महिने गावात तर सहा महिने बाहेर असल्याने मुलींच्या शिक्षणाची अडचण होते.
- आकाश सोळंके, व्यावसायिक
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.