Pune News : प्रशासकीय पारदर्शकता, सुधारणा आणि नवनवीन प्रयोगांमधून राज्याच्या साखर उद्योगाला दिशा देणारे साखर आयुक्त शेखर गायकवाड मंगळवारी (ता. ३१) निवृत्त होत आहेत. शेतकरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी निवृत्तीनंतर कार्यरत राहण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे.
साखर आयुक्त श्री. गायकवाड व साखर संचालक उत्तम इंदलकर यांच्या निवृत्तीनिमित्ताने मंगळवारी दुपारी चार वाजता साखर आयुक्तालयात निरोप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव उमेशचंद्र सरंगी या वेळी उपस्थित राहणार आहेत. श्री. गायकवाड यांनी लिहिलेल्या ‘साखर उद्योगातील सुधारणा’ तसेच ‘भारताच्या साखर उद्योगाची कायदेशीर चौकट’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन या वेळी होणार आहे.
भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) प्रशासकीय चौकटीत राहून कृषी, महसूल व ग्रामविकास विषयक समस्या सोडविणारा लोकप्रिय अधिकारी म्हणून श्री. गायकवाड यांनी गेल्या ३६ वर्षांत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या.
महसूलविषयक कायद्यांचा त्यांनी सखोल अभ्यास करीत या कायद्यांमधील तरतुदी लोकांपर्यंत पोहोचविल्या. सोप्या भाषेत महसुली कायद्यांवर लेखन करून राज्यातील शेतकऱ्यांना सातबारा उतारा कसा सांभाळावा याविषयी भरपूर प्रबोधन त्यांनी केले.
साखर आयुक्त म्हणून गेल्या चार वर्षांत त्यांनी साखर आयुक्तालयाच्या बाह्य इमारतीपासून अंतर्गत कामकाजात सुधारणा घडवून आणल्या. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे संताप व्यक्त करणारे केंद्र अशी वर्षानुवर्षे साखर आयुक्तालयाची असलेली ओळख श्री. गायकवाड यांनी पुसून काढली. शेतकऱ्यांच्या दृष्टीने सर्वांत मोठी बाब म्हणजे त्यांनी सतत पाठपुरावा करीत गेल्या तीन वर्षांत १०० टक्के एफआरपी अदा करण्यात यश मिळवले.
एफआरपी थकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या ६३ कारखान्यांविरोधात महसूल वसुली प्रमाणपत्र (आरआरसी) कारवाई केली. वेळेत एफआरपी देणाऱ्या साखर कारखान्यांची यादी तयार करणे सुरू केले.
नेमका किती तोडणी व वाहतूक खर्च कारखाने आकारतात याचीही यादी प्रसिद्ध करणे सुरू केले, शासकीय रकमांची वसुली, साखर उद्योगाच्या सुधारणांसाठी अभ्यासगट नेमले, यातून कारखान्यांची आर्थिक क्षमता सुधारली. त्यामुळे देशाच्या साखर उद्योगात राज्याला प्रथम स्थान मिळाले आहे.
शेतकऱ्यांसाठी लिहिणे हा माझा ध्यास
शेतकऱ्यांसाठी मी सतत लिहितो आहे. या लेखनातून शेतकरी वर्गात जागृती, हुशारी, समृद्धी, प्रबोधन होत असल्याचा मला आनंद आहे. ‘अॅग्रोवन’च्या माध्यमातून राज्यातील लाखो शेतकऱ्यांपर्यंत जाता आल्याचे समाधान मला आहे.
हे राज्य शेतकऱ्यांच्या श्रमातून घडते आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी सतत लिहिणे हा माझा ध्यास आहे,’’ असे भावनिक उद्गार श्री. गायकवाड यांनी ‘अॅग्रोवन’शी बोलताना काढले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.