
Water Shortage News अलिबाग : जलजीवन मिशन अंतर्गत २०२४ पर्यंत प्रत्येक घरात नळ जोडणी देऊन पाणीटंचाई कमी करण्यासाठी साडेआठशे कोटी रुपये रायगड जिल्ह्यात खर्च केले जाणार आहेत; मात्र, या योजनेचे संथगतीने सुरू असलेले काम आणि कामाच्या दर्जामुळे पाणी टंचाई संकट दूर होण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे.
याबाबत समग्र विचार करून जिल्हा परिषदेने संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी ७ कोटी रुपयांचा आराखडा तयार करून मंजुरीसाठी वरिष्ठ स्तरावर सादर केला आहे.
पाणीटंचाई निवारणासाठी आराखड्यात एक हजार ३२८ गावे-वाड्यांमध्ये उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. जलजीवन मिशनअंतर्गत ही पाणी टंचाई कमी होईल, अशी आशा नागरिकांना होती, मात्र, कामाचा वेग आणि दर्जामुळे ही आशाही धूसर झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्हा परिषदेच्या टॅंकरची वाट पाहावी लागणार आहे.
जलजीवन मिशनअंतर्गत १,४४४ योजनांसाठी ८६६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या योजनेंतर्गत प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
पाणीपुरवठा विभागाकडून योजनेवर काम सुरू आहे; परंतु कामातील अनियमितता आणि दिरंगाईमुळे योजना निकृष्ट दर्जाच्या होत असल्याची ओरड नागरिकांची आहे.
कंत्राटदारांनी जलवाहिन्या टाकल्या असल्या तरी जलस्त्रोतात पुरेशे पाणीच नसल्याने आतापासूनच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या असून आराखडा तयार केला आहे.
उपाययोजनांवर भर
आराखड्यात १ हजार ३२८ गावे-वाड्यांवर विहिरींची खोली वाढवणे, त्यातील गाळ काढणे, टंचाईग्रस्त गावांना टँकर, बैलगाडीच्या माध्यमातून पाणी पुरवठा करणे, नवीन विंधन विहीर खोदणे, अस्तित्वात असलेल्या विंधन विहिरींची दुरुस्ती करणे, नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती करणे या उपाययोजना प्रस्तावित आहेत.
८६६ कोटी रुपये
जलजीवन मिशनअंतर्गत १,४४४ योजनांसाठी खर्च होणार
दरवर्षी कोट्यवधींचा खर्च
जिल्हा परिषदेकडून दरवर्षी पाणीटंचाई निवारणासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, मात्र ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याने केलेला खर्च वाया जात असल्याचे दिसून येते.
जिल्हा परिषदेच्या आराखड्यावर दृष्टिक्षेप
उपाययोजना गावे वाड्या अपेक्षित खर्च
विहिरी खोल करणे गाळ काढणे ३१ ४४ ८० लाख ७ हजार
टँकर, बैलगाडीने पाणी पुरवठा २५८ ६८८ ३ कोटी ४४ लाख
नळ पाणी योजना दुरुस्ती २२ १ १ कोटी १९ लाख
नवीन विंधन विहिरी ७० १३७ १ कोटी ९० लाख
विंधन विहिरी दुरुस्ती ३४ ४३ २७ लाख ४९ हजार
जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई निवारण्यासाठी आराखडा तयार केला आहे. पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी आतापासूनच पाण्याचा वापर जपून करावा, अपव्यय टाळावा, पिण्याच्या पाण्याच्या मुख्य स्रोतांव्यतिरिक्त परिसरातील इतर उपलब्ध स्त्रोतांमधील पाण्याचा दैनंदिन वापरासाठी वापर करावा, पाणी स्रोत दूषित होणार नाहीत, याची सर्वांनी काळजी घ्यावी. कुठे जलवाहिनी फुटल्यास त्वरित निदर्शनास आणून द्यावी.
- डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.