
Agrowon Agricultural Exhibition 2023: गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या औरंगाबाद येथील सकाळ-ॲग्रोवनच्या कृषी प्रदर्शनात राज्यभरातील शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यातही मराठवाड्यातील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक राहिली.
दुग्धव्यवसाय विषयक विविध माहिती, सेंद्रिय शेतमाल उत्पादन (Organic Farming Production) , त्याचे ‘मार्केटिंग’ (Marketing) , शेतीतील ‘हायटेक’ तंत्रज्ञान यासारख्या विविध तंत्रज्ञानाची माहिती आणि काही प्रात्यक्षिकेही इथे पाहायला मिळाली. त्यामुळे आम्हाला शाश्वत, नव्या शेतीची दिशा आणि समाधानही मिळाल्याच्या भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातून चारही दिवस कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा ओघ कायम राहिला. या प्रदर्शनामध्ये शेतीविषयक विविध माहिती देणारी दालने उभारली आहेत.
यात शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा मागोवा घेतला. पुणे, नागपूर, नाशिक अशा ठिकाणी दर्जेदार कृषी प्रदर्शने भरतात. मात्र असे प्रदर्शन औरंगाबाद येथेच भरल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना विविध तंत्राची माहिती अवगत करण्याची संधी या निमित्ताने मिळाली.
मराठवाड्यातील मुख्य पिके असलेल्या सोयाबीन, कपाशी, ज्वारी या पिकांच्या माहितीचा खजिना उपलब्ध झाला.
त्यासोबतच आधुनिक शेती पद्धतीत घ्यावयाची पीक पद्धती, हरितगृहातील पिके, नियंत्रित शेती, सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब असे ज्ञानाचे दालनच खुले झाले.
शेतकरी कुटुंबीयांसमवेत हजेरी लावून प्रत्येक दालनात आवर्जून थांबून माहिती घेत होते. सेंद्रिय पद्धतीच्या उत्पादनाकडे, त्यातील तंत्राकडे शेतकऱ्यांचा कल अधिक राहिला.
पीक पद्धतीमध्ये मजुरांची समस्या कमी करण्यासाठी विविध प्रकारच्या अवजारांची माहिती मिळाल्याची प्रतिक्रिया अंजनडोह (ता. जि.औरंगाबाद) येथील संतोष शेजुळ यांनी दिली.
शेती उत्पादन वाढविण्यासाठी या प्रदर्शनाचा फायदा होणार आहे असे ते म्हणाले. त्याचबरोबर सौर ऊर्जेबाबत माहिती तसेच शेतमाल प्रक्रिया उद्योग स्थापन करून त्यातील संधी कशा उपलब्ध आहेत याविषयी माहिती मिळाल्याचे ते म्हणाले.
रेशीम उद्योग, फळबाग लागवड या संदर्भात तज्ज्ञ शेतकऱ्यांकडून मिळालेले मार्गदर्शन फायदेशीर ठरल्याचे गणेशवाडी (ता. गंगापूर, जि.औरंगाबाद) येथील अशोक जाधव यांनी सांगितले.
कपाशी पिकावर येणाऱ्या गुलाबी बोंडअळीचा बंदोबस्त कसा करावा याची महत्त्वपूर्ण माहिती मिळाल्याचे लाडगाव (ता.जि. औरंगाबाद) येथील अशोक बागल यांनी सांगितले.
एकूणच आमच्या भागातील शेतीला महत्त्वाची दिशा देणारे तंत्रज्ञान प्रदर्शनातून मिळाली. आम्ही समाधानी झालो अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.