Turmeric process : फिरता हळद प्रक्रियेचा जुगाड बनला कुटुंबाचा आधार !

एकांबा (जि.वाशीम) येथील शिवाजी दशरथ कुऱ्हे यांनी हळद विक्रीसाठी स्वतःच्या संकल्पनेतून प्रक्रिया यंत्रणा तयार केली. यामुळे थेट ग्राहकांच्या दारात जाऊन मागणीनुसार हळद तयार करून दिली जाते.
Turmeric process
Turmeric processAgrowon

एकांबा (जि.वाशीम) येथील शिवाजी दशरथ कुऱ्हे (Shivaji Dashrath Kurhe) यांनी हळद विक्रीसाठी स्वतःच्या संकल्पनेतून प्रक्रिया यंत्रणा तयार केली. यामुळे थेट ग्राहकांच्या दारात जाऊन मागणीनुसार हळद तयार करून दिली जाते. दुचाकी-ट्रॉली-चक्की या यंत्रणांचा कल्पनेने वापर करत त्यांनी फिरता (Turmeric process) तयार केला. तसेच मिरची पावडर (Chilli powder) तयार करण्याची यंत्रणाही त्यांनी याच पद्धतीने विकसित केली आहे.

दुचाकी-ट्रॉली-चक्की या तिन्ही साधनांना जोडून केलेला अभिनव जुगाड एका अत्यल्पभूधारक शेतकऱ्याच्या कुटुंबाचा आर्थिक आधार बनला आहे. मूळचे वाशीम जिल्ह्यातील एकांबा येथील रहिवासी, मात्र दोन वर्षांपासून औरंगाबाद शहरात राहत असलेल्या या कल्पक शेतकऱ्याचे नाव आहे शिवाजी दशरथ कुऱ्हे. घरच्या शेतीत उत्पादित होणारी हळकुंडे या फिरत्या प्रक्रिया यंत्रणेच्या साह्याने प्रक्रिया करून हळद विकण्याचे तसेच प्रसंगानुरूप इतरांची हळद प्रक्रियेसाठी खरेदी करत त्यांनी व्यवसायाला चांगली गती दिली आहे.

Turmeric process
Turmeric Cultivation : हळदक्षेत्रात १४ हजार ६८२ हेक्टरने घट

या प्रवासाबाबत शिवाजी कुऱ्हे म्हणाले की, माझ्याकडे जवळपास सव्वा दोन एकर शेती आहे. गेल्या आठ वर्षांपासून या सर्व क्षेत्रावर मी हळदीच्या सेलम जातीची लागवड करतो. शेती व्यवस्थापनाची जबाबदारी माझी आई जिजाबाई सांभाळते. मी सध्या औरंगाबाद शहरात राहात असलो तरी हळद लागवड तसेच काढणीसाठी गावी जातो. पीक व्यवस्थापनाचे नियोजन आई सांभाळते.

Turmeric process
Turmeric : आवळा बागेत हळदीचे आंतरपीक

अडीच वर्षांपूर्वी पुण्यात एका मित्राच्या सल्ल्यावरून मी आठ किलो हळद तयार करून कुणी विकत घेईल म्हणून घेऊन गेलो होतो. तिथं हातोहात १५० रुपये प्रति किलोने हळद विकली गेली. त्यामुळे पुन्हा ७० किलो हळद साध्या पाकिटात पॅक करून विक्रीसाठी घेऊन गेलो. चाकण, पुणे शहरात थेट ग्राहकांना हळद विक्री करण्याचा प्रयत्न केला परंतु महिन्याला दहा ते पंधरा किलो पुढे विक्री होत नव्हती. साध्या पाकिटाचे पॅकिंग असल्याने हळदीच्या गुणवत्तेवर ग्राहक प्रश्न उपस्थित करायचे. त्यामुळे थेट ग्राहकांसमोरच आपल्याला हळद तयार करून देता येईल का ? हा विचार मनात सुरू झाला अन त्यातूनच फिरत्या हळद प्रक्रिया यंत्रणेचा देशी जुगाड मी तयार केला.

तयार केली हळद निर्मिती यंत्रणा ः

कुऱ्हे यांच्याकडे दुचाकी होती. त्याला ट्रॉली जोडण्याची व्यवस्था केली. ही ट्रॉली त्यांनी खास गुजरात वरून तयार करून घेतली. यासाठी जवळपास २० हजार रुपये खर्च आला. या ट्रॉलीमध्ये हळद दळण्याची चक्की आणि ती चालण्यासाठी इंजिन बसविले आहे. यासाठी जवळपास ३५ हजार रुपये खर्च आला. ५० हजारांची दुचाकी, ३५ हजारांची चक्की आणि इंजिन तसेच वीस हजाराची ट्रॉली असे जवळपास लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून ग्राहकांच्या समोर हळद दळून देण्याची फिरती यंत्रणा कुऱ्हे यांनी तयार केली. या यंत्रणेच्या माध्यमातून सुरवातीला त्यांनी काही दिवस वाशीम शहरात हळद विक्रीचे काम केले. परंतु मोठ्या शहरात या पद्धतीने दळलेली हळद घेणारे ग्राहक जास्त मिळतील म्हणून त्यांनी अमरावती गाठले. तेथे जवळपास सहा ते सात महिने हळकुंडावर प्रक्रिया करून हळद तयार करत गल्लीबोळात विक्रीचे काम केले. पुढे त्यांनी औरंगाबाद शहर गाठले.

मिळविली औरंगाबादची बाजारपेठ ः

कुऱ्हे यांनी स्वतः तयार केलेल्या फिरत्या हळद तयार करून देण्याच्या यंत्रणेसह जवळपास दीड वर्षांपूर्वी अमरावती वरून थेट औरंगाबाद गाठले. या शहरात गल्लीबोळात फिरून हळदीची विक्री करण्याचे काम सुरू केले. आता त्यांच्या या देशी जुगाडाद्वारे हळद तयार करून देण्याच्या फिरत्या प्रक्रिया उद्योगाला चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे ते सांगतात. शहरातल्या अनेक भागात आता

‘वाशीमच्या हळदीवाल्याची गाडी‘ अशी ओळख त्यांनी मिळवली आहे. हळद प्रक्रिया उद्योगात पत्नी राधिकासह, हळद उत्पादक शेतकऱ्यांची मदत होत असल्याचे कुऱ्हे सांगतात.

शहरात झाली राहण्याची सोय ः

सुरवातीला गावातून येऊन जाऊन औरंगाबाद शहरात हळदीची विक्री करणारे शिवाजी कुऱ्हे एके दिवशी औरंगाबाद शहरातील डॉ. गणेश बावस्कर यांच्या नजरेस पडले. एक शेतकरी हळद प्रक्रिया आणि विक्रीसाठी इतके प्रयत्न करतोय हे लक्षात घेऊन त्यांनी स्वतःच्या घराजवळील जागेत कुऱ्हे यांची राहण्याची सोय करून दिली. डॉ.बावस्कर यांनी राहण्याची सोय करून दिल्यामुळे कुऱ्हे त्यांचे कुटुंब औरंगाबाद शहरात घेऊन आले. आता अविनाश, वैजीनाथ ही दोन्ही मुले शहरातील चांगल्या शाळेत शिक्षण घेत असल्याचे शिवाजीराव सांगतात. पीक उत्पादनापुरते मर्यादित न राहता त्यावर प्रक्रिया करून विक्रीचा प्रयत्न एक शेतकरी स्व कल्पनेतून करीत असल्याचे पाहून आपण सहकार्य केल्याचे डॉ. बावस्कर सांगतात.

शेतकऱ्यांकडूनच हळकुंडाची खरेदी ः

शिवाजी कुऱ्हे यांना महिन्याला साधारणतः दहा क्विंटल हळकुंडे लागतात. स्वतःच्या शेतात उत्पादित होणाऱ्या हळकुंडाबरोबरच ते वाशीम जिल्ह्यातील गाव शिवारातील शेतकऱ्यांच्याकडून गरजेनुसार हळकुंडे खरेदी करतात. ही खरेदी करताना बाजाराचे दर पाहून जागेवरून शे-दोनशे जास्तीचा दर देऊन हळकुंडाची खरेदी केली जाते. त्यामुळे बरेच शेतकरी त्यांच्यासोबत जोडले गेले आहेत.अलीकडेच त्यांनी गावशिवारातील वैजनाथ इंगळे यांच्याकडून दहा क्विंटल हळकुंडे खरेदी केली आहे.

थेट ग्राहकांना हळदीची विक्री ः

शिवाजीराव थेट ग्राहकांच्या घरासमोर जाऊन हळद तयार करून देतात. त्यामुळे ग्राहकांना हळदीची खात्री पटते. तसेच शेतकऱ्यांकडून हळद खरेदी केल्याचे समाधानही मिळते. सध्याच्या काळात १८० रुपये प्रति किलो दराने हळदीची विक्री होते. औरंगाबाद शहरात दीड वर्षांपूर्वी जेव्हा हळद विक्री सुरू केली त्याचवेळी १५० रुपये प्रति किलो दराने हळद विक्री होत होती. मध्यंतरी पेट्रोलचे दर तसेच वाढता उत्पादन खर्च लक्षात घेऊन त्यांनी प्रति किलो २० रुपयांची दरवाढ केली. याशिवाय कोणी हळकुंड घेऊन आल्यास तीस रुपये प्रति किलो दराने हळद तयार करून दिली जाते.

पावसाळा, हिवाळ्यात दर दिवशी साधारणतः ३० ते ४० किलो हळदीची विक्री होते. उन्हाळ्यात दर दिवशी ७० ते ८० किलो हळद विकली जाते. विचारातून सुचलेले हळद प्रक्रियेचे देशी जुगाड आता कुटुंबाच्या उत्पन्नाचा प्रमुख आधार बनला आहे. दरमहा ३५ ते ४० हजारांची उलाढाल या फिरत्या हळद प्रक्रिया उद्योगातून होते. याचा विस्तार करताना आता आपण अशाच पद्धतीने ट्रॉलीमध्ये मिरची पावडर तयार करण्याची सोय लवकरच करणार असल्याचे शिवाजीराव सांगतात.

संपर्क ः शिवाजी कुऱ्हे, ९७६७३०६७५३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com