Top 5 News: खरिपात विक्रमी अन्नधान्य उत्पादन होणार?

यंदा देशात माॅन्सून वेळेवर दाखल होण्याचा अंदजा हवामान विभागाने वर्तविला. तसेच देशात सर्वसाधारण पाऊस पडेल, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने २०२२-२३ च्या खरीप हंगामात विक्रमी उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे.
Foodgrain production
Foodgrain productionagrowon

1. सूर्य चांगलाच तळपल्याने विदर्भ अक्षरश: होरपळून निघाला. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला, चंद्रपूर, वर्धा येथे उच्चांकी ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातही तापमान ४३ अंशांपार गेल्याने उन्हाचा चटका असह्य ठरत आहे. कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने राज्यात उन्हाच्या झळा तापदायक ठरत आहेत. यवतमाळ येथे ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जळगाव, परभणी, अमरावती, गोंदिया, नागपूर, वाशीम येथे तापमानाचा पारा ४३ अंशांवर पोहोचला. अनेक ठिकाणी तापमान ३३ ते ४३ अंशांच्या दरम्यान आहे.

2. भारतातून होणारी सोयापेंड (Soya cake)निर्यात २०२१-२२ मध्ये ७६.२१ टक्यांनी घटली. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या काळात देशातून १५ लाख ६४ हजार टन सोयापेंड निर्यात झाली होती. तर याच काळात २०२१-२२ च्या हंगामात ३ लाख ७२ हजार टन सोयापेंड निर्यात झाली. यापासून २२०६ कोटी रुपये मिळाले. तर २०२०-२१ च्या हंगामात ५८२५ रुपयांवर होती. भारतात सोयाबीन गाळप मार्जिन यंदा कमी राहत आहे. शेतकऱ्यांनी चांगल्या दराच्या अपेक्षेने यंदा सोयाबीन मागे ठेवले. त्यामुळे कमी गाळप होऊन सोयापेंडचे दर अधिक राहिले. वाढलेल्या दरामुळे भारतीय सोयापेंडला निर्यात पडतळ नाही. ब्राझीलची सोयापेंड ५७४ डाॅलर प्रतिटनाने मिळते. तर अर्जेंटीना ५८६ डाॅलरने सौदे करत आहे. मात्र भारतीय सोयापेंडचा दर ८४० डाॅलर प्रतिटनांवर आहे. परिणाणी भारतातून सोयापेंड निर्यात यंदा घटली.

Foodgrain production
खरिपात खतांची कमतरता भासणार नाही?


3. केंद्राने भात खरेदीस नकार दिल्यानंतर तेलंगणा सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी स्वतः खरेदी करणार आहे. रब्बी हंगामातील ६५ लाख टन भाताची (Rice)खरेदी होणार आहे. यासाठी तेलंगणा सरकारने १५ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले. राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा महामंडळाने ४ बँकांकडून हे कर्ज घेतले. खरेदीसाठी राज्यभरात ५ हजार केंद्रे सुरु आहेत. तर शुक्रवारपासून गावागावात खरेदी प्रक्रिया सुरु होणार असल्याचे तेलंगणाचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री जी. कमलाकर यांनी सांगितले. खरेदी केल्यानंतर आठवडाभरात संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यांत पैसे जमा करण्यात येणार आहेत. भातासाठी यंदा १९६० रुपये प्रति क्विंटल हमीभाव आहे.

4. केंद्र सरकार कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञान वापराला चालना देत आहे. सद्यःस्थितीत ड्रोनद्वारे कृषी रसायनांची फवारणी अपवाद वगळता अद्याप पूर्ण वापरात नाही. मात्र येत्या काळात या तंत्रज्ञानाचा वापर वाढण्याचे संकेत मिळाले. ड्रोन (Drone)फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात डीएफआयने याबाबत पत्रक प्रसिध्द केले. त्यानुसार ड्रोनद्वारे फवारणीसाठी ४७७ कीडनाशकांच्या वापरासाठी केंद्रिय कृषी मंत्रालय व ‘सीआयबीआरसी’कडून दोन वर्षांसाठी म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाची संमती देण्यात आल्याचे डीएफआयने(DFI) म्हटले. या कीडनाशकांमध्ये कीटकनाशके, बुरशीनाशके व वनस्पती वाढ नियंत्रके म्हणजेच पीजीआर यांचा समावेश आहे. संबंधित कृषी रसायनांचे ‘सीआयबीआरसी’कडे नोंदणीकरण असणे बंधनकारक आहे.

5. यंदा देशात माॅन्सून(Monsoon) वेळेवर दाखल होण्याचा अंदजा हवामान विभागाने वर्तविला. तसेच देशात सर्वसाधारण पाऊस पडेल, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने २०२२-२३ च्या खरीप हंगामात १६३.१५ दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले. २०२१-२०२२ च्या खरिपात केंद्र सरकारने १५०.५८ दशलक्ष टन धान्य उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले होते. प्रत्यक्षात गेल्या खरिपात १५३.५४ दशलक्ष टन धान्य उत्पादन झाले होते. यंदा सरकारला गेल्या खरीपातील उत्पादनापेक्षा १३ दशलक्ष टन अधिक उत्पादनाची अपेक्षा आहे. खरिप हंगामासाठी परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे खरिपात विक्रमी अन्नधान्य उत्पादन होईल, अशी आशा केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केला. ते खरीप परिषदेत बोलत होते. या खरिप हंगामात केंद्र सरकारने ११२ दशलक्ष टन भात खरेदीचे उद्दिष्ट ठेवले तर ४०.६० दशलक्ष टन तृणधान्ये, १०.५५ दशलक्ष टन कडधान्य उत्पादनाची अपेक्षा आहे. तेसच २६.८९ दशलक्ष टन तेलबिया उत्पादन होईल, असाही अंदाज केंद्र सरकारने व्यक्त केला. या खरिपासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना तेलबिया लागवडीचे क्षेत्र वाढवण्याचे आवाहन केले. कर्नाटकातील तेलबिया लागवडीचे क्षेत्र सातत्याने घटत चालले आहे. १९९३-१९९४ मध्ये कर्नाटकात २६.६८ लाख हेक्टरवर तेलबिया पिकांची लागवड होती. तर २०२०-२०२१ तेलबिया पिके २.२६ लाख हेक्टर होती. देशाच्या शेतीमाल उत्पादनात वाढ झाल्याने निर्यातही वाढली. त्यामुळे जागतिक बाजारातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनांच्या गुणवत्तेवर भर देण्याची गरज आहे, असे कृषिमंत्री तोमर म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com