‘ऑपरेशन लोटस’चे सूत्रधार जळगावकर नेते

शिवसेनेचे आमदार फोडून महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनासाठी भारतीय जनता पक्षातर्फे ‘ऑपरेशन लोटस’ राबविण्यात येत आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeAgrowon

जळगाव : शिवसेनेचे आमदार फोडून महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनासाठी भारतीय जनता पक्षातर्फे ‘ऑपरेशन लोटस’ (Operation Lotus) राबविण्यात येत आहे. त्याचे मुख्य सूत्रधार भाजपचे प्रदेशाध्यक्ष व नवसारीचे (गुजरात) खासदार सी. आर. पाटील (C. R. Patil) म्हणजेच चंद्रकांत रघुनाथ पाटील हे आहेत. ते मूळचे जळगावकर आहेत. याच वेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे निकटवर्तीय गिरीश महाजन हेदेखील सक्रिय आहेत. (Political crisis In Maharashtra)

शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी बंड केले. सर्व आमदार रातोरात सुरत येथील ली मेरिडियन हॉटेल येथे दाखल झाले आहेत. या आमदारांत जळगाव जिल्ह्यातील तीन आमदार असल्याची चर्चा आहे. या तिन्ही आमदारांचे मोबाईल नॉट रिचेबल आहेत.

यातच ऑपरेशन लोटसची सूत्रे खासदार सी. आर. पाटील यांच्याकडे हलत आहेत. बंड केलेले आमदार सुरतेत दाखल झाल्यानंतर लागलीच खासदार पाटील संबंधित हॉटेलात पोहोचले. दोन तास ते तेथे थांबून होते. खासदार पाटील काही महिन्यांपासून शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील शिवसेना आमदार किशोर पाटील व पारोळा येथील शिवसेना आमदार चिमणराव पाटील व इतर सर्वपक्षीय नेत्यांशी खासदार पाटील यांचे सख्य आहे.

खासदार सी. आर. पाटील हे मूळ जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्री अकाराऊत हे त्यांचे मूळ गाव आहे. याच तालुक्यात त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाले आहे. पुढे ते कामानिमित्ताने गुजरात येथे गेले. गुजरातेत पोलिसात नोकरी केली. विविध व्यवसाय केले. नंतर तेथे राजकारणात ते सक्रिय झाले. भाजपसोबत अनेक वर्षे ते आहेत. धुळे जिल्ह्यात भाजप भक्कम करण्यातही त्यांचा वाटा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे ते विश्वासू आहे. आजही त्यांचा जळगावशी संबंध आहे. पिंप्री अकाराऊत येथे त्यांची शाळा तर जळगाव शहरात आदर्श नगरात त्यांचे घर आहे.

तसेच गिरीश महाजन यांच्यावर राज्यसभा व विधानपरिषद निवडणुकीची विशेष जबाबदारी सोपविण्यात आली होती. ती त्यांनी समर्थपणे सांभाळली. आता ऑपरेशन लोटसमध्येही ते सक्रिय असल्याची माहिती आहे. महाजन हे जामनेर मतदारसंघातून सलग पाच वेळेस निवडून आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता ते भाजपचा नेता, असा त्यांचा प्रवास आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com