
अकोला ः शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटच नाही तर त्यापेक्षा अधिक करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. आपल्यालाही सकस अन्नधान्याचेही उत्पादन (FoodGrain production) करावे लागेल. यासाठी गो आधारित प्राकृतिक शेती हवी. ही जीवनपद्धती रुजली पाहिजे, असे आवाहन माजी कृषिमंत्री तथा खासदार डॉ. अनिल बोंडे (Dr. Anil Bonde) यांनी केले.
येथे डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त पाच दिवशीय कृषी प्रदर्शनाचे मंगळवारी (ता.२७) उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. बोंडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. शरद गडाख होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता अढाऊ, विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे, जैविक मिशनचे संचालक संतोष आळसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरलीधर इंगळे, प्रकल्प संचालक आरिफ शहा, शिक्षण विस्तार संचालक डॉ. उंदिरवाडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
डॉ. बोंडे म्हणाले, ‘‘पंजाबराव देशमुखांनी संपूर्ण आयुष्यात शेतकरी हिताचा विचार अंगीकारला. त्यांच्यामुळे शेतीला दिशा मिळाली. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी आता केंद्र सरकारही ठोस प्रयत्न करीत आहे. देशात १० हजार शेतकरी कंपन्या तयार केल्या जात आहेत. केंद्र सरकार अॅग्री स्टार्टअपला प्रोत्साहन देत आहे. अॅग्रो बिझनेस मॅनेजमेंट आणि मार्केट उपलब्ध करून देणे हे सुद्धा आपले काम आहे. शेती उन्नत झाली पाहिजे आणि शेतकरी समृद्ध झाला पाहिजे हे मूळ ध्येय आहे. त्यादृष्टीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ निश्चितपणे वाटचाल करेल,’’ अशी अपेक्षाही डॉ. बोंडे यांनी व्यक्त केली.
डॉ. गडाख म्हणाले, या विद्यापीठाने विविध पीकवाण, तंत्रज्ञान निर्माण करण्यात मोलाचा वाटा उचलेला आहे. पीडीकेव्ही डाळमिल देशभरात प्रसिद्ध आहे. विस्ताराचे काम जोमाने पुढे जात आहे. विद्यापीठाचे वाण, यंत्रे स्थानिक पातळीवरच मिळण्यासाठी आता संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्रस्तरावर सोय करीत आहोत. विदर्भातील ११ जिल्ह्यात १ जानेवारीपासून मॉडेल व्हिलेजचे काम सुरू होत आहे. ११ मॉडेल व्हिलेजमध्ये बेसलाईन सर्वेक्षण केले जाईल. तीन वर्षांत उत्पादन ते मार्केटिंग मॉडेल तेथे उभे केले जाईल. बीजोत्पादनासाठी विद्यापीठाने ३१० शेतकरी कंपन्यांसोबत करार केला आहे. विद्यापीठाअंतर्गत आयडॉल निवडून त्यांचे दोन महिन्यांच्या काळासाठी फलक संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्रस्तरावर लावले जाईल,’’ असेही डॉ. गडाख म्हणाले.
तत्पूर्वी संगीता अढाऊ यांनी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, असे सांगून शेतकऱ्यांची सध्याची अवस्था मांडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. डी. बी. उंदिरवाडे यांनी केले. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले. भरडधान्यापासून तयार केलेला केक कापून मिलेट वर्षाचे स्वागतही यावेळी करण्यात आले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.