नाशिक : ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी शेतीवर आधारित उद्योगधंदे वाढीस लागणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्थानचे संचालक डॉ. लाखन सिंग (Dr. Lakhan Singh) यांनी केले.
पंतप्रधान स्व. चौधरी चरणसिंग यांचा जन्मदिन ‘किसान दिवस’ म्हणून दरवर्षी २३ डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कृषी विज्ञान केंद्रामार्फत भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मृदा शास्रज्ञ डॉ. बिरेंद्र कुमार उपस्थित होते. अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्रज्ञ तथा प्रमुख डॉ. नितीन ठोके हे होते.
डॉ. सिंग म्हणाले, की शेती आणि शेतीव्यवसायावर अवलंबून असणारी लोकसंख्या आपल्या देशात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सर्वांगीण विकासासाठी ‘शेती विकास’ हाच मूलमंत्र आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीला सरकार प्राधान्य देत असते. शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून उत्पादन व उत्पन्न वाढवावे असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. ठोके म्हणाले, की जिल्ह्याच्या आदिवासी भागात विद्यापीठाच्या एकात्मिक शेती प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर काम करण्यात येत आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञान अवलंब करून शेतकऱ्यांना अभ्यासनासाठी खुले करून देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना तंत्रज्ञान पुरविण्यासाठी विद्यापीठाचे कृषी विज्ञान केंद्र नेहमीच तत्पर असून याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी ‘कृषी क्षेत्रात स्वयंरोजगाराच्या संधी’ याविषयावर तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. ‘मशरूम उत्पादन व विक्री व्यवस्थापन’ या विषयावर सिद्धार्थ मशरूम्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पवार यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच ‘शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत शेळीपालनाचा यशस्वी प्रयोग’ याविषयावर युवा मित्र संस्थेच्या कार्यकारी संचालक मनीषा पोटे यांनी मार्गदर्शन केले. मेळाव्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन कृषी विज्ञान केंद्राचे कृषिविद्या विशेषज्ञ डॉ.प्रकाश कदम यांनी केले, तर पशुवैद्यकशास्र विशेषज्ञ डॉ. श्याम पाटील यांनी आभार मानले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.