Cotton Rate : पूर्वहंगामी कापूस काळवंडू लागला

मागील चार-पाच दिवस खानदेशातील कापूस पट्ट्यात अतिपाऊस झाला आहे. सततच्या पावसाने उमललेल्या बोंडांत कोंब तयार झाले आहेत. तर पक्व कैऱ्या काळवंडून त्यांचे १०० टक्के नुकसान झाले आहे.
Cotton
CottonAgrowon

जळगाव ः मागील चार-पाच दिवस खानदेशातील कापूस पट्ट्यात (Cotton Belt) अतिपाऊस (Heavy Rain In Cotton Belt) झाला आहे. सततच्या पावसाने उमललेल्या बोंडांत कोंब (Boll Sprouting) तयार झाले आहेत. तर पक्व कैऱ्या काळवंडून त्यांचे १०० टक्के नुकसान (Cotton Crop Damage) झाले आहे.

Cotton
Cotton Rate : कापूस दर आवाक्यात, तरीही उद्योगांकडून उठाव का नाही?

खानदेशात सुमारे २५ महसूल मंडलांत अतिवृष्टीदेखील झाली आहे. जळगाव जिल्ह्यात भोकर, पिंप्राळा (ता. जळगाव), चोपड्यातील अडावद आदी भागात अतिपाऊस झाला. तसेच पाचोरा, जामनेर, अमळनेर, चोपडा, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव आदी भागात कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे. मे अखेरीस लागवड केलेल्या पूर्वहंगामी (बागायती) कापूस पिकाची मोठी हानी झाली आहे.

या पिकात एका झाडावर ५० ते ८० कैऱ्या पक्व होत्या. काही शेतकऱ्यांनी मागील पंधरवड्यात उघडीप असताना कापूस वेचणीदेखील उरकली. काही शेतकऱ्यांच्या पिकात बोंडे उमलत असतानाच पाऊस सुरू झाला. एका झाडावर किमान १५ ते २० बोंडे उमलली होती. ही बोंडे काळवंडून त्यांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. कारण त्यात कोंबही आले आहेत. त्याची वेचणी करणे शक्य नाही. कारण खरेदीदार ही बोंडे घेणार नाहीत. अशातच पाऊस सुरूच आहे. यामुळे हे नुकसान वाढत आहे. पावसाने फुले, पाते गळ वाढली आहे. स्वच्छ सूर्यप्रकाशीत वातावरणाची नितांत गरज आहे. परंतु रोज पाऊस, ढगाळ वातावरण अशी स्थिती आहे.

Cotton
Cotton Meet : जळगावात उद्यापासून कापसावर मंथन

खानदेशात सुमारे नऊ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यात पाच लाख ६७ हजार हेक्टरवर कापूस पीक आहे. यात सुमारे एक लाख २० हजार हेक्टरवर पूर्वहंगामी किंवा बागायती कापूस पीक आहे. धुळे व नंदुरबारात मिळून साडेतीन लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे. यात सुमारे ५० हजार हेक्टरवर पूर्वहंगामी कापूस पीक आहे. या पूर्वहंगामी कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे.

तापी, गिरणा, अनेर, पांझरा, सुसरी, गोमाई, वाघूर, अंजनी आदी नदीकाठच्या काळ्या कसदार जमिनीत कापूस पिकाची स्थिती दिवसागणिक बिकट बनत आहे. सखल भागात पाणी साचल्याने यात पीक पुरते हातचे गेले आहे. पीक मागील १० दिवसांपूर्वी जोमात दिसत होते. पण तोंडी आलेला घास अतिपावसाने हिरावून घेतला आहे. फक्त हलक्या, मध्यम जमिनीतील १० ते २० जून या दरम्यान लागवड केलेले कापूस पीक बरे आहे. जुलैत लागवड केलेल्या कापूस पिकाची स्थितीही हवी तशी चांगली नाही. कारण अतिपावसात त्याची वाढ खुंटल्याचे दिसत आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

माझा १० एकर पूर्वहंगामी कापूस आहे. यात अतिपावसाने एका झाडावर किमान १० ते १२ बोंडांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. जी फुले, पाते झाडावर होती, ती गळून गेली आहेत. पाऊस सुरूच आहे. यामुळे हे नुकसान रोज वाढत आहे.
दीपक पाटील, शेतकरी, माचला, ता. चोपडा,

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com