भोर तालुक्यातील विजेचे प्रश्‍न सुटणार

नवीन वीज केंद्र सुरू करण्याच्या कामास हिरवा कंदील
भोर तालुक्यातील विजेचे प्रश्‍न सुटणार
ElectrycityAgrowon

पुणे : भोर विधानसभा मतदार संघातील विजेच्या प्रश्‍नासंदर्भात (Electricity Issue) ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Dr. Nitin Raut) यांच्याबरोबर नुकतीच आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopate) यांची मुंबईत बैठक झाली. या वेळी भोर वेल्हे-मुळशी तालुक्यातील विजेचा प्रश्‍न शेतकऱ्यांच्या तक्रारी, नवीन वीज केंद्र (Power Center) सुरू करण्याच्या कामांना ऊर्जामंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. ही सर्व कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.

संग्राम थोपटे यांच्यासमवेत या वेळी मंत्री राऊत, आमदार महावितरण, महापारेषण तसेच महानिर्मिती कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी झालेल्या बैठकीत पुढील विषयांवर चर्चा व निर्णय घेण्यात आला. भोरच्या पूर्व भागात वीर धरणाच्या जलाशयालगत असलेल्या कृषिपंप जोडण्या आहेत. त्यांना भाटघर व परिंचे उपकेंद्रातून वीजपुरवठा होतो. खंडित व कमी दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्या दूर करण्यासाठी कृषिपंप २०२० धोरणानुसार उपकेंद्र मंजूर केले आहे. त्यासाठी ५.१४ कोटी रुपये मंजूर आहेत. उपकेंद्रासाठी आवश्यक जागा निश्‍चित करण्यासाठी बारामती ग्रामीण मंडळचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील यांच्या नियंत्रणात पाच सदस्य तांत्रिक समितीची स्थापना केली आहे. आठ दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

भोर उपविभागांतर्गत आतापर्यंत ६.४२ कोटी रुपये इतकी कृषिपंप वीजबिल वसुली झाली आहे. त्यापैकी २७.०४ लाखांची कामे प्रस्तावित आहेत.

या निधीमधून अतिभारित रोहित्राच्या ठिकाणी नवीन रोहित्र उभे करणे, क्षमता वाढविणे, नवीन कृषी वीज जोडणीसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करणे, गावातील वीज वाहिन्यांची क्षमतावाढ व देखभाल दुरुस्तीची कामे केली जात आहेत. कामथडी ते निगुडघर उच्चदाब वीज वाहिनीची देखभाल व दुरुस्तीचे काम तातडीने होणार आहे. भाटघर महापारेषण उपकेंद्राच्या नूतनीकरण कामासाठी महापारेषणने आदेश दिले असून, ८.९८ कोटी रुपयाचे अंदाजपत्रक मंजूर आहे.

भोर शहरासाठी नियोजन

भोर शहरामध्ये भूमिगत उभे केलेल्या लघुदाब फीडर पिलरपासून ग्राहकांच्या मीटरपर्यंत भूमिगत लघुदाब वाहिनी टाकणे, मीटर बॉक्स, फ्यूज बॉक्स बसविणे अद्याप प्रलंबित आहेत. भोर एसटी स्थानक ते नगरपालिका रस्त्यावरील वीज वाहिन्या भूमिगत करण्यासाठी ८९.९ लाखांचे अंदाजपत्रक मंजूर आहे. भोर उपविभागांतर्गत १४० गंजलेले पोल बदललेले आहेत. अजून ७० पोल तातडीने उपलब्ध करून बदलण्याचे काम सुरू करण्याचे ठरले. यात डोंगराळ पश्चिम भागास प्राधान्य देण्याचे ठरले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com