‘पूर’ दारात आणि ‘रेषा’ अडकली पुण्यात

प्रस्ताव पुण्याच्या मुख्य अभियंत्यांकडे सादर झाला आहे. परंतु त्याला अद्याप अंतिम मंजुरी नसल्याने ‘पूर’ दारात आणि ‘रेषा’ अडकली पुण्यात, अशी अवस्था निर्माण झाली आहे.
Flood Lines
Flood LinesAgrowon

गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : गडहिंग्लज विभागातील हिरण्यकेशीसह घटप्रभा, ताम्रपर्णी नदीच्या उगमापासून महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या नदीकाठाची निळी व लाल पूररेषा निश्‍चित करण्यासाठी आवश्यक तो प्रस्ताव पुण्याच्या मुख्य अभियंत्यांकडे सादर झाला आहे. परंतु त्याला अद्याप अंतिम मंजुरी नसल्याने ‘पूर’ दारात आणि ‘रेषा’ अडकली पुण्यात, अशी अवस्था निर्माण झाली आहे. यंदाचा पावसाळा उंबरठ्यावर असताना अजूनही हा प्रस्ताव लालफितीतच अडकला आहे.

हिरण्यकेशी नदीचा उगम आंबोलीत आहे. तेथून महाराष्ट्र हद्दीपर्यंतचे त्याचे अंतर ७१ किलोमीटर आहे. २०१९ व २०२१ च्या महापुरामुळे हिरण्यकेशीसह ताम्रपर्णी व घटप्रभा नदीकाठच्या गावांतील घरांसह शेतीचे प्रचंड नुकसान झाले. दरम्यान, वारंवार येणाऱ्या महापुरापूर्वी पूरग्रस्तांच्या स्थलांतराचे नियोजन करण्यासाठी पूररेषेचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरते. नद्यांकाठच्या निळी व लाल पूररेषा निश्‍चित करण्यासाठीचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाने दिला आहे. प्रस्ताव सध्या पुण्याच्या मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयात आहे. त्याला प्रशासकीय मंजुरीही मिळाल्याचे सांगण्यात येते. निविदा प्रसिद्ध होऊन त्यानंतर पूररेषा निश्‍चितीचे काम सुरू होणार आहे; परंतु अद्याप प्रस्ताव लालफितीतच असल्याने पूररेषा निश्‍चितीचे काम रखडले आहे. परिणामी, पूररेषेतच अजून काही ठिकाणी बांधकामे होत असून काही जण अंतिम पूररेषेच्या प्रतीक्षेत आहेत.

नागरिक म्हणतात, पूर रेषा कधी ठरणार ?

महापुराचे पाणी कुठेपर्यंत आले याची माहिती नागरिकांना माहीत असली तरी तांत्रिकदृष्ट्या पूररेषेची माहिती नागरिकांना गरजेची आहे. अनेकांचे नदीच्या दिशेला भूखंड आहेत. त्यांना बांधकाम करायचे असले, तरी त्याचा परवाना मिळण्यात अडचणी येतात. एक मार्गदर्शक दिशा म्हणून पूररेषेकडे पाहिले जाते. परंतु तीच कार्यवाही ठप्प राहिल्याने नागरिकांची अडचण झाली आहे. पूररेषा निश्‍चित झाल्यास त्यात कोणता भाग येतो, किती कुटुंबांना स्थलांतरित किंवा पुनर्वसन करावे लागते याचे परफेक्ट नियोजन करता येते. याशिवाय पूररेषेतील शेतीमध्ये कोणती पिके घ्यावीत किंवा न घ्यावीत याचे मार्गदर्शन मिळते. परंतु पूररेषेचाच पत्ता नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com