
बाळासाहेब पाटील ः ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर : राज्यातील टीईटी घोटाळाप्रश्नी (TET Scam) एक मंत्री आणि आमदाराशी संबंधित विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विचारलेला प्रश्न परस्पर वगळल्याच्या मुद्द्यावरून सभागृहात जोरदार खडाजंगी झाली. तसेच या घोटाळ्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर चर्चा करता येणार नाही, असे उत्तर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी दिले. त्यानंतर सदस्य आणखी आक्रमक झाले. अखेर हा प्रश्न राखून ठेवण्यात आला. या प्रकरणावर चर्चेला नकार देणाऱ्या अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी शाळा घेतली.
न्यायप्रविष्ट प्रकरणांवर सोईने या सभागृहात चर्चा केली जाते. सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे, मग आपण चर्चा का करतो, असा प्रश्नही नार्वेकर यांना केला. सभागृह सार्वभौम आहे. न्यायप्रक्रिया वेगळी गोष्ट आहे. आम्ही कायदे तयार करतो. त्याची अंमलबजावणी न्याययंत्रणा करते. मग त्यात हस्तक्षेप कसा आला? अशा प्रश्नांनी नार्वेकर यांना विरोधकांनी घेरले.
टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांत मंत्रिमंडळातील मंत्र्यांची मुले, आमदारांची आणि अधिकाऱ्यांची किती मुले आहेत, या प्रश्नाला उत्तर देताना दीपक केसरकर म्हणाले, ‘‘७५०० मुलांना अपात्र ठरविले आहे. ७५० मुलांना बनावट प्रमाणपत्रे, २१ मुलांना अपात्र ठरविले आहे. या प्रकरणाला स्थगिती दिली आहे. नोटीस देऊन चौकशी सुरू आहे.’’ अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न राखून ठेवावा, अशी विनंती केल्यानंतर हा प्रश्न राखून ठेवण्यात आला.
‘शंभर खोके भूखंड ओके’
अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली. आजपर्यंत ‘५० खोके एकदम ओके’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. तिसऱ्या दिवशी भूखंड घोटाळ्याचा संदर्भ देत ‘शंभर खोके, भूखंड ओके’ अशा घोषणांनी विरोधकांनी परिसर दणानून सोडला. विरोधकांना उत्तर देण्यासाठी ‘संतांचा अपमान करणाऱ्या विरोधकांचा धिक्कार’ असो अशा घोषणा देण्यात आल्या.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.