
Akola Agriculture News : आगामी खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने (महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित) सोयाबीन, धान या प्रमुख पिकांसह इतर वाणांचे बियाणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे.
विशेष म्हणजे या हंगामात सोयाबीनचे दर मागील हंगामाच्या तुलनेत कमी केल्याने ‘महाबीज’चे बियाणे खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
बाजारात या हंगामासाठी महाबीजने सोयाबीनचे सुमारे दीड लाख क्विंटल बियाणे पुरवठ्याचे नियोजन केले. यात दहा वर्षांआतील नवीन वाण व १५ वर्षांवरील जुन्या वाणांचा समावेश आहे.
या नियोजित बियाण्यापैकी ७० टक्के पुरवठासुद्धा आतापर्यंत बाजारात करण्यात आलेला आहे. राज्यात सोयाबीन पाठोपाठ ‘महाबीज’कडून धानाचे बियाणे मोठ्या प्रमाणात पुरवले जाते.
यंदा महाबीज ४० हजार क्विंटल हे बियाणे पुरवणार आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, पूर्व विदर्भातील जिल्ह्यातील धान पट्ट्यात या बियाण्याचा पुरवठा केला जात आहे.
सोयाबीनचे दर केले कमी ः
गेल्या हंगामाच्या तुलनेत या वर्षी सोयाबीन बियाण्याचे दर किलोमागे सुमारे ४० रुपयांपर्यंत कमी करण्यात आले आहेत. नवीन वाणाचा दर किलोला कमाल १०२ रुपयांपर्यंत, तर जुन्या वाणाचा दर ९१ रुपयांदरम्यान काढण्यात आला आहे.
गेल्या हंगामात सोयाबीन वाणांचा दर कमाल १४४ रुपयांपर्यंत ठेवण्यात आला होता. या वर्षी ‘महाबीज’ने खासगी कंपन्यांच्या स्पर्धेत हे दर कमी करीत आव्हान उभे केले आहे. मिलेट इअरच्या अनुषंगाने ज्वारी, बाजरी, नाचणीचे बियाणेही उपलब्ध करून दिले जात आहे.
शासनाने ‘महाबीज’च्या सोयाबीन वाणाला विविध योजनांअंतर्गत अनुदान उपलब्ध करून दिले तर महाबीजचे बियाणे शेतकऱ्यांना आणखी कमी दरात मिळू शकते.
महाबीज सोयाबीन वाणांचे दर निश्चित झाल्याने आता खासगी कंपन्यांकडून काय निर्णय घेतला जातो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
बीजोत्पादनावरही जोर
गेल्या काही हंगामात सततच्या पावसाने बीजोत्पादन प्रभावित झालेले आहे. प्रामुख्याने परतीच्या पावसाने बीजोत्पादन क्षेत्रास फटका दिला होता. परिणामी बियाणे उपलब्ध यंदाच्या हंगामात महाबीजने ४५ हजार हेक्टरवर सोयाबीन, ५० हजार हेक्टर धान, १० हजार हेक्टर तूर तसेच मूग, उडीद आदी पिकांचे बीजोत्पादन करण्याचे निश्चित केले आहे. नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. महाबीजकडून ३० हजार क्विंटल फाउंडेशन बियाणे दिले जात आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.