उन्हामुळे पिकांची होरपळ वाढली

फूल, फळगळीचे प्रमाण वाढले; फळांवर डाग पडल्याने गुणवत्ता खालावली
Heat impact on Crop
Heat impact on CropAgrowon

पुणे : उन्हाचा पारा चढल्याचा परिणाम पिकांवर होत आहे. उन्हामुळे आंब्यामध्ये (mango) फळगळ वाढली असून, फळांवर डागही (sun burn) पडत आहेत. तर द्राक्षाला (Grapes) बारीक तडे जात आहेत. भाजीपाला पिकांची (vegetable Crops) वाढ खुंटली असून, पिकांची होरपळ वाढली. उसाचीही वाढ खुंटल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे वर्षभर नैसर्गिक (Natural) आपत्तीचा मार सहन करणाऱ्या शेतकऱ्यांची आता उन्हामुळेही आर्थिक होरपळ होत आहे.

नैसर्गिक आपत्ती यंदा शेतीचा (Farming) पिच्छा सोडताना दिसत नाही. पावसाळा आणि हिवाळ्यात अतिवृष्टी गारपिटीने पिकांना तडाखा दिला. तर हिवाळ्यात काही दिवस तापमान नीचांकी राहिल्याने पिकांचे नुकसान झाले. आता उन्हाळा सुरू झाला तरीही तापमानातील बदल कायम आहे. दर पंधरा दिवसांनी तापमानात मोठे चढ-उतार होताना दिसतात. यंदा परतीचा पाऊस उशिरापर्यंत झाला. पिकांसाठी पाणीही (Crop Water) उपलब्ध होते. त्यामुळे उन्हाळी पिके, फळपिके, भाजीपाला उत्पादन हाती येईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र शेतकऱ्यांच्या या स्वप्नावर उष्णतेचा आघात होताना दिसतो. मार्च महिन्यापासून वाढलेल्या तापमानामुळे पिकांची होरपळ होत आहे. यंदाच्या मार्च महिन्याने तर तापमानाचा सव्वाशे वर्षांचा विक्रम मोडला. हा मार्च १२२ वर्षांतील उष्ण (Summer) ठरला. या उष्णतेचा माणसांसह जनावरांनाही ताप झाला. त्यापेक्षा अधिक फटका पिकांना (Crop) बसला. महाराष्ट्राचा विचार करता तापमानाचा फळबागा, भाजीपाला, उन्हाळी पिके, ऊस आणि रोपवाटिकांना फटका बसला.

Heat impact on Crop
खानदेशात उन्हाळी पिके जोमात

भाजीपाला पिकांची होरपळ
उन्हामुळे पालेभाज्या पिके सुकत आहे. पिकाची वाढ खुंटली. तर मिरचीची नवीन लागणही हातची जात आहे. पाणी बचतीसाठी उन्हाळ्यात शेतकरी (Farmer) मल्चिंगवर मिरची लागवड करतात. मात्र पिकाला पाणी दिल्यानंतर उन्हामुळे गरम वाफ तयार होत आहे. या वाफेमुळे अनेक ठिकाणी पिके जळत आहेत, असे शेतकऱ्यांनी सांगितले. यासोबत टरबूज, खरबूज, वांगी, दोडका, कांदा आदी पिकांवर उष्णतेचा परिणाम होत आहे. भाजीपाला पिकांसह उन्हाळी पिके आणि उसाची वाढ अति उष्णतेमुळे खुंटल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या उन्हाळी सोयाबीनची उत्पादकता उष्णतेमुळे कमी राहील, अशी शक्यताही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

Heat impact on Crop
राजुरातील हिरव्या मिरचीची बाजारपेठ गडगडली 

आंब्याची फळगळ
या वाढलेल्या तापमानामुळे आंब्याची (Mango) फळगळ मोठ्या प्रमाणात होत आहे. एरवी उष्णतेमुळे छोटी फळे गळून पडत होती. मात्र आता पक्व होत असलेली फळेही गळून पडत आहे. हे यंदाच होताना दिसते, असे शेतकऱ्यांनी सांगितले. छोट्या झाडांना पाणी दिल्यास किंवा पाणवठ्याशेजारील झाडांची फळगळ अधिक होत आहे. तसेच उन्हामुळे कैऱ्यांवर डाग पडत असल्याचेही शेतकऱ्यांनी (Farmer) कळविले. कैऱ्या मोठ्या प्रमाणात गळत असल्याने उत्पादन कमी होण्याची भीती आहे. आता तर फक्त मार्च संपला, पुढे एप्रिल आणि मे महिन्यातील उन्हाला सामोरे जायचे. त्यामुळे पुढील काळात काय होईल, अशी भीतीही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

द्राक्षावरही परिणाम
सध्या द्राक्षाची काढणी सुरू आहे. मात्र उन्हामुळे द्राक्ष पिकालाही फटका बसला. काढणीयोग्य द्राक्षाला एकदम बारीक तडे जात आहेत. असे द्राक्ष निर्यातीसाठी (Grapes Export) स्वीकारले जात नाहीत. त्यामुळे स्थानिक बाजारात विकले जातात. यात शेतकऱ्यांचा मोठा तोटा होतो. सध्याचा विचार करता निर्यातीसाठीच्या द्राक्षांना ६० ते ७० रुपये दर मिळत आहे. तर स्थानिक बाजारात २५ ते ३५ रुपयाने खरेदी चालू आहे, असे निफाड (NIFAD) येथील शेतकरी पोपटराव मोरे यांनी सांगितले. द्राक्षाचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी कागदाचे कव्हर लावले त्यासाठी खर्च केला. म्हणजेच पीक (Crop) संरक्षणासाठी शेतकऱ्यांचा खर्च वाढला मात्र तरीही उन्हाचा फटका पिकाला बसतच आहे.

उन्हापासून द्राक्षाचे संरक्षण करण्यासाठी कागदाचे कव्हर लावले. त्यासाठी एकरी २५ हजारांचा खर्च आला. मात्र या परिस्थितीत पाऊस झाल्यास नुकसान वाढले. सध्या उन्हामुळे द्राक्षाला केसाप्रमाणे बारीक तडे जात आहेत. त्यामुळे निर्यात शक्य नाही. त्यामुळे ६० ते ७० रुपये किलोची द्राक्षे २५ ते ३० रुपयांनी विकावी लागत आहे.

- पोपटराव मोरे, द्राक्ष उत्पादक, दावचवाडी, जि. नाशिक

उन्हामुळे सोयाबीन पिकाला शेंगांची लागण कमी-जास्त आहे. मिरची पीक सध्या फुलधारणेच्या अवस्थेत आहे. मात्र उन्हामुळे फूलगळ वाढली. मिरचीच्या फळावर डाग पडत आहेत. तसेच उसाची वाढही थांबली.

- कृष्णा पाटील, मोजेसांगाव, जि. कोल्हापूर

यंदा ऊन वाढल्याने पिकांची होरपळ होत आहे. मी तीन एकरांत कलिंगड, भोपळा, वांगी, दोडका, खरबूज पिके घेतली. मार्च महिन्यात उन्हामुळे पीक करपण्यासह फळगळ, फळांवर डाग पडणे आदी समस्या होत्या. मी जाणकार आणि कृषी विद्यापीठाच्या सूचनेनुसार उपाय करत आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.

- दिनकर धामोळे, लागीव, ता. खामगाव, जि. बुलडाणा

उष्णतेमुळे आंब्याची फळगळ यंदा वाढली. पुढील काळात तापमान असेच राहिले तर आणखी फळगळ होऊ शकते. सध्याची परिस्थिती पाहता आंबा उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे.

- संजय मोरेपाटील, नळविहिरा, जि. जालना

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com