शेतकऱ्यांना कीर्तनातून लावली कृषी ज्ञानाची गोडी

कृषी ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाला अध्यात्माची जोड दिली तर कृषी ज्ञान विस्ताराचे कार्य किती सहजगतीने व परिणामकारकरीत्या होते, याची प्रचिती या दोन्ही शास्त्रज्ञांच्या कृषिज्ञान विस्ताराच्या नावीन्यपूर्ण प्रयत्नांमुळे येते आहे.
शेतकऱ्यांना कीर्तनातून लावली कृषी ज्ञानाची गोडी
AgricultureAgrowon

औरंगाबाद : ‘नाचू कीर्तनाचे रंगी, कृषी ज्ञानदीप लावू जगी’ या हेतूने केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूरचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब फंड व वनस्पतिरोग्यशास्त्रज्ञ डॉ. शैलेश गावंडे या शास्त्रज्ञ एकत्र आले. कीर्तनाची सांगड कृषी शास्त्राशी घालत त्यांनी कृषी ज्ञानजागराचा वसा शेतकऱ्यांना देण्याचे काम सुरू केले आहे. ‘कपाशीवरील कीड रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन’ या विषयावरील त्यांच्या कृषी किर्तनमालेचे पाचवे पुष्प त्यांनी औरंगाबाद येथे नुकतेच गुंफले.

कृषी ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाला अध्यात्माची जोड दिली तर कृषी ज्ञान विस्ताराचे कार्य किती सहजगतीने व परिणामकारकरीत्या होते, याची प्रचिती या दोन्ही शास्त्रज्ञांच्या कृषिज्ञान विस्ताराच्या नावीन्यपूर्ण प्रयत्नांमुळे येते आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्थेद्वारे अनुसूचित जाती उपाययोजना अंतर्गत कृषी कीर्तनातून कपाशी पिकावरील कीड रोगांच्या एकात्मिक व्यवस्थापनाचे धडे शेतकऱ्यांच्या मनावर बिंबविले.

‘न समृद्धी कृषिविना’ या शब्दांपासून सुरू होणारे त्यांचे कृषी कीर्तन ‘गुलाबी बोंड अळी नियंत्रणाचा सोपा मंत्र, अवलंब करा एकात्मिक व्यवस्थापनाचे तंत्र’ ‘करण्या किडीचे प्रभावी नियंत्रण, सीआयसीआरने आणले नव तंत्रज्ञान’ अशा कृषी ओव्यातून मार्गक्रमण करते. कोणत्या टप्प्यावर कोणती औषधे किती प्रमाणात वापरावीत, याची कारणमीमांसा ते ‘ओलांडता किडीने आर्थिक नुकसान पातळी, शिफारस केलेलीच फवारणी घ्या वेळोवेळी’ या ओवीतून करतात. ‘एकात्मिक कीड व्यवस्थापनाची किमया भारी, कीड आणि रोगांचे नियंत्रण करी’ असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कीर्तनाच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

शेतीच आधुनिक तंत्रज्ञान अवघड शास्त्रोक्‍त भाषेत न सांगता संतपरंपरेने मनावर रुजविलेल्या अभंगांच्या सोप्या व समजणाऱ्या चालीवरून ओवीबद्ध केले तर शेतकऱ्यांना समजण्यास मदत होईल. म्हणूनच एक कविता रचून त्या माध्यमातून कृषी कीर्तनाचा संगम जुळवून आणला.

डॉ. बाबासाहेब फंड, कीटकशासत्रज्ञ, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर

अध्यात्माची जोड देऊन कृषिशास्त्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. ‘बीजे अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, रखमा माझी पेरणी माझा पांडुरंग नांगर धरी,’ अशा ओवीतून कृषिज्ञान शेतकऱ्यांच्या हृदयाचा ठाव घेणारे ठरेल, असा प्रयत्न आहे.

डॉ. शैलेश गावंडे, वनस्पतिरोगशास्त्रज्ञ, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com