
Pune News : जागतिक साखर उद्योगाचे नेतृत्व आगामी काळात महाराष्ट्राकडे येण्याची शक्यता आहे. तसेच राज्याच्या साखर कारखानदारीची उलाढाल पुढील काही हंगामांत अडीच लाख कोटी रुपयांच्या पुढे जाईल, असे भाकित साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले.
वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) पुण्यात आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. श्री. गायकवाड व साखर संचालक (प्रशासन) उत्तम इंदलकर हे दोघे उच्चपदस्थ अधिकारी येत्या ३१ मे रोजी निवृत्त होत असल्यामुळे खासगी कारखान्यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते.
व्यासपीठावर ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, सरचिटणीस पांडुरंग राऊत, भारत पेट्रोलियम महामंडळाचे महाव्यवस्थापक शशी प्रकाश, कार्यकारी संचालक अजित चौगुले होते.
आयुक्त म्हणाले, ‘‘राज्याकडे जागतिक साखर धंद्याचे नेतृत्व येण्याची शक्यता असल्यामुळे या क्षेत्रातील सर्व घटकांनी संयुक्तपणे काही संकेत, नियम पाळावे लागतील. तसे झाल्यास कारखाने आर्थिकदृष्ट्या बळकट होतील. चांगल्या सुधारणा झाल्यास शेतकऱ्यांची आंदोलने संपतील.
साखर उद्योग आता विस्तारत असल्यामुळे राज्यातील तरुणांसाठी मोठी संधी मिळू शकते. त्यासाठी एमएसडब्ल्यू व एमबीए शिक्षण झालेली प्रत्येकी पाच गरीब कुटुंबातील मुले प्रत्येक कारखान्यांनी मानधनावर घ्यावीत. त्यांच्याकडे कारखान्यांच्या चांगल्या बाबी समाजासमोर, समूह माध्यमात मांडण्याची जबाबदारी द्यावी. राजकीय पक्षांनी ते साधले आहे. तेच धोरण कारखान्यांनी स्वीकारायला हवे.’’
मी कामे करताना माणूस व कायद्याची नेहमी सांगड घालत गेलो. शेतकरी व साखर कारखाने अशा दोन्ही बाजूंनी मी बोलत होतो. तसेच तटस्थ भूमिका घेत साखर उद्योगाच्या हिताचे निर्णय घेत गेलो. सरकारी नोकरीत कोणी केले नसेल असा प्रयोग मी केला. तो म्हणजे मी नेमकी काय सेवा दिली हे प्रत्येक सेवा काळात जनतेला सांगत गेलो. आपल्या कामाचा हिशेब देणे जनतेला देणे ही खरी लोकशाही आहे, असेही श्री. गायकवाड म्हणाले.
विस्माचे अध्यक्ष श्री. ठोंबरे म्हणाले, ‘‘श्री. गायकवाड निवृत्त झाले नसून ते आता साखर उद्योगाच्या कुटुंबाचे एक घट्ट घटक बनले आहेत. त्यांचे मार्गदर्शन यापुढेही उद्योगाला लाभणार आहेत.
गेल्या चार वर्षांत राज्याच्या साखर उद्योगात परिवर्तन आणणारे निर्णय श्री. गायकवाड यांनी घेतले आहेत. त्यामुळेच या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यांनी कोणताही घटकाला न दुखावता घेतलेल्या निर्णयांची नोंद साखर उद्योगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी घेतली जाईल.
शेतकऱ्यांबद्दल प्रचंड तळमळ असलेला हा अधिकारी शेतकरी हितासाठी धडाकेबाज निर्णय घेत होता. त्याचवेळी साखर उद्योग जिवंत राहिला पाहिजे, अशीही त्यांची ठाम भूमिका होती.’’
मोर्चाला सामोरे जाणारा शेतकऱ्यांचा मसिहा
विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी साखर आयुक्तांचा उल्लेख शेतकऱ्यांचा मसिहा असा केला. रात्री ११ वाजता शेतकऱ्यांच्या मोर्चाला सामोरे जाणारे, केवळ साखरेवर अवलंबून राहू नका, असा आग्रह धरणारे आयुक्त म्हणून शेखर गायकवाड यांचे काम संस्मरणीय आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे राज्याच्या साखर उद्योगाची उलाढाल तिपटीने वाढली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.