
किन्हवली : शहापूर तालुक्यातील किन्हवलीपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या वेहळोली(खु) गावाला आठवडाभरापासून भूकंपाचे (Earthquake) हादरे बसत आहेत. यावेळी भूगर्भातून होणाऱ्या स्फोटासारख्या गूढ आवाजामुळे (Mysterious Sound) ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.
या पार्श्वभूमीवर शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांनी गुरुवारी सकाळीच वेहळोली गावात भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली व ग्रामस्थांना धीर दिला. तसेच ग्रामस्थांच्या आग्रहाखातर दरोडा यांनी लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना संपर्क साधून २० ते ३० टक्के पाणीसाठा कमी करण्याचे निर्देश दिले.
सर्व गावकऱ्यांसाठी भूकंप व भूगर्भातील आवाज हा प्रकार अगदी अनपेक्षित असल्याने वेहळोली गावातील नागरिक भयभीत झाले आहेत. एकापाठोपाठ एक असे भूकंपाचे लहान-मोठे धक्के बसले आहेत.
ग्रामस्थ दहशतीच्या छायेत
गावासाठी १९७२ मध्ये बांधलेला मातीचा बांध असलेला जुना पाझरतलाव हा सततच्या धक्क्याने तो फुटला तर आपले काय होईल? या भीतीने गावाला ग्रासले असून ग्रामस्थ दहशतीखाली जगत आहेत. माजी आमदार पांडुरंग बरोरा, आमदार दौलत दरोडा यांनी वेहळोली गावाला भेट देऊन नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली व ग्रामस्थांना धीर दिला.
वेहळोली गावात गेल्या आठ दिवसांपासून जे छोटे मोठे हादरे बसतात त्यापैकी फक्त मंगळवारी सायंकाळी ५ वाजून ४६ मिनिटांनी बसलेला हादरा भातसा येथील भूकंप मापक यंत्रात २.७ रिश्टर स्केल एवढा नोंद करण्यात आला. बाकीचे हादरे कमी तीव्रतेचे असल्याने नोंद झाले नाहीत.भूकंप होण्यापूर्वी किंवा झाल्यावर हे धक्के येत असतात. त्यामुळे गावकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. ज्या ग्रामस्थांना रात्री घरात झोपण्याची भीती वाटते, त्यांच्यासाठी महसूल प्रशासनाने गावाबाहेरील जागेत तंबू टाकण्याची व्यवस्था केली आहे.
- नीलिमा सूर्यवंशी, तहसीलदार, शहापूर
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.