...तर वनविभागाच्या कार्यालयाला टाळे

शेतकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्‍नांची सरबत्ती करत वन्यप्राण्यांचे प्रश्‍न तातडीने सोडविण्यासाठी आग्रह धरला.
Forest Department
Forest DepartmentAgrowon

भादवण, जि. कोल्हापूरः हत्ती, गवे व अन्य वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान होत आहे. आर्थिकदृष्ट्या अडचणीत शेतकरी वन्यप्राण्यांच्या नुकसानीमुळे पिचला आहे. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष आहे. शेतकऱ्यांना वेळेत भरपाई देण्यासह हत्ती, गवे यांसह वन्यप्राण्यांच्या प्रश्‍नांबाबत तातडीने मार्ग न काढल्यास वनविभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील, चंदगड विधानसभा मतदार संघ संपर्कप्रमुख सुनील शिंत्रे यांनी दिला.

कोवाडे (ता. आजरा) येथे वन्यप्राण्यांच्या प्रश्‍नांबाबत आयोजित बैठकीत परिक्षेत्र वनाधिकारी स्मिता डाके- होडगे अध्यक्षस्थानी होत्या. शेतकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्‍नांची सरबत्ती करत वन्यप्राण्यांचे प्रश्‍न तातडीने सोडविण्यासाठी आग्रह धरला. तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी. जंगलात चर खोदावे, सौर कुंपण करावे. वनतळी उभी करावीत. वन्यप्राण्यांच्या खाद्याची सोय जंगलात करावी, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.

शिवसेनेचे आजरा तालुका प्रमुख युवराज पोवार यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. उपजिल्हा प्रमुख पाटील व शिंत्रे यांनी वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान होत आहे. शेतकरी मेटाकुटीला आल्याचे सांगितले. यातून मार्ग काढा नाहीतर कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा त्यांनी दिला. शिवसेना उपतालुकाप्रमुख संजय येसादे म्हणाले, ‘‘टस्करांचा हाजगोळी परिसरात वावर आहे. त्यांनी पिके, फळझाडे, ऊस, शेती साहित्य, पोल्ट्रीचे नुकसान केले आहे. तक्रार देऊनदेखील अधिकारी दुर्लक्ष करत आहेत.

शेतकरी नागोजी होरटे म्हणाले, ‘‘पिकाच्या राखणीसाठी रात्रंदिवस शेतात तळ ठोकून देखील शेतकऱ्यांच्या पदरात कायच पडत नाही. संजय देसाई म्हणाले, ‘‘गव्यांच्या कळपाने अनेकदा पीक फस्त केले. पण भरपाई मिळाली नाही. पेद्रेवाडी येथील काळम्मा मंदिराजवळ वनतळे केल्यास शेतकऱ्यांचे ५० टक्के प्रश्न सुटतील. डाके म्हणाल्या, जंगलात चारा, वनतळे उभारण्यासाठी वनविभाग प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांच्या भावना आम्हाला कळतात लवकरच यातून मार्ग काढला जाईल. कोवाडचे सरपंच मनोहर जगदाळे, वनपाल संजय निळकंठ, धनाजी सावंत, अप्पासाहेब चिमणे, शिवसेना उपतालुका प्रमुख सुनील डोंगरे, नारायण मुरुकटे, संतोष चौगुले, दयानंद शिंदे, रजाक शेख यासह शेतकरी उपस्थित होते. ग्रामसेवक अंकुश पाटील यांनी स्वागत केले. संजय देसाई यांनी आभार मानले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com