Fish Farming : मत्स्यपालनातील नवे तंत्रज्ञान

मत्स्य व्यवसायाच्या विकासाच्या योजनांना अधिक गती देण्याकरिता भारत सरकारच्या मत्स्य व्यवसाय विभागाने २०२०-२१ पासून प्रधान मंत्री मत्स्य संपदा योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून मासे उत्पादन, उत्पादकता आणि गुणवत्ता, पायाभूत सुविधा तसेच विपणनावर भर देण्यात आला आहे.
Fish Farming
Fish FarmingAgrowon

मासे हे दैनंदिन आहारात पोषणाच्या दृष्टीने प्राणिजन्य प्रथिनयुक्त अन्न (Protin Product) आहे. मत्स्यपालन व्यवसायामुळे मोठ्या प्रमाणात विविध रोजगार संधी निर्माण झाल्या आहेत. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या (Pradhan Mantri Matsya Sampada Yojana) माध्यमातून मच्छीमार (Fish Production) आणि मत्स्यशेतकरी (Fish Farmers)यांचे सामाजिक-आर्थिक कल्याण एकाच वेळी सुनिश्‍चित करताना मूल्यसाखळीचे आधुनिकीकरण करणे आणि मजबूत करणे, ट्रेसिबिलिटी वाढविणे तसेच मत्स्य व्यवसाय व्यवस्थापनाला चालना देण्यात येत आहे.

Fish Farming
Sea Fishing : समुद्री मासेमारीला ब्रेक

मत्स्यसंवर्धनाचे विविध प्रकार :

१) नैसर्गिक तलाव/जलाशयातील मत्स्यपालन :

- नैसर्गिक तलाव पद्धतीत पारंपरिक पद्धतीने मासेमारी केली जाते. पाणी संचयनाकरिता लघू, मध्यम आणि मोठे प्रकल्प उभारले जातात. शासनाकडे असलेल्या अशा प्रकारचे तलाव हे संबंधित विभागाकडून मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था, खासगी व्यक्ती किंवा संस्था यांना भाडेतत्त्वावर ठरावीक वर्षाकरिता मासेमारीसाठी देण्यात येतात.

- या तलावात संबंधित तलाव ठेकेदारांद्वारे दरवर्षी इष्टतम प्रमाणात मत्स्यबीज संचयन करून मत्स्योत्पादन घेतले जाते.

- मासे तलावातील नैसर्गिकरीत्या उपलब्ध खाद्यावर अवलंबून असतात. या प्रकारात मासेमारीकरिता मोठे क्षेत्रफळ असते. मासेमारीकरिता मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ व व्यवस्थापन खर्च असतो. या पद्धतीत सर्व प्रकारचे मासे व जलीय जीव आढळतात.

Fish Farming
Jute Crop : ताग पीक जोमात

२) शेत-तलावातील मत्स्यपालन :

- या पद्धतीत मानवनिर्मित आयताकृती/ चौकोनी शेततळ्याचा वापर मत्स्यपालनासाठी केला जातो. या पद्धतीत ठरावीक प्रजातीचे मत्स्यबीज संचयन व आवश्यक मत्स्यखाद्याचे नियोजन व व्यवस्थापन करून उत्पादन घेतले जाते.

- या प्रकारात मासेमारी करिता छोटे क्षेत्र असते. मासेमारीकरिता मनुष्यबळ कमी लागते. खाद्य व इतर व्यवस्थापन खर्च मोठा असतो.

- या पद्धतीत भारतीय प्रमुख कार्प, चायनीज कार्प, तिलापिया, पंगस, सायप्रिनस, झिंगा, मरळ माशांचे संवर्धन केले जाते.

Fish Farming
Lumpy Skin : महाराष्ट्रात ‘लम्पी स्कीन’ आजार नियंत्रणात

३) पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन ः

- या प्रकारात मोठ्या जलाशयात तरंगणारे ठरावीक आकार व आकारमानाचे जीआय पाइप वापरून (उदा. ४ × ६ × २ मीटर) सांगडा बनवून त्यात खालील बाजूस सापळा तरंगण्याकरिता प्लॅस्टिक टाके (ड्रम) वापरले जातात.

- ठरावीक आकार व खोलीचे जाळे वापरून त्यात मत्स्यबीज सोडण्यात येते.

- मत्स्यबीजास आवश्यक खाद्याचे नियोजन करून मत्स्य उत्पादन घेतले जाते. पिंजरा पद्धतीमुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या १०-१२ जणांस रोजगारनिर्मिती होते.

Fish Farming
Lumpy Skin : सातारा जिल्ह्यात लम्पीने एकाच दिवसात नऊ जनावरांचा मृत्‍यू

४) बायोफलॉक :

- बायोफ्लॉक टेक्नॉलॉजी ही नवीन ‘नीलक्रांती’ म्हणून गणली जाते. यामध्ये पोषक तत्त्वांचा सतत पुनर्नवीनीकरण आणि संवर्धन माध्यमात पुनर्वापर केला जाऊ शकतो. याचा किमान किंवा शून्य-पाणी विनिमयाद्वारे फायदा होतो.

- बायोफ्लॉक टेक्नॉलॉजी हे इन-सीटू सूक्ष्मजीव उत्पादनावर आधारित पर्यावरणपूरक मत्स्यपालन तंत्र आहे.

५) आरएएस पद्धती ः

- या पद्धतीमध्ये सूक्ष्मजीव आरएएस पद्धतीत निर्माण होणाऱ्या विष्ठेचा काही भाग रिसायकल करतात, तर दुसरा भाग फिल्टर करून खत म्हणून वापरला जाऊ शकतो.

- इतर मत्स्यपालन उत्पादन पद्धतींच्या तुलनेत, आरएएस संभाव्य पर्यावरणीय प्रभाव कमी करते. आरएएस प्रणालीची व्याख्या पूर्णपणे नियंत्रित गहन मत्स्य उत्पादन प्रणाली म्हणून केली जाऊ शकते. येथे पाणी आणि जमिनीचा वापर कमीत कमी आहे.

- ही पद्धत माशांच्या विविध प्रजातींच्या उच्च घनतेच्या संवर्धनासाठी वापरली जाते. जमीन आणि पाण्याचा किमान वापर होतो.

६) ॲक्वापोनिक्स पद्धती :

- एक्वापोनिक्स हा शेतीचा एक प्रकार आहे. यामध्ये टाक्यांमध्ये पाणी भरून त्यात मासळी संवर्धन केले जाते.

- मातीचा उपयोग न करता टाक्यांच्या वरील बाजूस विविध पालेभाज्या मासळीच्या विष्ठेमधील घटकांचा वापर करून वाढविल्या जातात.

- एक्वापोनिक्समध्ये, मासे वाढवण्यापासून पोषक तत्त्वांनी युक्त पाणी वनस्पतींसाठी नैसर्गिक खत उपलब्ध होते. झाडे माशांसाठी पाणी शुद्ध करण्यास मदत करतात.

मत्स्यबीज निर्मिती

महाराष्ट्रात मत्स्यबीज विक्रीसाठी मोठी बाजारपेठ आहे. परराज्यांतून येणाऱ्या मत्स्यबीजांच्या गुणवत्तेच्या अपुऱ्या माहितीमुळे शेतकऱ्यांची फसवणूक मोठ्या प्रमाणात दिसते. यासाठी गुणवत्तापूर्ण मत्स्यबीज निर्मितीमध्ये संधी आहे.

यातून आपण मत्स्यबीजांच्या बाबतीत स्वावलंबी होऊ शकतो.

१) प्रजननक्षम मासे वापरून ठरावीक संरचनेमध्ये मत्स्यबीज निर्मिती केली जाते. (उदा. चायनिज/सरक्युलर कार्प हॅचरी)

२) मत्स्यबीज निर्मिती केंद्रामध्ये निर्मित झालेले मत्स्यजिरे आणून आपल्या संवर्धन तलावांत त्यापासून मत्स्यबोटुकली निर्मिती व विक्री.

मत्स्यखाद्य निर्मिती आणि पुरवठा

- भारतात विविध कंपनीचे मत्स्यखाद्य उपलब्ध आहे. या कंपनीचे रिटेल व होलसेल आउटलेट घेऊन मत्स्य खाद्य विक्रीतून स्वयंरोजगार निर्मिती होते.

- शासकीय योजनेतून किंवा स्वखर्चाने स्वत:चे मत्स्यखाद्य निर्मिती प्रकल्प उभारता येतात.

मत्स्यपालनातील साहित्य पुरवठा

- विविध तंत्रज्ञानाद्वारे करण्यात येणाऱ्या मत्स्यपालनात वस्तू आणि साहित्य जसे नायलॉन सूत, जाळे, लाकडी नौका, इलेक्ट्रिक मोटार्स-एरेटर, पंप इत्यादीची आवश्यकता असते.

- मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था, लहान मोठे मत्स्य शेतकरी आणि व्यावसायिकांना मोठया प्रमाणात या बाबींची आवश्यकता असते. रिटेल व होलसेल व्यवसायातून मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगारासह इतर रोजगारनिर्मिती होते.

मासे विक्री आणि व्यापार

- मासे खरेदी करताना नागरिक स्वच्छ दुकानातून ताजे, स्वच्छ किंवा जिवंत मासळी घेणे पसंत करतात. हे लक्षात घेऊन आपल्या शहरात, गावात स्वच्छ मत्स्यविक्री केंद्र उभारून विक्री किंवा ऑनलाइन पद्धतीने घरपोच मासळी विक्रीद्वारे चांगले उत्पन्न मिळवू शकतो.

- आपल्या प्रकल्पात तयार मासळी किंवा इतरांची मासळी खरेदी करून स्वच्छता असलेल्या मत्स्यविक्री केंद्राव्यतिरिक्त मोठ्या मार्केटमध्ये विक्री किंवा इतर देशांत निर्यात करणे शक्य आहे.

मत्स्यप्रक्रिया आणि विक्री

- बाजारात मोठ्या प्रमाणात पॅक बंद कॅन/रीटॉर्ट पाऊच मधील रेडी टू फ्रॉय, रेडी टू सर्व्ह, रेडी टू कुक, रेडी टू इट इत्यादी पदार्थांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.

- फिश फिलेट, फिश सॉसेज, फिश फिंगर, फिश वडा, फिश कटलेट, मत्स्य चकली इ. पदार्थ बनवून स्थानिक बाजारपेठेत विक्री करू शकतो किंवा ब्रँड बनवून ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने मोठी बाजारपेठ मिळविता येते.

शोभिवंत मासे व मत्स्य टाकी निर्मिती विक्री

- मत्स्यालयांसाठी रंगीबेरंगी माशांची मागणी वाढत आहे. रंगीबेरंगी मासे जसे की गोल्ड फिश, गप्पी, कॉरी कॅटफिश आणि बेटा फिश (सियामीज फायटिंग फिश) यांना मागणी आहे.

शहरात लहान किंवा मोठे मत्स्यालय तयार करून त्यात विविध प्रजातीची रंगीबेरंगी मासळी सोडून नियोजन करावे. मत्स्यालय पाहण्यास येणाऱ्या नागरीकांना ठरावीक तिकीट दर आकारून व्यवसाय सुरू करू करता येतो. त्यासोबत नागरिकांच्या मागणी प्रमाणे लहान मोठे काचेची मत्स्यपेटी (ॲक्वारीयम) बनवून विक्री करू शकतो.

- परसबागेत टाक्या ठेवून रंगीबेरंगी मत्स्यबीज निर्मिती सुद्धा करू शकतो. यापासून कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करता येतो.

मत्स्य पर्यटन

- मत्स्य पर्यटन हे जगातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या पर्यटन क्षेत्रांपैकी एक आहे. अँग्लिंग, हूक आणि लाइनद्वारे मनोरंजक मासे पकडण्याचा खेळ लोकप्रिय होत आहे. यामध्ये विविध मासेमारी खेळ, बोटिंग, स्वीमिंग, फिश स्पा, फिश बाथ अशा उद्योगांना संधी आहे.

- ग्राहकांसाठी मत्स्य खाद्य पदार्थांचे हॉटेल हा व्यवसाय देखील चांगले उत्पन्न देतो.

तांत्रिक मार्गदर्शन केंद्र

- मत्स्यपालन करू इच्छिणाऱ्यांना तांत्रि‍क मार्गदर्शन आणि इतर बाबींची आवश्यकता असते. मत्स्य व्यवसायात शिक्षण घेतलेली किंवा त्या क्षेत्रातील पारंगत व्यक्ती तांत्रिक मार्गदर्शन केंद्र उभारून रोजगार निर्मिती करू शकते.

संपर्क : किरण वाघमारे, ९८८१६००९५१

(लेखक पुणे येथे सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com