
मराठवाड्यात रेशीम उद्योगाला (Silk Industry) मोठा वाव आहे. या शेतीतून शेतकरी शंभर टक्के यशस्वी होतील व आगामी काळात संपूर्ण देशाला अंडीपुंज पुरवठा (Egg Cluster) करण्याची मराठवाड्याची क्षमता आहे असा विश्वास मराठवाडा रेशीम विभागाचे (Silk Department) उपसंचालक दिलीप हाके यांनी व्यक्त केला.
सकाळ- ॲग्रोवनतर्फे औरंगाबाद येथे आयोजित कृषी प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी (ता. १५) रेशीम उद्योग गरज आणि संधी या विषयावर पहिल्या सत्रातील चर्चासत्र झाले.
यावेळी ॲग्रोवनचे संपादक- संचालक आदिनाथ चव्हाण, सकाळ मराठवाडा आवृत्तीचे निवासी संपादक दयानंद माने, जालना जिल्हा रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते, औरंगाबाद जिल्हा रेशीम विकास अधिकारी बी. डी. ढेंगळे, संजीवनी जोगळेकर यांच्यासह रेशीम शेती उत्पादक शेतकरी संपत करताडे, भाऊसाहेब निवदे उपस्थित होते.
या वेळी बोलताना हाके म्हणाले, की रेशीम शेतीतून शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी शासन योजना राबवीत आहे. संबंधित सर्व अडचणीही शासनस्तरावरून सोडविण्यात येत आहेत. या शेतीतून शेतकरी शंभर टक्के यशस्वी होतील.
आगामी काळात संपूर्ण देशाला अंडीपुंज पुरवठा करण्याची मराठवाड्याची क्षमता आहे, अशी मला खात्री आहे. दुष्काळी स्थितीत रोजगार देणारी रेशीम शेती आहे.
त्यातून शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट होईल, असा विश्वासही श्री. हाके यांनी व्यक्त केला. तुती ‘नर्सरी’बाबत तांत्रिक बाबी अजय मोहिते यांनी सांगितल्या.
मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील युवा शेतकरी भाऊसाहेब निवदे व पैठणचे शेतकरी संपत करताडे यांनी रेशीम शेतीतील अनुभव कथन केले. तरुण शेतकऱ्यांना या शेतीत वाव असल्याचे ते म्हणाले.
पुणे येथून आलेल्या संजीवनी जोगळेकर यांनी भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ७५ हजार विद्यार्थ्यांना रेशीम शेतीचे धडे देत असल्याचे सांगितले. तसेच रेशमी धाग्यांपासून पैठणी बनविण्याचे कार्य मराठवाड्यातील पुष्पाताई पोकळे यांच्याकडून होत असल्याचे सांगितले.
शेतकऱ्यांचा झाला सन्मान
चर्चासत्रात ॲग्रोवनच्या वतीने प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यात लक्ष्मी लक्ष्मण बोरा (रा. शिंदी, ता. केज, जि. बीड), कोमल अविनाश पवार (तीर्थखुर्द, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद), सौ. नौशाद अलीम शेख (रा. अनाळा, ता. परंडा, जि. उस्मानाबाद), अश्विनी रामराव कोंपले (रा. वासणगाव, ता.जि. लातूर) आणि आशिष अनंतराव गायकवाड (रा. हलगरा, ता.निलंगा, जि. लातूर) यांचा समावेश राहिला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.