
पुणे : जिल्हा परिषद गट आणि गण (Zila Parishad Ward) यांची संख्या २०१७ च्या निवडणुकीप्रमाणे कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद गटांची वाढलेली संख्या पुन्हा घटणार असून, गट संख्या ८२ वरून ७३, तर पंचायत समिती गणांची संख्या १६४ वरून १४६ होणार आहे. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या नव्या निर्णयाने (Cabinet Decision) निवडणुकांचे (Election) सर्व आडाखे बदलणार असून आरक्षण सोडतदेखील नव्याने काढली जाणार आहे. त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या आरक्षण (Election Reservation) सोडतीत नाराज सदस्यांना पुन्हा आशेचा किरण मिळाला आहे. तर, गटसंख्या कमी झाल्यामुळे इच्छुकांमध्ये नाराजी आहे.
राज्य सरकारच्या निर्णयानुसार जास्तीत जास्त ७५ आणि कमीत कमी ५० गट जिल्हा परिषदेसाठी निश्चित करण्यात आले आहेत. पुणे जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या निवडणुकीत २०१७ मध्ये ७५ गट अस्तित्वात होते. यावेळी पुणे ग्रामीण जिल्ह्याची लोकसंख्या ही संपूर्ण राज्यामध्ये अव्वल होती.
त्यामुळे सर्वाधिक ७५ गट असण्याचा मान पुणे जिल्हा परिषदेला मिळाला होता; मात्र जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रातून हवेली आणि मुळशी तालुक्यातील २३ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट झाली. वडगाव मावळ, देहू आणि बारामती तालुक्यातील माळेगाव येथे नगरपंचायती झाल्याने दोन लाख २३ हजार लोकसंख्या ग्रामीण क्षेत्रातून कमी झाल्याचा फटका बसला. त्यामुळे जिल्हा परिषदेचे तीन गट कमी होऊन एकूण गटांची संख्या ७५ ऐवजी ७३ पर्यंत खाली आली.
सद्यःस्थितीत ३३ लाख ८८ हजार ५१३ लोकसंख्या गृहीत धरून आगामी निवडणुकीसाठी गट आणि गणरचना होईल, या सूत्रानुसार पुणे जिल्हा परिषदेचे ७३ गट असतील, असा अंदाज राजकीय व्यक्ती लावत आहेत.
निर्णय फायद्यात की तोट्यात
जिल्हा परिषदेच्या गट आणि गणाचे नुकतेच आरक्षण जाहीर झाले होते. त्यामध्ये अनेक दिग्गजांना धक्का बसला. आरक्षण मनासारखे न झाल्यामुळे निवडणूक लढवायची कोठून, असा प्रश्न उपस्थित झाला होता; मात्र राज्य सरकारने नव्याने घेतलेल्या निर्णयामुळे नाराज झालेल्यांना पुन्हा आशेचा किरण दिसू लागला आहे. मात्र, गट गणांची संख्या कमी झाल्यामुळे सदस्यांना मिळणारी संधीही कमी झाली असून, भविष्यात आरक्षण पडल्यावर उमेदवारी मिळविण्यावरून वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संधी कोण साधणार, हे गट आणि आरक्षण सोडत झाल्यावरच स्पष्ट होईल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.