Rain Update : यंदा जुलैअखेर राज्यात २७ टक्के अधिक पाऊस

जून महिन्यातील दडीनंतर जुलै महिन्यात मॉन्सूनचा पाऊस मुक्तहस्त कोसळल्याने राज्यात पावसाने दोन्ही महिन्यांची सरासरी ओलांडली आहे.
Weather Update
Weather Update Agrowon

पुणे : जून महिन्यातील दडीनंतर जुलै महिन्यात मॉन्सूनचा पाऊस (Monsoon) मुक्तहस्त कोसळल्याने राज्यात पावसाने दोन्ही महिन्यांची सरासरी ओलांडली आहे. १ जून ते ३१ जुलै या कालावधीत राज्यात ६७७.५ मिलिमीटर म्हणजेच २७ टक्के अधिक पावसाची नोंद (Rain) झाली आहे. कोकणात पावसाने सरासरी (Average Rain) गाठली आहे. उर्वरित राज्यात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला आहे.

जून महिन्यात पूर्वमोसमी पावसाची दडी, मॉन्सूनच्या पावसाचा अभाव यामुळे राज्यात १४७.५ मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या अवघा ७० टक्के पाऊस पडला होता. जून महिन्याच्या पावसात सरासरीपेक्षा ३० टक्के तूट होती. त्यामुळे चिंतेचे वातावरण असतानाच जुलै महिन्यात राज्यात सर्वदूर दमदार पाऊस कोसळल्याने अनेक भागात ओल्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाली. नद्यांना पूर आल्याने सर्वदूर हाहाकार झाला. यातच मुसळधार पावसाने शेतजमिनी उफळल्या. अनेक धरणे भरून ओसंडून वाहिली. जायकवाडीसह मोठ्या धरणांतून पाण्यात विसर्ग करावा लागला. तर उजनी, कोयना धरणातही मुबलक पाणीसाठा झाला.

Weather Update
Soybean : सोयाबीनची नक्की लागवड किती?

जुलै महिन्यात सुरूवातीपासून सुरू झालेला पाऊस अखेरच्या आठवड्यापर्यंत सातत्याने कोसळत राहिल्याचे दिसून आले. विभागनिहाय पडलेल्या पावसाची स्थिती पाहता मराठवाड्याला पावसाने झोडपून काढल्याने सरासरीच्या तुलनेत ६१ टक्के अधिक पाऊस पडला आहे. तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा २५ टक्के अधिक, विदर्भात ३९ टक्के अधिक पाऊस झाला. कोकणात ६ टक्के अधिक होत पावसाने सरासरी गाठल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.

जुलै अखेरपर्यंत राज्यात विभागनिहाय पडलेला पाऊस

विभाग---सरासरी---पडलेला---टक्केवारी

कोकण-गोवा---१७५५.०---१८५८.४---६

मध्य महाराष्ट्र---३८७.२---४८३.२---२५

मराठवाडा---३०५.१---४९६.२---६३

विदर्भ---४८४.७---६७१.६---३९

सांगलीत पावसाची दडी कायम

राज्यातील जिल्हानिहाय पडलेल्या पावसाची स्थिती विचारात घेता पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात यंदा पावसाची दडी असल्याचे चित्र आहे. सांगली जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत उणे २७ टक्के पाऊस पडला आहे. नगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, कोकणातील मुंबई शहर, उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, मराठवाड्यातील हिंगोली, विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, गोंदिया जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली आहे.

नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक

जुलै अखेरपर्यंत मराठवाड्याच्या बहुतांश जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्र, विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडला. तेथे सरासरीपेक्षा ११४ टक्के अधिक पाऊस झाला आहे. लातूर ७६ टक्के अधिक, उस्मानाबाद ६२ टक्के अधिक, तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात ७९ टक्के अधिक, तर विदर्भातील वर्धा येथे ७७ टक्के अधिक पाऊस पडल्याचे हवामान विभागाच्या नोंदीवरून स्पष्ट होत आहे.

Weather Update
Cotton : देशातील कापूस लागवड किती वाढली?

राज्यात जिल्हानिहाय पडलेल्या पावसाचे प्रमाण (तफावत टक्क्यांत) :

सरासरीपेक्षा खूप अधिक (६० टक्क्यांहून अधिक) :

नाशिक, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, वर्धा.

.....

सरासरीपेक्षा अधिक (२० ते ५९ टक्के अधिक) :

पालघर, नंदूरबार, धुळे, जळगाव, पुणे. औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली.

....

सरासरी इतका (उणे १९ ते १९ टक्के अधिक) :

मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशीम, गोंदिया

.....

सरासरीपेक्षा कमी (उणे ५९ ते उणे २० टक्के) :

सांगली

मॉन्सूनचा आस, कमी दाब प्रणाली ठरल्या पूरक

यंदाच्या जुलै महिन्यात शेवटचा आठवडा वगळता प्रत्येक आठवड्यात चांगला पाऊस झाला. महिन्याभरात चार कमी दाब प्रणाली तयार झाल्या. यातील एक प्रणाली अधिक तीव्र (डिप्रेशन) झाली. महिन्यात तब्बल २१ दिवस चार प्रणाली सक्रिय राहिल्या. तर मॉन्सून आस असलेला कमी दाबाचा पट्टा तब्बल २६ दिवस त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे राहिला. मेडियन ज्युलीअन असोलेशन (एमजेओ) २-५ फेजमध्ये अधिक दिवस राहिला. तर अरबी समुद्रावरून मॉन्सूनचे प्रवाह जोरदार असल्याने बाष्पाचा पुरवठा होऊन राज्यात दमदार पाऊस झाला. पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, अमरावती, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली.

जुलै अखेरपर्यंत राज्यातील जिल्हानिहाय पावसाची स्थिती, सरासरीच्या तुलनेत तफावत :

जिल्हा---सरासरी---पडलेला---तफावत

मुंबई शहर---१२७६.४---११७७.७---उणे ८

पालघर---१२९५.६---१९०७.८---४७

रायगड---१८३३.१---१८२१.६---उणे १

रत्नागिरी---१९८५.३---१८५३.०---उणे ७

सिंधुदुर्ग---१९३१.३---१९६१.१---२

मुंबई उपनगर---१३९२.८---१५३६.४---१०

ठाणे---१४०५.८---१६४७.८---१७

नगर---२०७.५---२२७.३---१०

धुळे---२९०.६---३६८.१---२७

जळगाव---३०७.३---३७१.१---२१

कोल्हापूर---१०२१.१---९६१.९---उणे ६

नंदूरबार---४३६.८---५३५.६---२३

नाशिक---४६०.५---८२६.०---७९

पुणे---४९७.०---६८४.८---३८

सांगली---२४५.३---१७९.३---उणे २७

सातारा---४६९.५---५३२.१---१३

सोलापूर---१८७.९---२२३.८---१३

औरंगाबाद---२६५.५---३९४.३---४८

बीड---२५२.५---३९१.०---५५

हिंगोली---३९४.१---४६६.०---१८

जालना---२९०.२---३६६.७---२६

लातूर---३०८.०---५४२.४---७६

नांदेड---३८४.६---८२२.३---११४

उस्मानाबाद---२५२.४---४०७.६---६२

परभणी---३३६.०--५२७.०---५७

अकोला---३६५.९---३६६.७---०

अमरावती---४१७.६---४९२.४---१८

भंडारा---५५०.४---६९१.५---२६

बुलडाणा---३२८.७---३७०.५---१३

चंद्रपूर---५५१.७---८१३.२---४७

गडचिरोली---६५५.३---१०१६.६---५५

गोंदिया---६२५.१---७२६.९---१६

नागपूर---४९१.२---७५३.७---५३

वर्धा---४४४.३---७६३.८---७४

वाशीम---४१६.०---४५८.५---१०

यवतमाळ---४३२.६---६३०.२---४६

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com