
हवामान विभागाने (Weather Department) मे मध्ये वर्तविलेल्या अंदाजानुसार (Rain Prediction) जून ते सप्टेंबर या पावसाळी काळात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस (Rainfall) झाला आहे. राज्यात ९९४.५ मिलिमीटर हे सरासरी पाऊसमान मानले जात असताना या वर्षी १२१९.७ मिलिमीटर म्हणजे सरासरीच्या २३ टक्के अधिक पावसाची (Rainfall) नोंद झाली आहे.
पाऊस चांगला म्हणजे सर्वच आलबेल असे चित्र आता रंगविले जाईल, परंतु पावसाच्या असमान वितरणाने शेतीवर खऱ्या अर्थाने पाणी फेरण्याचे काम केले आहे. जूनमध्ये पावसाचे आगमन थोडे लांबले, त्यानंतर दिलेल्या उघडिपीने पेरण्या खोळंबल्या.
जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तिन्ही महिन्यांत झालेल्या जोरदार पावसाने शेतीचे बरेच नुकसान केले. यंदाच्या मॉन्सून काळात २३ लाख हेक्टरहून अधिक शेती क्षेत्र अतिवृष्टी आणि पुराने बाधित झाले आहे. खरिपातील सर्वच पिकांचे नुकसान झाले असले तरी सर्वाधिक फटका हा कापूस आणि सोयाबीन या दोन मुख्य पिकांना बसला आहे.
पूर्वहंगामी कापूस भिजला, सोयाबीन तर अनेक ठिकाणी वाहून गेले. राज्याच्या काही भागांत अति ओल तर काही भागांत दिलेल्या ताणाने सोयाबीनच्या शेंगा भरल्या नाहीत.एकंदरीत पावसाच्या असमान वितरणाने खरीप पिकांचे १० ते १५ टक्के नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असली,
तरी कापूस, सोयाबीनचे त्यापेक्षा कितीतरी अधिक नुकसान झाले आहे. अधिक गंभीर बाब म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर या मॉन्सूनोत्तर काळात देशभरासह महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे खरीप पिकांचे नुकसान येथेच संपत नाही.
ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात पडणारा पाऊस खरिपासह रब्बीतील पिकांच्या मुळावर उठणाराच ठरतोय. ही सर्व परिस्थिती पाहता यावर्षी पाऊस चांगला झाला तरी तो नुकसानकारकच ठरत आहे.
अधिक पाऊस पडण्यापेक्षा सरासरी इतका पाऊसच किंवा त्यापेक्षाही थोडा कमी पाऊस अधिक कालावधीसाठी पडणे चांगले मानले जाते. अर्थात, चार महिन्यांत किती तीव्र पाऊस पडला यापेक्षा किती दिवस तो पडला हे महत्त्वाचे असते.
देशपातळीवर विचार करता यावर्षी १८७४ घटना या जोरदार पावसाच्या तर २९६ घटना या अति जोरदार अथवा मुसळधार पावसाच्या असून, या दोन्ही घटनांचे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा वाढलेले आहे. त्यामुळेच तर शेती पिकांच्या नुकसानीसह महापूर, भूस्खलन, विजा पडणे, घर-गोठ्यांची पडझड अशा घटनांमुळे जीवित-वित्त हानी वाढली आहे.
अधिक दुर्दैवी बाब म्हणजे दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील दीर्घकालीन तसेच अल्पकालीन हवामान अंदाज फारसे अचूक राहिले नाहीत. या सर्व बाबी लक्षात घेता हवामान बदलाचे मॉन्सूनवरील परिणाम अधिक गांभीर्याने घ्यायला हवेत.
पावसाचे आगमन, वितरण, माघार यावर नेमका हवामान बदलाचा काय परिणाम होतोय, याचा सखोल अभ्यास भारतीय हवामान विभागाने करायला हवा. हवामान विभागाचे बहुतांश अंदाज ठोस नव्हते, तरीही ते चुकलेत. मोघम हवामान अंदाज अचूक असल्याचे सिद्ध झाले तरी त्यातून साध्य मात्र काहीही होत नाही.
शेतीसाठी ठोस अन् अचूक हवामान अंदाज पाहिजेत. विभागनिहाय अंदाज देण्यापेक्षा तालुकानिहाय पुढे जाऊन मंडल-गावनिहाय अंदाज देण्याबाबत हवामान विभागाने विचार करायला हवा. हवामान अंदाज तत्काळ लोकांपर्यंत पसरविणारी यंत्रणाही अधिक सक्षम करावी लागणार आहे.
सध्याच्या काळात हवामान विभागापेक्षा तथाकथित हवामान तज्ज्ञांचे परस्पर विरोधी अंदाजच लोकांपर्यंत अधिक गतीने पोहोचत असून, त्यातून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम वाढतोय. या तथाकथित हवामानतज्ज्ञांचे स्वतःचे काही मॉडेल नाहीत. हे तज्ज्ञ हवामान विभागाचेच अंदाज थोडेफार फेरबदल करून पसरवितात. अशा कृतींवरही हवामान विभागाला आळा घालावा लागेल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.