Natural Farming : नैसर्गिक शेतीवर पदवी अभ्‍यासक्रम सुरू करणार

कुलगुरू डॉ. इंद्र मणी; पदवी अभ्‍यासक्रमांची पुनर्रचना
Natural Farming
Natural FarmingAgrowon

परभणी ः ‘‘नवीन राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कृषी अभ्‍यासक्रमाच्या (Agricultural Studies) विद्यार्थ्‍यांच्‍या कौशल्‍य विकासावर भर देण्यात येणार आहे. त्यानुसार नैसर्गिक शेतीवर स्‍वतंत्र पदवी अभ्‍यासक्रम सुरू करण्‍यात येणार आहे. त्यातून नैसर्गिक शेती पद्धतीवर संशोधनास प्रात्‍सोहन देण्‍यात येईल,’’ अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे (Vasantrao Naik Marathwada Agricultural College) कुलगुरू डॉ. इंद्र मणी (Dr. Indra Mani) यांनी दिली.

Natural Farming
Natural Farming : २५ लाख हेक्टरवर नैसर्गिक शेती नेणार

डॉ. मणी म्हणाले, ‘‘या महिन्याच्या प्रारंभी हैदराबाद येथे देशातील कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची परिषद झाली. या परिषदेत तेलंगणाचे राज्यपाल डॉ. तमिलिसाई सौन्दाराजन यांची विशेष उपस्थिती होती. भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक (कृषी शिक्षण) डॉ. आर. सी. अग्रवाल यांच्यासह देशभरातील कुलगुरू सहभागी झाले होते. या वेळी डॉ. अग्रवाल यांनी कृषी विद्यापीठांच्या अंतर्गत महसूल वाढीचे उद्दिष्ट ठेऊन २०३५ पर्यंत आर्थिक स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना केली.’’

डॉ. मणी म्हणाले, ‘‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२२ च्या अनुषंगाने देशातील कृषी विद्यापीठांसाठीच्या पदवी अभ्‍यासक्रमांची पुनर्रचना करण्यात आली आहे. विद्यार्थ्‍यांमधील कौशल्य विकासावर विशेष भर देण्‍यात आला आहे. योग आणि ध्यान या विषयांवर तीन आठवडे कालावधीचा अनिवार्य पायाभूत अभ्यासक्रम नवीन कृषी अभ्यासक्रमात घेतला आहे. पदवी अभ्‍यासक्रमात बहुविध प्रवेश आणि बाहेर पडण्याची तरतूद आहे. नैसर्गिक शेतीवर पदवी अभ्यासक्रम असेल. शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण देण्याचे कार्य केव्हीकेंकडे सोपवण्यात येईल. अनेक ठिकाणी नैसर्गिक शेतीसाठी प्रमुख पिकांची चाचणी घेतली जाईल.’’

या परिषदेत विद्यापीठ महसूल निर्मिती मॉडेल, सहाव्या अधिष्‍ठाता समितीच्या शिफारशी, नैसर्गिक शेतीसाठी नवीन पदवी अभ्यासक्रम, सार्वजनिक- खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेल, कृषी विद्यापीठांमध्ये नवीन शिक्षण धोरणाची अंमलबजावणी, आगामी २० वर्षांसाठी कृषी क्षेत्रातील मनुष्‍यबळ निर्मिती, देशातील कृषी विद्यापीठांच्या जागतिक क्रमवारीचे विश्‍लेषण आदी विषयांवर चर्चा करण्‍यात आली.

‘नैसर्गिक शेती संशोधनावर अधिक भर’

‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे नैसर्गिक शेती संशोधनावर अधिक भर देण्यात येईल. बीजोत्पादन तसेच अन्य निविष्ठांच्या माध्यमातून महसूल वाढीसाठी तसेच राष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावर विद्यापीठाचे मानांकन सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांपर्यंत उत्पादने पोहोचविण्यासाठी उद्योजकांचे सहकार्य घेतले जाईल,’’ असे डॉ. मणी म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com