शिवसेनेला संपवायचा प्रयत्न करून पहा

उद्धव ठाकरे यांचा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांना आव्हान
Shivsena
Shivsena Agrowon

मुंबई : आज सत्ता आहे म्हणून तुम्ही दुसऱ्याला संपवण्याची भाषा करत आहात, पण दिवस सदा सर्वकाळ सारखे राहत नाहीत, ते फिरले की तुमचे काय होईल, याचा विचार करा. शिवसेनेला संपवायचा प्रयत्न करूनच पहा, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J P Nadda) यांना दिला.

Shivsena
Sanjay Raut: राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी

‘‘नड्डा यांनी बिहार येथे पक्ष कार्यालयांच्या उद्घाटनप्रसंगी प्रत्येक राज्यातून आता काँग्रेस हद्दपार होत आहे. उरलेले पक्षही हद्दपार होतील. महाराष्ट्रात शिवसेना संपत चालली आहे.’’ असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा ठाकरे यांनी समाचार घेतला.

Shivsena
विधानपरिषदः विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना- राष्ट्र्वादीत रस्सीखेच

ते म्हणाले, ‘‘नड्डांचे भाषण सर्वांनी ऐकले आहे. हे लोक आपला देश कुठे नेऊन ठेवत आहेत, हे लक्षात येते. त्यांच्या या भूमिकेला मदत करायची की नाही, हे देशातील प्रत्येक नागरिकाने ठरविण्याची वेळ आली आहे. अन्य पक्षांत २०-३० वर्षे काम करून आलेल्यांना भाजपमध्ये घेतले जात आहे. त्यामुळे यांचे कर्तृत्व शून्य आहे. सध्या राष्ट्रीय स्तरावर भाजपला आव्हान देणारा एकही पक्ष नाही किंवा तसा कुठलाच विचार नाही, असा ते दावा करत आहे. हे भयानक आहे. त्यांच्यामते सगळे संपले आहेत. जे संपलेले नाहीत ते संपतील, हे वक्तव्य हुकुमशाहीकडे नेणारे आहे. तेलंगना, तमिळनाडूमधील काही पक्ष आणि महाराष्ट्रातील शिवसेना संपवण्याच्या मार्गावर आहे, असे त्यांना वाटत आहे. आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करून पहाच.

गुलामगिरीकडे वाटचाल

ठाकरे यानी नड्डा यांच्यावर टीका करताना वंशवादाचा समाचार घेतला. ते म्हणाले, भाजपला वंशवाद संपवायचा आहे. पण त्यांचा वंश कुठला? कारण अन्य पक्षात काम करून आलेले त्यांच्या पक्षात येत आहेत. त्यांचे सध्याचे राजकारण अत्यंत घृणास्पद आणि निघृण आहे. त्यांच्यासोबत येतील ते आपले हे एकवेळ ठीक आहे. पण गुलाम होतील ते आपले, त्यांचे काम संपले की पुन्हा नवे गुलाम शोधले जातात. म्हणजे ही गुलामगिरीकडे वाटचाल सुरू आहे. त्याचा प्रत्येक पातळीवर विरोध केला पाहिजे.

बळाचा वापर कुठवर कराल

संजय राऊत यांच्या अटकेचा संदर्भ देत ते म्हणाले, ‘‘संजय राऊत हे नेहमी या सगळ्याचा विरोध करत होते. निर्भिडपणे बोलत होते. त्यामुळे त्यांना अटक केली आहे. राजकारणात बुद्धिबळ चालते. सध्या मात्र बुद्धीचा नव्हे तर बळाचा वापर केला जातो. बळ आहे म्हणून त्याचा बेलगाम वापर करणार असाल तर विचार करायला हवा. दिवस सर्वकाळ सारखे नसतात, एकदा का दिवस फिरले की तुमचे काय होईल याचा विचार करा,’’ असा सवालही त्यांनी केला.

संजय राऊतांबद्दल अभिमान

ठाकरे म्हणाले, ‘‘संजय माझा जुना मित्र आहे. त्याचा गुन्हा काय आहे. पत्रकार आहे, शिवसैनिक आहे, जे पटत नाही ते निर्भिडपणे बोलतो. त्याने सांगितले आहे, मरण आले तरी मी शरण जाणार नाही हे सांगितले आहे. तो शरण जाऊ शकला असला मात्र, त्याने ते केले नाही. जे शरण गेलेत ते हमाम मध्ये गेलेत. सत्तेचा फेस गेला की त्यांना कळेल. दुसरे महायुद्ध पेटले होते तेव्हा हिटलर जोरात होता. रोज कुठे ना कुठे बाँब टाकत होता. त्यावेळी डेव्हीड लो नावाचे व्यंगचित्र काढायचे आणि ते एक व्यंगचित्र पाहून हिटलरच्या तळपायाची आग मस्तकात जात होती. तशी अवस्था आज होत आहे. कुणी विरोधात बोलले की, त्याला अटक करायची. असे सुरू आहे.

राऊत यांना चार ऑगस्टपर्यंत कोठडी

राऊत यांना रविवारी रात्री अटक करण्यात आल्यानंतर त्यांना सकाळी जे. जे. हॉस्पिटल येथे वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com