बाजार समित्यांचे होणार ‘स्मार्ट’अंतर्गत रँकिंग

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाअंतर्गत राज्यभरातील बाजार समित्यांची त्यांच्या कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी (रँकिंग) पणन संचालनालयाकडून जाहीर करण्यात येणार आहे.
बाजार समित्यांचे होणार ‘स्मार्ट’अंतर्गत रँकिंग

पुणे ः बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाअंतर्गत (SMART Project) राज्यभरातील बाजार समित्यांची (APMC) त्यांच्या कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी (रँकिंग) (Ranking For APMC) पणन संचालनालयाकडून जाहीर करण्यात येणार आहे. राज्यामध्ये प्रथमच अशा प्रकारे बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी जाहीर होणार आहे, अशी माहिती पणन संचालक सुनील पवार (Sunil Pawar) यांनी दिली.

जागतिक बँकेच्या सहकार्याने राज्यामध्ये स्मार्ट प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाअंतर्गत पणन संचालनालय स्तरावर प्रकल्प अंमलबजावणी कक्ष कार्यरत आहे. स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांपैकी राज्यातील बाजार समित्यांची त्यांच्या कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी प्रसिद्ध करण्यासाठी प्रकल्पामध्ये सांगण्यात आले आहे.

राज्याच्या कृषी बाजार व्यवस्थेतील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न आहे. बाजार समित्यांची क्रमवारी जाहीर झाल्यानतर राज्यातील इतर बाजार समित्यांच्या तुलनेत आपण शेतमाल नेत असलेल्या बाजार समितीचे स्थान शेतकऱ्यांना समजण्यास मदत होणार आहे. तसेच बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी अधिकाधिक सुविधा देण्याची निकोप स्पर्धा निर्माण होण्यास मदत होणार आहे.

बाजार समित्यांचे होणार ‘स्मार्ट’अंतर्गत रँकिंग
Smart Project : ‘स्मार्ट’मध्ये रुजू न झाल्यास कारवाई; आयुक्तांचा इशारा

पायाभूत सुविधा व इतर सेवा-सुविधा अंतर्गत रस्ते, सामाईक लिलावगृह, इलेक्ट्रॉनिक वजनकाटे, शेतमाल साठविण्यासाठी गोदाम, शीतगृह सुविधा, स्वच्छता व प्रतवारी सुविधा, शेतकऱ्यांसाठी निवास व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, बाजार समितीचे संगणकीकरण, बाजारभाव माहीत होण्यासाठी बाजार समितीने पुरविलेली सुविधा, बाजारातील खरेदीदारांचे प्रमाण व उपबाजार सुविधा आदी निकष आहेत.

बाजार समित्यांचे होणार ‘स्मार्ट’अंतर्गत रँकिंग
निर्यातबंदीविरोधात मध्य प्रदेशातील बाजार समित्या आज बंद

आर्थिक कामकाज निकषात बाजार समितीचे वार्षिक उत्पन्न, बाजार फी, वाढावा आणि शेतमालाची आवक यामध्ये झालेली वाढ, बाजार समितीचा आस्थापना खर्च तसेच नियमित भाडे वसुली आदी, वैधानिक कामकाज निकषात बाजार समितीचे मागील ५ वर्षांतील लेखापरीक्षण, लेखापरीक्षणाची दोष दुरुस्ती, सचिव नियुक्तीस मान्यता, संचालक मंडळाविरुद्ध झालेली बरखास्तीची कारवाई, खरेदीदारांच्या दप्तराची तपासणी, अडत्यांच्या वजनमापाची तपासणी आदी प्रमुख निकष आहेत. तसेच बाजार समिती शेतकऱ्यांसाठी कोणकोणते योजना, उपक्रम राबवीत आहे, शेतकऱ्यांना प्रशिक्षणाचा लाभ देत आहे याचीही तपासणी केली जाणार आहे. या सर्व निकषांच्या आधारे तपासणी करून त्यापैकी प्राप्त होणाऱ्या गुणांच्या आधारे राज्यभरातील बाजार समित्यांची क्रमवारी निश्चित केली जाणार आहे.

असे आहेत निकष

बाजार समित्यांची क्रमवारी निश्चित करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या विक्री व्यवस्थेसाठी बाजार समितीत असलेल्या पायाभूत व इतर सुविधेनुसार निकष तयार करण्यात आलेले आहेत. २०२१-२२ या वर्षाच्या कामगिरीनुसार क्रमवारी ठरविण्यासाठी ३५ निकष व २०० गुण ठरवण्यात आले आहेत. त्यामध्ये पायाभूत सुविधा व इतर सेवा-सुविधा अंतर्गत १४ निकष असून त्यासाठी एकूण ८० गुण, आर्थिक कामकाजाबाबत ७ निकष- ३५ गुण, वैधानिक कामकाजाबाबत ११ निकष- ५५ गुण तर योजना उपक्रमातील सहभाग व इतर विषयी ३ निकष असून त्यासाठी ३० गूण असे एकूण २०० गुणांवर आधारित ही क्रमवारी असेल.

बाजार समितीची क्रमवारीच्या निकषांबाबत बाजार समित्याकडून प्राप्त झालेल्या माहितीची तालुका उपनिबंधक किंवा सहायक निबंधक बाजार समितीस प्रत्यक्ष भेट देऊन व तपासणी करून गुण देणार आहेत. यासाठी या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षणही घेण्यात आले आहे. ३१ जुलै २०२२ अखेर राज्यभरातील बाजार समित्यांची निकषनिहाय माहिती व गुण याची माहिती पणन संचालनालयास प्राप्त होणार आहे. त्यानंतर लवकरच पणन संचालनालयाकडून बाजार समित्यांची २०२१-२२ या वर्षाची वार्षिक क्रमवारी प्रसिद्ध केली जाणार आहे.
सुनील पवार, पणन संचालक

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com