
बाळासाहेब पाटील ः ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर : गायराण जमीन घोटाळा आणि सिल्लोड महोत्सवाच्या (Sillod Festival) वसुलीप्रकरणाचे पडसाद दुसऱ्या दिवशीही विधानभवनात उमटले. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी टाळांच्या गजरात अनोखे आंदोलन करत कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत राजीनाम्याची मागणी लावून धरली.
शेतकरी हैराण, सत्तार खातो गायराण, खोके लुटा कधी गायराण लुटा, सूरतला चला कधी गुवाहाटीला चला. भूखंड घ्या कुणी गायराण घ्या, सत्तारला घ्या कुणी राठोडला घ्या, गद्दार बोलो कभी सत्तार बोले, अशा घोषणा देत फुगडीचा फेर धरला. विधानपरिषद आणि विधानसभेतील सर्व सदस्य विरोधी पक्षनेत्यांसह टाळ घेऊन पायऱ्यांवर उभे होते. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. महिला आमदारांनी फेर धरत सत्तार यांच्या राजीनाम्याच्या मागणीला धार आणली.
वाशिम जिल्ह्यातील ३७ एकर गायराण जमीन खासगी व्यक्तीला दिल्याचा दीडशे कोटी रुपयांचा कथित घोटाळा आणि सिल्लोड महोत्सवासाठी कृषी विभागाकडून १५ कोटींच्या वसुलीची मोहीम राबविल्याप्रकरणी सोमवारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गंभीर आरोप केले.
यावरून विरोधकांनी सोमवारी विधानसभेचे कामकाज बंद पाडले. त्यानंतर लगबगीने अब्दुल सत्तार नागपुरात दाखल झाले. रात्री उशिरा त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी सभागृहात निवेदन करण्याची रणनीती आखली. मात्र, मंगळवारी दुपारपर्यंत त्यांना संधी मिळाली नाही. विरोधकांनी सोमवारी सभागृहात आक्रमकपणे मांडलेला मुद्दा विधानभवनाच्या पायऱ्यांवर मांडणे पसंदत केले.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व आमदार पायऱ्यांवर पांढऱ्या टोप्या घालून टाळांचा गजर करत होते. अब्दुल सत्तार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करून राजीनाम्याची मागणी लावून धरली. तत्पुर्वी विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारातूनच टाळांचा गजर करत विरोधक विधानभवनात आले.
सत्तार यांनी घेतली अध्यक्षांची भेट
सत्तार यांना दोन्ही प्रकरणे भोवण्याची चिन्हे असताना ते नागपूरबाहेर होते. त्यांच्या दोन्ही प्रकरणांचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर ते लगबगीने नागपुरात दाखल झाले. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपली बाजू मांडली. तसेच मंगळवारी सकाळी लवकर ते विधानभवनात आले. ते बराच वेळ विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात बसून होते. त्यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केल्याचे सुत्रांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.