
नाशिक : नाशिक शहरासह जिल्ह्यात दिंडोरी, इगतपुरी, पेठ, सिन्नर, निफाड, चांदवड, नांदगाव, देवळा, मालेगाव, कळवण, सटाणा तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. अनेक भागांत हलका ते मध्यम तर सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बुधवारी (ता. १४) जनजीवन विस्कळीत झाले. तसेच कांदा, द्राक्ष आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
मध्यम ते हलक्या पावसाला बुधवारी दुपारी ४ वाजेनंतर सुरुवात झाली. रात्री मध्यरात्रीपर्यंत सरी सुरू होत्या. पाऊस कमी असला तरी शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा ठरला आहे. सध्या खरीप लाल कांदा काढणीला वेग आला आहे. तर कसमादे भागात पूर्वहंगामी द्राक्ष खुडे सुरू आहेत, अशा परिस्थितीत पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली.
जिल्ह्यात उन्हाळ कांदे लागवड सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेत तयार करून ठेवली आहेत. तर मका पीक सांगून अनेक शेतकऱ्यांच्या खळ्यांवर पडलेले आहे. पाऊस सुरू होताच मका झाकण्यासाठी शेतकऱ्यांची वरून ताडपत्री, प्लॅस्टिक कागद टाकण्याची लगबग दिसून आली.
जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पूर्ण दिवस ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अर्धा तास पाऊस झाला. शेतात रचून ठेवलेले भात, नागली, उडीद पिकाचे व जनावरांच्या चाऱ्याचे नुकसान झाले आहे. द्राक्ष पिकावर ढगाळ वातावरणामुळे डाऊनी बुरशीजन्य रोगांची भीती आहे. परिणामी महागडा पीक संरक्षण खर्च वाढणार आहे. हलका पाऊस असला तरी काही बागेत द्राक्ष बागांवर भुरी मोठ्या प्रमाणात दिसत आहे.
पिकांना रोगाचा धोका
पावसामुळे रोगांना पोषक वातावरण आहे. परिणामी, भाजीपाला पिकावर भुरी व कीटकांचा प्रादुर्भाव तर कांद्यावर मावा रोगांची भीती व्यक्त केली आहे. पाऊस पडल्यानंतर सकाळपर्यंत द्राक्ष बागांवर व घडामध्ये पाणी साचून होते. त्यामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी दुपारनंतर शेतकऱ्यांच्या फवारण्या सुरू झाल्या. आगाप भागात अधिक पाऊस नसल्याने धोका काही अंशी टळला. मात्र ज्या बागा फुलोरा अवस्थेत आहेत, त्यामध्ये गळकूज होण्याची शक्यता आहे. गुरुवारी (ता. १५) दुपारनंतर वातावरण हळूहळू निवळले होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.