
Nagar News जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस, गारपीट (Hailstorm) सुरू आहे. या पावसाने पिकांचे नुकसान सुरूच आहे. बुधवारी (ता. २६) सायंकाळी वीज पडून चार जणांचे मृत्यू झाले. एक गायदेखील मृत्युमुखी पडली.
नगर जिल्ह्यातील शेवगाव, नेवासा, राहुरी, राहाता तालुक्यांतील अनेक भागांत बुधवारी वादळी पाऊस झाला. काही भागांत गारपीट झाली. या महिन्याभरातील हा चौथा पाऊस होता. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
नेवासा तालुक्यातील देडगाव, चांदे, कौठा, अंमळनेर भागांत पावसाने हाहाकार उडविला. देडगाव येथील तांबे वस्ती परिसरात वीज पडून कांदा काढणी करणाऱ्या सविता राजेंद्र बर्फे यांचा मृत्यू झाला. तर कडू तांबे यांच्या वस्तीजवळ वीज पडून गोठ्यातील एक गाय मृत्युमुखी पडली.=
अंमळनेर येथील बेंदवस्ती येथे पिकाला खत टाकीत असताना वीज पडून रावसाहेब भागाजी बोरुडे यांचा मृत्यू झाला. वादळाने चांदे व कौठा, मुळाथडी परिसरातील निंभारी, शिरेगाव, करजगाव भागांत घरांचे व शेतपिकांचे नुकसान झाले.
श्रीरामपूर तालुक्यातील भेंर्डापूर येथे शेतात काम करणाऱ्या मजुरांना घरी नेऊन सोडताना प्रमोद दांगट या शेतकऱ्यांसह अलका रामदास राऊत या शेतमजूर महिलेचा दुचाकीवर वीज पडल्याने मृत्यू झाला.
शेजारी उभी असलेली एक शेतमजूर महिला जखमी झाली. मालुंजे गावांत वीज पडल्याने चार एकरावरील ठिबक संच जळाला. शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी, मठाचीवाडी, मजलेशहर, गोळेगाव, नागलवाडी, लाडजळगाव, शेकटे, राणेगाव, कोनोशी भागांत गारा पडल्या. तर बोधेगाव, बालमटाकळी हातगाव मुंगी, कांबी या ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. राहुरी तालुक्यातही जोरदार वादळ व पावसाने घरांचे, पिकांचे नुकसान झाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.