युरियाची तस्करी; पालघर जिल्ह्यात वाहतूक बंदी

औद्योगिक कंपन्यांमध्ये कृषी अनुदानित युरिया वापराचा संशय
Urea
Urea Agrowon

पुणे ः शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेला अनुदानित युरिया (Subsidies Urea) मोठ्या प्रमाणात औद्योगिक वापरासाठी वळविला जात असल्याचा संशय आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यात आता रात्रीच्या युरिया वाहतुकीला (Urea Transport) पूर्णतः बंदी घालण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना अनुदानित युरियाची ४५ किलोची गोणी २६५ रुपयांमध्ये उपलब्ध असते. मात्र, औद्योगिक वापराचा युरिया (Industrial Use Urea) ३ ते ४ हजार रुपये दराने मिळतो. त्यामुळे युरियाची तस्करी केली जाते. त्याचे केंद्रबिंदू ठाणे व पालघर भागात आहे. मात्र, युरिया तस्कारांच्या विरोधात कधीही कारवाई केली गेलेली नाही. केंद्राने याबाबत एक अहवाल राज्याला पाठविला आहे.पालघरमधून ठाणे व मुंबईच्या क्षेत्रातील विविध कारखान्यांना चोरट्या मार्गाने युरिया पाठविला जात असल्याचा संशय आहे. त्यामुळे युरियाची संशयास्पद तस्करी आता राज्य शासनाच्या रडारवर आली आहे.

राज्याच्या कृषी विभागाने युरिया तस्करी रोखण्यासाठी शासनाशी संपर्क साधून कारवाई करण्याबाबत पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३मधील कलम १४४ मधील अधिकाराचा वापर करीत रात्रीच्या युरिया वाहतुकीवर बंदी लागू केली आहे. राज्यात प्रथमच असा निर्णय घेण्यात आल्यामुळे युरिया तस्करांना निर्वाणीचा संदेश देण्याचा प्रयत्न शासन करीत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, खत उद्योगातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘‘केंद्राने राज्य शासनाला कारवाईचे आदेश दिल्यामुळेच युरिया तस्करांच्या विरोधात हालचाली सुरू झालेल्या आहेत. पालघरच नव्हे; तर ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड भागातील युरिया वाहतुकीवरदेखील नजर ठेवण्याची गरज आहे. या भागात शेतीच्या नावाखाली गुजरातसह इतर भागातून दरवर्षी ५० हजार टन युरिया येतो. हा युरिया या जिल्ह्यामधील औद्योगिक कारखान्यांमध्ये वापरला जातो की नाही; यावर नजर ठेवणारी कोणतीही यंत्रणा सध्या अस्तित्वात नाही. काही कंपन्यांनीच ही बाब थेट केंद्र शासनाला निदर्शनास आणली. केंद्राने याबाबत स्वतः सखोल चौकशी केल्यानंतर तस्करी होत असल्याचे सिद्ध झाले.’’

शेतीचा अनुदानित युरिया अनधिकृतपणे केवळ औद्योगिक वापराला जात नाही. तर, संगनमत करून काही जण विद्राव्य खत उत्पादन तसेच मिश्र खते तयार करण्यासाठीदेखील युरिया पुरवतात, अशी धक्कादायक माहिती सरकारी अंगीकृत खत उत्पादक एका जबाबदार कंपनीच्या प्रतिनिधीने दिली. दरम्यान, कृषी खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘‘पालघर, ठाणे भागातील युरिया तस्करी जानेवारी ते मे दरम्यान होते. कंपन्या या कालावधीत मोठ्या प्रमाणात साठेबाजी करून ठेवतात. तसेच, कोणत्या औद्योगिक कंपनीत कोणत्या वापरासाठी किती बिगरशेतीचा युरिया आला, किती वापरला, किती साठवला याविषयी कोणतीही अद्ययावत माहिती उपलब्ध नसते. या कंपन्यांची तपासणीही व्यवस्थित होत नाही. त्यामुळे युरिया तस्करी रोखण्याचे आव्हान कायम राहील.’’

अशी रोखणार युरियाची तस्करी

- २० जून ते १७ ऑगस्ट असे दोन महिने सायंकाळी ६ वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत युरिया वाहतुकीस बंदी असेल.

- अनधिकृत वापर शोधण्यासाठी जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांची काटेकोर तपासणी होणार

- बोईसर, तारापूर, पालघर, वसई व वाडा भागातील औद्योगिक कंपन्यांच्या युरिया वाहतुकीवर नजर ठेवणार.

- रंग, टाईज, वस्त्रोद्योग, बियर, प्लायवूड, पशुखाद्य तसेच इतर विविध औद्योगिक उत्पादनात होणारा युरिया वापर तपासला जाणार.

- ट्रक, बसेस, जीप या वाहनांमधून युरिया तस्करीचा संशय असल्याने वाहनांची काटेकोर तपासणी होणार

-युरिया तस्करीच्याविरोधात पोलिस, कृषी, परिवहन, महसूल अशा विविध खात्याच्या यंत्रणा संयुक्तपणे काम करणार.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com