
Gold Medal For Agrowon Podcast पुणे ः ‘सकाळ माध्यम समूहा’च्या (Sakal Media) ‘शेत मार्केट’ या पॉडकास्टला (Shet Market Podcast) दि वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूज पब्लिशर्सचे (WAN-IFRA) बेस्ट पॉडकास्ट गटातील सुवर्णपदक मिळाले आहे. ॲग्रोवन डिजिटलचे हे पॉडकास्ट आहे. शेतीमधले मार्केट इन्टेलिजन्स सांगणारे ते भारतातील पहिले पॉडकास्ट आहे.
WAN-IFRA ने २०२२ साठीच्या दक्षिण आशियायी डिजिटल मीडिया पुरस्कारांची घोषणा नुकतीच केली. हे पुरस्कार माध्यम क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जातात. त्यात बेस्ट पॉडकास्ट गटातील सर्वोच्च सन्मानासाठी ‘शेत मार्केट’ पॉडकास्टची निवड करण्यात आली. या पुरस्कारामुळे ‘ॲग्रोवन’च्या या वैशिष्ट्यपूर्ण डिजिटल प्रॉडक्टची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे.
२०२२ या वर्षासाठी एकूण १३ गटांमध्ये सुवर्ण, रौप्य आणि कास्य असे तीन प्रकारचे पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यासाठी विविध दक्षिण आशियायी देशांमधून प्रवेशिका आल्या होत्या.
सुवर्णपदक विजेत्यांना WAN-IFRA तर्फे दिल्या जाणाऱ्या वर्ल्ड डिजिटल मीडिया ॲवार्डच्या स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार आहे. नवी दिल्ली येथे १६ मार्च रोजी ‘डिजिटल मीडिया इंडिया २०२३’ परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
‘ॲग्रोवन डिजिटल’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना एका क्लिकवर कृषी बाजारातील घडामोडी, दरातील चढ-उतार, महत्त्वाच्या बातम्या, तांत्रिक माहिती, चालू घडामोडींपासून ते शेती सल्ल्यापर्यंत सर्व अपडेट्स मिळतात.
‘ॲग्रोवन’ची वेबसाइट, ॲप, यू-ट्यूब चॅनेल, फेसबुक पेज, इन्स्टाग्राम आणि पॉडकास्ट यांवर ही माहिती उपलब्ध होते.
मार्केट इन्टेलिजन्स हा ‘ॲग्रोवन डिजिटल’चा गाभा आहे. त्याचाच एक भाग म्हणून दररोज शेतकऱ्यांना मार्केट बुलेटिन दिले जाते. त्यामध्ये कृषी बाजारातील घडामोडींचा धांडोळा घेतला जातो.
शेतीमालाचे भाव काय राहतील, माल विकावा की ठेवावा, मार्केट ट्रेण्ड, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडींचा बाजारावर होणारा परिणाम यांचे विश्लेषण केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीविषयीचा निर्णय घेण्यास मदत होते.
गेल्या अठरा वर्षांच्या प्रवासात शेतकऱ्यांसाठी लढणारे, त्याला प्रबोधनाची जोड देणारे देशातील एकमेव वृत्तपत्र असा लौकिक ‘ॲग्रोवन’ने कमावला आहे. मुद्रित माध्यमाच्या सीमा ओलांडून ‘सकाळ माध्यम समूहा’चे हे व्यासपीठ डिजिटल क्षेत्रातही भरारी घेते आहे. वाचकांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी यापुढेही ‘ॲग्रोवन’चा चमू मनोभावे कार्यरत राहील.
- आदिनाथ चव्हाण, संपादक संचालक, सकाळ ॲग्रोवन
आम्ही शेतीविषयी निर्णयक्षम आणि विश्लेषणात्मक माहिती देण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांची या पुरस्काराच्या माध्यमातून दखल घेतली गेली, याचा आनंद वाटतो. आम्ही देत असलेल्या आशयाच्या गुणवत्तेवर यामुळे मोहोर उमटली आहे.
- स्वप्नील मालपाठक, सकाळ मीडिया डिजिटल हेड
पॉडकास्ट म्हणजे काय?
एखादी माहिती ध्वनी (ऑडिओ) स्वरूपात रेकॉर्ड करून किंवा लाइव्ह ऐकवणे, याला पॉडकास्ट म्हणतात. अमेरिका, इंग्लंड यांसारख्या देशांमध्ये हे माध्यम अत्यंत लोकप्रिय असून, गेल्या काही वर्षांत भारतातही या माध्यमाने चांगलेच बाळसे धरले आहे. ‘अॅग्रोवन’चे शेतमार्केट हे पॉडकास्ट अॅग्रोवनची वेबसाइट, यू-ट्यूब चॅनेल, फेसबुक पेज आणि इतर व्यावसायिक मंचांवर उपलब्ध आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.