
Kolhapur News : अलीकडच्या काळात मुलांची वेळेत लग्न होणे ही एक मोठी कामगिरी समजली जात आहे. एखादा अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर असेल तर त्यांचे लग्न जमविणे म्हणजे महाकठीण काम. हेच काम सोपे करून दाखवले हेरवाड (ता. शिरोळ) येथील संबंधित युवकाच्या भावकीने आणि ग्रामस्थांनी लग्नासाठी चक्क वर्गणी काढली.
केवळ दहा गुंठे क्षेत्र असणाऱ्या अल्पभूधारक शेतमजूर संतोष देबाजे याचा विवाह लावून देत भावकी व ग्रामस्थांनी आपले कर्तव्य निभावले. अनेकदा भावकीतले वाद लग्न मोडण्यासाठी कारणीभूत ठरत असतात. इथे मात्र भावकीनेच लग्नासाठी स्वतः वर्गणी काढलीच याबरोबरच गावातील दानशूर व्यक्तींनाही साद घालत त्यांच्या सहकार्याने लग्न लावून दिले.
संतोष देबाजे हा अशिक्षित तरुण. लहानपणीच वडिलांचे छत्र हरविले, यातच आजारी आई त्यामुळे दोन वेळच्या जेवणाचे वांदे, आजारी आई असल्याने तिला सांभाळण्यासाठी आणि कुटुंबाचा गाडा पुढे नेण्यासाठी लग्न केल्याशिवाय त्याला पर्याय नव्हता. त्यामुळे कर्नाटक राज्यातील पाहुण्यांनी त्याच्या या परिस्थितीकडे पाहून आपली मुलगी देण्याचा धाडसी निर्णय घेतला.
पण आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे लग्न सोहळा कसा पार पाडायचा, हा प्रश्न उभा राहिला. यावेळी नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सुनील देबाजे व सुभाष देबाजे यांनी काहीही करून हा लग्न सोहळा पार पाडण्याचा निर्णय घेतला. देबाजे भावकीतील सुमारे पंधरा घरे यासाठी पुढे आली. त्यांनी वर्गणी काढली. पण एवढ्याने पुरे होणार नव्हते. केले तर चांगलेच लग्न करायचे असा निर्धार भावकीचा होता.
देबाजे यांच्या भावकीतील ही एकी नक्कीच प्रेरणादायी होती. त्यांच्या या प्रयत्नाला ग्रामस्थांनीही प्रतिसाद दिला. गावातील दानशूर व्यक्तींनीही आपला सहभाग नोंदवून मदतीचा हात पुढे केला. बघता-बघता संतोष देबाजे आणि कर्नाटक राज्यातील रेणू गोरजे यांच्या विवाह सोहळा थाटामाटात झाला.
अगदी घरातील बाजारापासून ते मंडप, साउंड, पाहुण्यांचा आहेर, कपडे आणि जेवणाचे नियोजन समाजातील दानशूर व्यक्तींच्या पुढाकाराने झाले. इतकेच नव्हे तर नवदांपत्याला विवाहानंतर लगेच मजुरीचा जायला लागू नये यासाठी पुढील काही महिन्याचे किराणा साहित्य ही भरून दिले.
भावकीच्या ऐकजुटीचा विजय
एकीकडे समाजामध्ये भावकीतील वाद हा प्रगतीला खो घालणारी बाब म्हणून सामोरी येते. अनेकांची ठरलेले लग्न केवळ भावकीतील वैरामुळे मोडते. सर्व काही चांगले असतानाही केवळ वाद आहे म्हणून संबंधित कुटुंबातील लग्न कार्यात अडथळा आणला जातो.
अशी प्रतिकूल परिस्थिती असताना देबाजे भावकीने घेतलेला हा निर्णय इतरांच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरला आहे. भावकीत एकी असेल तर गावकरीही एकजुटीने पुढे येतात हेच या लग्न सोहळ्याने दाखवून दिले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.