धोकादायक गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न ऐरणीवर

आंबेगाव तालुक्यातील गावांचे अद्याप पुनर्वसन नाही
धोकादायक गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न ऐरणीवर
Land SlidingAgrowon

फुलवडे, ता. आंबेगाव ः तालुक्यातील पश्‍चिम आदिवासी भागातील पोखरीअंतर्गत बेंढारवाडी, जांभोरीअंतर्गत काळवाडी नं. १ व नं. २, मेघोली, माळीणअंतर्गत पसारवाडी तसेच फुलवडेअंतर्गत भगतवाडी ही दरड प्रवण क्षेत्रातील (Landslide Area) गावे अत्यंत धोकादायक असल्याचे समोर आले आहे. तसेच, त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता, परंतु अनेक वर्षे उलटून गेल्यानंतरही अद्याप या गावांचे पुनर्वसन (Village Rehabilitation) झालेले नाही.

आंबेगाव तालुक्यातील माळीण येथे ३१ जुलै २०१४ रोजी दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत १५१ जणांचा मृत्यू झाला. गाव व वाड्यावस्त्यांवरील ७४ पैकी ४४ घरे, पुरुष, महिला, लहान मुले, गाई, म्हशी, शेळ्यांचा मातीच्या ढिगाऱ्याखाली मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर शासनाने धोकादायक गावांचे पुनर्वसन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. त्यानुसार १४०० गावांचे सर्वेक्षण करण्यात आले. हे सर्वेक्षण भूजल सर्वेक्षण आणि विकास संचालनालय (जीएसडीए), भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय) तसेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) यांच्यामार्फत करण्यात आले. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील २३ धोकादायक स्थितीत असलेल्या गावांचा अहवाल जिल्हा प्रशासनास सादर करण्यात आला.

यामध्ये आंबेगाव तालुक्यातील पोखरीअंतर्गत बेंढारवाडी, जांभोरीअंतर्गत काळवाडी नं. १, व नं. २, मेघोली, माळीणअंतर्गत पसारवाडी तसेच फुलवडेअंतर्गत भगतवाडी या अत्यंत धोकादायक गावांचे पुनर्वसन करण्याचे ठरले. पुनर्वसनासाठी काही ठिकाणी जागाही उपलब्ध झाल्या; परंतु त्या ठिकाणी अद्याप कामे झालेली नाहीत. लवकरच पावसाळा सुरू होणार असून, प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना अद्याप झाली नसल्याने या भागातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन जगावे लागते आहे. ज्या ठिकाणी जागेची सोय झालेली आहे निदान त्या ठिकाणी तरी उपाययोजना करावी, अशी मागणी काळवाडी नं. १ येथील विठ्ठल पारधी, किसन पारधी, लक्ष्मण भोकटे, रमेश पारधी, दुंदा भोकटे, मारुती पारधी, ज्ञानेश्‍वर पारधी, पुनाजी पारधी यांनी केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com