
जळगाव ः सावदा (ता. रावेर) येथील रेल्वे स्टेशनवर रासायनिक खतांच्या (Chemical Fertilizers) मालधक्क्याला अडीच वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली. पण अद्याप खंतांचा रॅक (Fertilizer Rack) रिकामा करण्याची सुविधा किंवा रॅक पॉइंट उभारलेला नाही. हा रॅक पॉइंट पुढील खरिपापूर्वी उभारला जावा, अशी मागणी खत विक्रेते, विविध संघटना करीत आहेत.
मागील वर्षी जुलै, ऑगस्ट महिन्यात रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर, भुसावळ, बोदवड या तालुक्यांत रासायनिक खतांची मोठी टंचाई निर्माण झाली होती. या खतांच्या टंचाईमधून बाहेर निघण्यासाठी सावदा रेल्वे स्टेशन येथे रासायनिक खतांचा रॅक रिकामा करण्याची सुविधा किंवा रॅक पॉइंट तयार करावा, अशी मागणी शेतकरी व खते-बियाणे विक्रेते, वितरक असोसिएशनच्या माध्यमातून जिल्हाधिकारी, रेल्वेचे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याकडे करण्यात आली होती. यानंतर रॅक पॉइंट अडीच वर्षांपूर्वी मंजूर झाला.
प्रत्यक्षात रॅक पॉइंट प्रत्यक्षात सुरू झालेला नसला तरी लोकप्रतिनिधींमध्ये यावरून श्रेयवाद मात्र सुरू झाला आहे. मागील तीन हंगाम शेतकरी या रॅक पॉइंटरवर खते मिळावीत, वॅगन थांबवावी, अशी मागणी करीत आहेत. परंतु खते उतरण्याची सुविधा अद्याप करण्यात आलेली नाही.
हा रॅक पॉइंट सुरू झाल्यास केळी पट्टा व खतांची मोठी उचल करणाऱ्या रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा, बोदवड या तालुक्यांना लाभ होईल.
जळगाव जिल्ह्यात खतांची मागणी राज्यात अधिक आहे. त्यात जळगाव जिल्ह्यात रावेर, यावल, मुक्ताईनगर या भागात खतांचा अधिक वापर केला जातो. जळगाव जिल्ह्यात खतांचा जेवढा वापर केला जातो, त्यातील ६५ टक्के खतांचा वापर एकट्या रावेर. यावल, चोपडा, मुक्ताईनगर या केळीपट्ट्यात होत आहे.
सावदा येथील रॅक पॉइंट चोपडा, रावेर, यावल, मुक्ताईनगर या तालुक्यांसाठी सोयीचा आहे. या रॅक पॉइंटवरून खतांची वेळेत ने-आण, वितरण, पुरवठा या भागात करता येईल. कृत्रीम टंचाई दूर होऊ शकेल. सध्या जळगाव येथील रॅक पॉइंटवरून या तालुक्यांमधील खत वितरक, विक्रेत्यांना खते आणावी लागतात. त्यात अधिकचा वेळ जातो. वितरण, पुरवठ्यासंबंधी अडचणी येतात.
सावदा येथे खते उतरविण्याची सुविधा अद्याप झालेली नाही. फक्त रॅक पॉइंट मंजूर झाला आहे. पण पुढे काय हा प्रश्न आहे. सावदा रॅक पॉइंट खत विक्रेते, वितरकांसह शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरू शकतो. तो लवकर सुरू व्हायला हवा.
- संतोष बेंडाळे, खत विक्रेता, न्हावी (ता. यावल, जि. जळगाव)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.