कृषी विद्यापीठांचा उपयोग काय?: नितीन गडकरी यांचा सवाल

माजी कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar) आणि गडकरी यांच्या हस्ते ज्येष्ठ कृषी अभ्यासक सुधीर भोंगळे यांना डॉ. सी. डी. मायी कृषी तज्ज्ञ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
Nitin Gadkari
Nitin GadkariAgrowon

नागपूर ः ‘‘अमेरिकेत एकरी ३० क्‍विंटल सोयाबीन (Soybean) होत असताना भारतात मात्र त्याची उत्पादकता अवघी चार क्‍विंटलची आहे. त्यामुळे कृषी विद्यापीठांचा उपयोग काय?, असा सवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी उपस्थित केला. ‘‘कोणतीच भरीव उपलब्धी नसलेल्या कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देताना विचार करावा लागेल,’’ असा मिश्‍कील टिप्पणीही त्यांनी केली.

माजी कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar) आणि गडकरी यांच्या हस्ते ज्येष्ठ कृषी अभ्यासक सुधीर भोंगळे यांना डॉ. सी. डी. मायी कृषी तज्ज्ञ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या वेळी डॉ. सी. डी. मायी, खासदार विकास महात्मे, माजी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, गिरीश गांधी, कुलगूरू डॉ. विलास भाले उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, ‘‘देशात गहू, साखर, तांदळाचे उत्पादन गरजेपेक्षा अधिक आहे. त्यामुळे पूर्व विदर्भात संपन्नता हवी असल्यास शेतकऱ्यांनी धान सोडून इतर पिकांकडे वळले पाहिजे. परंतु तसे होताना दिसत नाही. बांगलादेशची मागणी असल्याने कापसाला (Cotton) भाव मिळाला. अशाप्रकारे बाजारपेठ असलेल्या पिकांचाच पर्याय शेतकऱ्यांनी निवडावा.

देशात पाण्याची टंचाई नाही. परंतु त्याचा विनियोग योग्यरीतीने होत नाही. त्यामुळेच काही राज्यांमध्ये पाणीवाटपावरून वाद होत होते. १३ राज्यांमधील हे वाद केंद्रिय जलमंत्री असताना सोडविले. त्याच वेळी देशात ४६ नदीजोड प्रकल्पाची संकल्पना मांडली होती. त्यावर काम झाल्यास यापुढे देशात सिंचन सुविधात मोठी वाढ होत आत्महत्या नियंत्रणात येतील.

‘‘कृषी शास्त्रज्ञांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त होती. ती भरण्यासाठी डॉ. मायी यांच्या नेतृत्वात शास्त्रज्ञ निवड मंडळ स्थापन करण्यात आले. ५००० पेक्षा अधिक शास्त्रज्ञांची निवड याद्वारे केली. यातील एकाही निवड प्रक्रियेवर कोणताच आक्षेप घेण्यात आला नाही. त्यावरूनच ही प्रक्रिया किती पारदर्शक झाली, हे सिद्ध होते,’’ असेही पवार म्हणाले.

...आणि देश अन्नधान्यांत स्वयंपूर्ण

पवार म्हणाले, ‘‘केंद्रीय कृषिमंत्री आणि नागरी अन्न पुरवठामंत्री असताना अमेरिकेतून गहू आयात (Wheat Import) करावा लागणार असल्याची फाइल स्वाक्षरीसाठी आली. परंतु कृषिप्रधान देशाला ते भूषणावह नसल्याने त्यासाठी मन मानवत नव्हते. परंतु गव्हाचा साठा संपत असल्याने माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी आग्रह केला आणि फाइलवर स्वाक्षरी केली. मात्र त्यापुढील काळात उत्पादकता वाढ हे उद्दिष्ट ठेवत सर्व यंत्रणांना कामाला लावले. शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. कृषिमंत्री म्हणून पद सोडताना भारत तांदूळ उत्पादनात जगात नंबर एकवर, गव्हात क्रमांक दोन तसेच भाजीपाला आणि दूध उत्पादनातही आघाडीवर होता. हे शेतकऱ्यांच्या श्रमातून शक्‍य झाले.

‘‘ॲग्रोवन’ माझा सांगाती’

भाषणाच्या सुरुवातीलाच नितीन गडकरी यांनी ‘ॲग्रोवन’चे कौतुक केले. ‘‘मला शेतीविषयाची आवड आहे. त्यामुळेच मी रोज सकाळी ॲग्रोवन वाचतो. दिल्लीत काही महत्त्वाचे काम असल्यास सोबत ॲग्रोवन घेतो. या माध्यमातून देश आणि जागतिकस्तरावरील कृषी संशोधनाची माहिती कळते,’’ असे गडकरी म्हणाले. एका अर्थाने ॲग्रोवन माझा सांगाती असल्याचे त्यांनी सांगितले.

विदर्भात होणार ‘व्हीएसआय’ची शाखा

‘‘विदर्भात शास्त्रोक्त पद्धतीने उसाचे व्यवस्थापन व्हावे, या साठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची (व्हीएसआय) शाखा या भागात असावी, अशी मागणी शरद पवार यांच्याकडे केली होती. त्यांनी या मागणीला बळ दिले आणि लवकरच या भागात इन्स्टिट्यूटच्या कामकाजाला सुरुवात होईल,’’ असे गडकरी म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com