मॉन्सून रखडला तर देशावर काय परिणाम होईल?

भारताच्या कृषी आधारित अर्थव्यवस्थेसाठी मॉन्सूनची अनिश्चितता परवडणारी नाही. अन्न सुरक्षा विस्कळीत होऊन देशांतर्गत आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते, असं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
मॉन्सून रखडला तर देशावर काय परिणाम होईल?
Monsoon UpdateAgrowon

एप्रिलपासूनच उष्णतेच्या लाटेने देशभरातील लोकांना भाजून काढलं. याचा परिणाम रब्बी हंगामावर देखील पाहायला मिळाला. आता समोर अख्खा खरीप हंगाम आहे. शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे लागून राहिलेत. पेरण्या खोळंबल्या आहेत आणि अशातच पावसानं दडी मारलीय.

भारताच्या कृषी आधारित अर्थव्यवस्थेसाठी मॉन्सूनची अनिश्चितता परवडणारी नसून यामुळे अन्न सुरक्षा विस्कळीत होऊन देशांतर्गत आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते असं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. देशातली जवळपास निम्म्याहून अधिक जनता शेती करते. म्हणूनच भारताची अर्थव्यवस्था कृषीआधारित अर्थव्यवस्था असल्याचं म्हटलं जातं. आता ही शेतीसुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. आता या पावसाचं म्हणाल तर देशाच्या वार्षिक पर्जन्यमानाच्या सुमारे 70 टक्के पाऊस हा मान्सूनवर आधारित असतो. यातील जवळपास 60 टक्के पाऊस पेरणी क्षेत्रात पडतो.

Monsoon Update
‘नदीजोड’मुळे ‘मॉन्सून’वर विपरीत परिणाम शक्य

आता जर या क्षेत्रात पाऊस झालाचं नाही किंवा कमी पाऊस झाला, तर साहजिकच पिकांचं उत्पादन कमी होईल. आणि उत्पादन कमी असल्यावर महागाई वाढेल. रब्बीचा हंगाम सुरू असताना पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात गव्हाच्या पिकावर उष्णतेच्या लाटेचे दुष्परिणाम झाले होते. हे नुकसान काही थोडंथोडक नव्हतं. गव्हाचं उत्पादन कमी झाल्यामुळे सरकारला गव्हाची निर्यातबंदी करावी लागली.

आता खरिपाच्या सुरुवातीलाचं पावसाच्या अशा दडी मारण्याने साहजिकच पीक उत्पादन कमी होईल. याचा देशाच्या अन्नसुरक्षेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. हवामान खात्याने सलग चौथ्या वर्षी मान्सून सामान्य राहील असा अंदाज वर्तवला आहे. मात्र जूनच्या पहिल्या सहामाहीतही पावसाची वाटचाल धिम्या गतीने सुरू आहे. याचा परिणाम भात पट्ट्यात दिसायला लागला आहे. पावसाच्या वाढत्या अनिश्चिततेमुळे भातासारख्या पिकांच्या पेरणीला उशीर होण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पावसाचा वेग वाढून झालेल्या नुकसानीची कमतरता भरून निघण्याची अपेक्षा आहे.

हवामान विभागाच्या म्हणण्याला आधार काय ? तर भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितल्याप्रमाणे, "हवामानाचा अंदाज चांगला असून, यरट्या काळात पाऊस चांगलाच जोर धरेल. 11 जूनला पावसाची तूट 43 टक्के होती. ती तूट 17 जून रोजी 18 टक्क्यांवर आली आहे."

ते पुढे म्हणाले की, द्वीपकल्पीय भारत, देशाच्या पूर्व आणि मध्य भागात आणि ईशान्य भागात पाऊस सामान्य राहील. तर वायव्य भारतात 23 जूननंतर पर्जन्यवृष्टी वाढेल. पावसाच्या असमान वितरणावर महापात्रा म्हणाले की, मान्सून कधीही सर्वत्र एकसमान पावसाचं वितरण करत नाही. जर आपण अवकाशीय वितरणाकडे पाहिलं तर काही भागात कमी पाऊस पडेल. काही ठिकाणी जास्त पडेल. पण एकंदरीत पावसाचं प्रमाण सामान्य असेल आणि हवामान विभागाने तेच भाकीत केलं असल्याचं महापात्रा म्हणाले.

मान्सूनसाठी चांगली मानली जाणारी ला निना परिस्थिती हंगामाच्या शेवटपर्यंत कायम राहील. परंतु भारतातील मान्सूनच्या प्रगतीमध्ये अडथळा आणण्यासाठी ओळखल्या जाणार्‍या इंडियन ओशन डीपोल (IOD) द्वारे त्याचा सामना केला जाईल. "थोडक्यात यावर्षी मान्सून सामान्य असेल," असं ही महापात्रा म्हणाले.

Monsoon Update
शक्तिमान कोणः रिझर्व्ह बॅँक की मॉन्सून ?

आता हे झालं हवामानशास्त्र विभागाचं. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाचं पावसाच्या खराब कामगिरीवर स्कायमेट वेदर या हवामान कंपनीचं म्हणणं मात्र वेगळंच आहे. स्कायमेट वेदरचे अध्यक्ष जी. पी. शर्मा मान्सून प्रगतीवर म्हणतात की, तिसऱ्या आठवड्यात ही पावसाने दडी मारल्याने मान्सून अपेक्षेप्रमाणे कामगिरी करताना दिसत नाही.

ते पुढे म्हणतात की, शेतीच्या संदर्भात बोलायचं तर आतापर्यंत तरी पुरेसा पाऊस झालेला नाही. पावसाची मंद सुरूवात झाली आहे. परंतु हवामानशास्त्रज्ञांच्या मते ही परिस्थिती लवकरच बदलण्याची चिन्हे आहेत. पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा आणि लगतच्या बांगलादेशच्या काही भागांवर तीन ते चार दिवसांत चक्रीवादळ निर्माण होईल. ज्यामुळे गंगेच्या मैदानी प्रदेशात वाऱ्याची दिशा बदलेल असं हवामानशास्त्रज्ञांनी शुक्रवारी सांगितलं.

"हे चक्रीवादळ पूर्वेकडील सामान्य प्रवाहाला सुरुवात करेल. आणि ही परिस्थिती वायव्य भारतात मान्सूनच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल." असं ही शर्मा म्हणाले. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, शेजारील तेलंगणा, छत्तीसगड आणि झारखंडसह देशाचे मध्य भाग हे मान्सूनच्या पावसावर अवलंबून असलेले क्षेत्र आहेत. आणि म्हणूनचं हा पट्टा सर्वात असुरक्षित आहे.

शर्मा सांगतात, पंजाब आणि हरियाणातील शेतकरी पूर्णपणे मॉन्सूनवर अवलंबून नाहीत. त्यांच्याकडे त्यांची संसाधने आणि सिंचनाच्या सोयी उपलब्ध आहेत. त्यांच्याकडे विहिरी, बोअरवेल, कालवे मोठ्या प्रमाणावर आहेत. परंतु मध्य भारतात अशी परिस्थिती नाही. तेथील शेतकरी मान्सूनच्या पावसाची आतुरतेने वाट पाहतात.

महाराष्ट्राचं बोलायचं झाल्यास, कोकण किनारपट्टीपासून विदर्भापर्यंत पसरलेल हे मोठं राज्य आहे. इथल्या हवामान परिस्थितीतही विभिन्नता आढळते. साहजिकच मॉन्सूनला उशीर झाल्यास महाराष्ट्राला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. "पण ही परिस्थिती सुधारण्याची चिन्ह आहेत. हा निराशाजनक टप्पा जून महिन्यातच संपला असून पावसावर अवलंबून असलेल्या भागात चांगली कामगिरी अपेक्षित आहे." असं शर्मा म्हणाले.

Monsoon Update
मॉन्सून लांबणीवर पडल्याने भात पीक संकटात

भारतीय कृषी संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक, विनोद सहगल यांच्यामते, जूनच्या अखेरीस पावसाची तूट भरून निघेल. सहगल म्हणतात, "परिस्थिती सुधारत असून तो चांगला पाऊस होण्याची अपेक्षा आहे. जुलैमध्ये चांगला पाऊस व्हायलाच हवा. परिस्थिती इतकी चिंताजनक नाही. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मोठा पाऊस खरीप हंगामासाठी विनाशकारी मानला जातो." असं ते म्हणाले. दीर्घकाळापर्यंत उष्णतेच्या लाटेने जमिनीतील ओलावा शोषला आहे. त्यामुळे चांगला पाऊस जास्त आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. अन्नधान्याच्या महागाईला उष्णतेची लाट आणि अस्थिर जागतिक बाजारपेठ कारणीभूत आहे, असे त्यांनी सांगितले.

रशिया आणि युक्रेन ही दोन्ही राष्ट्रे मिळून जगातील एक चतुर्थांश गव्हाची निर्यात करतात. पण आता पेटलेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक स्तरावर गव्हाची मागणी वाढली. त्यातच कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या. डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाला. परिणामी बायो-इथेनॉलच्या उत्पादनासाठी अन्नधान्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसतोय. साहजिकच अन्नधान्य महागाई वाढत आहे.

अन्न आणि व्यापार धोरण तज्ज्ञ देविंदर शर्मा म्हणाले की, उष्णतेच्या प्राणघातक लाटेचा परिणाम यावर्षीच्या गव्हाच्या उत्पादनावर झाला आहेचं. पण आता पुरेशा तांदूळ उत्पादनासाठी देशाला मान्सूनची गरज आहे. पंजाबमध्ये 98 टक्के पीक क्षेत्र खात्रीशीर सिंचनाखाली आहे. परंतु देशातील सर्वच प्रदेशांत ही सोय नाही, असं ते म्हणाले.

देशाच्या काही भागात पावसाची तूट 80 टक्क्यांपर्यंत वाढल्याने जूनच्या पहिल्या टप्प्यात मान्सून मंदावला. त्याचा निश्चितच उत्पादनावर परिणाम होईल, असं ही शर्मा म्हणाले.

"काही रिपोर्ट्सनुसार मान्सूनचा दुसरा टप्पा अस्थिर असेल. पुढील दोन महिन्यांत पावसाची तूट कायम राहील. त्यामुळे या मान्सूनचं यावेळचं चित्र काही खास नाही." "पावसाची तूट जुलैच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात कायम राहिल्यास, त्याचे गंभीर परिणाम होतील. अगदी स्पष्टपणे सांगायच झालंच तर, हवामानाच्या पॅटर्नमध्ये आणखी एक व्यत्यय आपल्याला परवडणारा नाही. आणि तसं जर झालंच तर आपण या हे परिणाम सहन करू शकणार नाही." असा इशारा शर्मा यांनी दिला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com