Weather Updates: पावसाचे रेड, ऑरेंज अलर्ट म्हणजे काय?

हवामान विभागाने (IMD) आज कोकणातील पालघर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट (Red Alert) जाहीर केला. तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट (Orange Alert) दिलाय.
Weather Updates, monsoon alerts meaning, Red, Orange, yellow alert meaning
Weather Updates, monsoon alerts meaning, Red, Orange, yellow alert meaning Agrowon

पुणेः राज्यात सध्या पावसानं (Rain) धुमाकुळ घातला. अनेक भागांत मागील ७ ते ८ दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. शेतीची कामे रखडली, नद्या नाल्यांना पूर आले, शहरात जनजिवन विस्कळीत झाले. त्यामुळं पावसाच्या अंदाजाकडं सर्वांचं लक्ष लागून असतं. मागील काही दिवसांपासून हवामान विभाग पावसाचे वेगवेगळे अलर्ट जाहिर करत आहे. या भागात रेड अलर्ट, त्या भागात ऑरेंज अलर्ट तर काही ठिकाणी येलो अलर्ट! पण कोणत्या अलर्टचा नेमका अर्थ काय? रेड अलर्ट दिला म्हणजे नेमकं काय होणार? अतिजोरदार, जोरदार तसंच मध्यम पाऊस म्हणजे नेमका किती पाऊस? हे पाहणे गरजेचे आहे.

हवामान विभागाने (IMD) आज कोकणातील पालघर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट जाहीर केला. तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिलाय. नंदूरबार, धुळे, जळगाव, नगर, औरंगाबाद, जालना, बीड, बुलडाणा, अकोला, वाशीम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत येलो अलर्ट जाहीर केला.

रेड अलर्ट म्हणजे काय होणार?

रेड अलर्ट म्हणजे नैसर्गिक आपत्तीची चेतावणी. अतिजोरदार पाऊस, ढगफुटी, अतिवृष्टी, पूर, भुस्खलन आदी मोठ्या नैसर्गिक संकटाची शक्यता असल्यास त्या भागाला रेड अलर्ट दिला जातो. विशिष्ट भागातील प्रशासनाला आपत्ती निवारणासाठी तयार राहण्याचे संकेत रेड अलर्टमधून मिळतात. जसं की सध्या हवामान विभाग राज्यातील विविध भागांत जोरदार पावसाचा रेड अलर्ट जाहीर करतंय. म्हणजेच त्या भागांमधील नागरिक आणि प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे संकेत मिळतात.

एखाद्या जिल्ह्यातील हवामान विभागाच्या निश्चित केलेल्या केंद्रांपैकी बहुतांश केंद्रांवर पाऊस पडणार असेल तर त्या जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिला जातो. म्हणजेच त्या जिल्ह्यात बहुतांश भागात अत्यंत जोरदार, अति जोरदार किंवा जोरदार पावसाचा पाऊस (Heavy Rain) पडू शकतो किंवा पावसाची तीव्रता जास्त असू शकते. परंतु पुण्याच्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट असेल तर संपूर्ण जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला असतो. परंतु प्रत्यक्षात पाऊस घाटमाथ्यावर पडणार असतो.

ऑरेंज अलर्ट म्हणजे काय?
तर पावसाचा ऑरेंज अलर्ट म्हणजे आपत्तीची येऊ शकते आणि त्यासाठी सतर्क असावे. या अपत्तीची कल्पना नागरिक आणि प्रशासनाला देण्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात येतो. यावेळी नागरिकांना महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात येतो. तर हवामान विभागाने निश्चित केलेल्या केंद्रांपैकी काही केंद्रांवर पाऊस पडणार असेल तर त्या जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला जातो. म्हणजेच त्या जिल्ह्यातील काही केंद्रांवर अत्यंत जोरदार, अति जोरदार किंवा जोरदार पाऊस पडू शकतो.

येलो अलर्ट म्हणजे काय?

तर येलो अलर्ट म्हणजे सावधगिरीचा इशारा. पुढील काळात नैसर्गिक आपत्तीची शक्यता असेल तर येलो अलर्ट देण्यात येतो. विशिष्ट भागात सावधगिरी बाळगण्यासाठी येलो अलर्ट जाहिर करतात. हवामान विभागाच्या निश्चित केलेल्या केंद्रांपैकी तूरळक केंद्रांवर पाऊस पडणार असेल तर त्या जिल्ह्यासाठी येलो अलर्ट दिला जातो. म्हणजेच तूरळक ठिकाणी अत्यंत जोरदार, अति जोरदार किंवा जोरदार पाऊस होऊ शकतो.

अत्यंत जोरदार पाऊस म्हणजे काय?
अत्यंत जोरदार पावसाचा अंदाज म्हणजे त्या जिल्ह्यात २४ तासांत २०४.४ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. किंवा होणार आहे. या प्रमाणात देशात खुपच कमी ठिकाणी पाऊस होतो. हवामान विभाग इंग्रजीमध्ये एक्सट्रीमली हेवी (Extremely heavy) अशी संज्ञा वापरते.

अति जोरदार पाऊस म्हणजे?

अति जोरदार पाऊस म्हणजे ११५.६ ते २०४.४ मिलिमीटर पाऊस. ज्या भागात या दरम्यान पाऊस झाला किंवा होणार आहे, तेथे हवामान विभाग अति जोरदार पावसाची अंदाज देते. हवामान विभाग अंदाज देताना (very heavy Rain) अशी शक्यता वर्तविते.

जोरदार पाऊस म्हणजे काय?
अंदाज देताना (heavy rain) असा उल्लेख हवामान विभाग करत असतो. एखाद्या भागात ६४.५ ते ११५.५ मिलिमीटर पावसाची शक्यता असेल, तर जोरदार पावसाचा इशारा हवामान विभाग देते. एखाद्या भागात १५.६ ते ६४.४ मिलिमीटर पावसाची शक्यता असेल तर हवामान विभाग मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करते. अंदाज देताना (Moderate rain) असा उल्लेख हवामान विभाग करते. तर १५.६ मिलिमीटरपेक्षा कमी असल्यास हलका पाऊस म्हणतात.

आता हा पावसाचा अंदाज एखाद्या उदाहरणाने समजून घेऊ… उदा. पुणे जिल्ह्यात जोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला. याचाच अर्थ असा होतो की पुणे जिल्ह्यातील बहुतांश केंद्रांवर जोरदार पाऊस होणार आहे. रेड अलर्ट अति जोरदार पावसाचा असेल तर हा पाऊस बहुतांश केंद्रांवर म्हणजेच भागात होईल. परंतु ऑरेंज अलर्ट असेल तर काही भागांत पाऊस पडेल. मग तो अंदाज अत्यंत जोरदार, अति जोरदार किंवा जोरदार पावसाचा असू शकतो. तर येलो अलर्ट दिला असेल तर तुरळक ठिकाणीच पाऊस होईल, असा अर्थ होतो.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com