
पुणेः देशात यंदा परतीचा पाऊस चांगला झाला. त्यामुळे रब्बी पेरणीसाठी (Rabi Sowing) पोषक वातावरण आहे. परिणामी यंदा रब्बीच्या पेरणीने वेग घेतला. देशातील रब्बी लागवडीचे क्षेत्र ९ डिसेंबरपर्यंत १२.२५ टक्यांनी वाढले आहे. गव्हाची पेरणी यंदा २५.४३ टक्क्यांनी आघाडीवर असून ज्वारीच्या लागवडीचा वेग गेल्यावर्षीप्रमाणेच आहे.
देशातील रब्बी पेरणी वेगाने सुरु आहे. रब्बी लागवडीसाठी पोषक वातावरण असल्याने पेरणी क्षेत्र गेल्यावर्षीपेक्षा वाढले आहे. रब्बीचा पेरा यंदा गेल्यावर्षीपेक्षा १२.२५ टक्क्यांनी अधिक आहे. आजपर्यंत म्हणजेच, ९ डिसेंबरपर्यंत देशात ५१४ लाख हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड झाली. तर मागील हंगामात याच काळतील लागवड क्षेत्र ४५८ लाख हेक्टरवर होते.
रब्बी पेरणीत भरडधान्याचा पेरा १३.५५ टक्क्यांनी अधिक झाला. आजपर्यंत ३६ लाख ३९ हजार हेक्टर क्षेत्र भरडधान्य पिकाखाली होते. ते मागीलवर्षी ३२ लाख हेक्टर होते. भरडधान्यामध्ये ज्वारीचा पेरा गेल्यावर्षीऐवढाच झाला. देशात १९.४४ लाख हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली. तर बार्लीचं क्षेत्र १२ टक्क्यांनी वाढून सहा लाख हेक्टरवर पोचले.
………….
मका पेरणीलाही गती
यंदा खरिपातील मका पिकाला पावसाचा जोरदार फटका बसला होता. त्यामुळे दर तेजीत होते. सध्या खरिपातील मक्याची बाजारात आवक होत आहे. मात्र दर हमीभावापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे मक्याचा पेराही आघाडीवर दिसत आहे. मक्याची पेरणी आत्तापर्यंत ५० टक्क्यांनी वाढलेली दिसत आहे. मागील हंगामात ९ डिसेंबरपर्यंत मक्याचे क्षेत्र ७ लाख हेक्टर होते. ते यंदा १० लाख ४८ हजार हेक्टरवर पोचले आहे.
………..
गहू आघाडीवर
देशात मागील वर्षभर गव्हाला चांगला दर मिळाला. तसेच सध्याही गव्हाचे दर तेजीत आहेत. त्यामुळे चालू रब्बी हंगामात शेतकरी गव्हाचा पेरा वाढवतील,असा अंदाज होता. त्यानुसार आतापर्यंत देशात गव्हाचा पेरा वाढला आहे. तसेच देशातील गहू टंचाई दूर करण्यासाठी सरकारही गहू लागवडीला प्रोत्साहन देताना दिसत आहे. देशातील गहू लागवड ९ डिसेंबरपर्यंत २५.४३ टक्क्यांनी वाढली. देशात आजपर्यंत जवळपास २५६ लाख हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली. मात्र मागील हंगामात याच काळातील क्षेत्र २०४ लाख हेक्टर होते.
--
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.