
Akola News : राज्यात कृषी सहायकाची पदे भरण्याबाबत १५ दिवसात कार्यवाही केली जाईल, असे विधी मंडळाच्या अधिवेशनादरम्यान कृषिमंत्र्यांनी (Abdul Sattar) स्पष्ट केले होते. मात्र, अद्यापही याबाबत काही हालचाली दिसत नसल्याने या पदांसाठीचे उमेदवार प्रतीक्षेत थांबलेले आहेत. या नोकरभरतीची (Agriculture Department Recruitment) जाहिरात कधी येईल याबाबत विचारणा करीत आहेत.
कृषी खात्यात कृषी सहायकाची नोकरभरती अनेक दिवसांपासून झालेली नसल्याने कृषी पदवीधर परीक्षार्थी चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. गेल्या काळात झालेल्या विधी मंडळाच्या अधिवेशनात विधान परिषद सदस्य आ. सतीश चव्हाण यांनी प्रश्नोत्तरामध्ये कृषी सहायक पदभरतीबाबत प्रश्न विचारला होता.
याला उत्तर देताना तेंव्हा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी १५ दिवसात जाहिरात प्रसिद्ध करू असे सांगितले होते. यानंतर आता दीड महिना लोटला आहे. अद्यापही जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही, असे कृषी परीक्षार्थी सांगत आहेत.
राज्यातील हजारो कृषी पदविका व कृषी पदवीधारक परीक्षार्थी जाहिरातीच्या प्रतिक्षेत आहेत. मंत्र्यांनी तातडीने जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत सूचना द्यावी अशी मागणी परीक्षार्थी करीत आहेत.
आधीच कृषी विभागात सहायकांची पदे रिक्त असल्याने फिल्डवर योजना राबवताना अडचणी येत आहेत. अनेक कृषी सहायकांकडे पदभारांचे ओझे वाढलेले आहे. यामुळे कार्यरत कृषी सहायकही कंटाळले. तर दुसरीकडे नोकर भरती झालेली नसल्याने या परीक्षेसाठी तयारी करीत असलेले परीक्षार्थी प्रतिक्षा करून थकले आहेत.
पदभरतीसाठी सातत्याने मागणी तसेच पाठपुरावा केला जात आहे. विधी मंडळ अधिवेशनात मंत्र्यांनी १५ दिवसात जाहिरात निघेल असे स्पष्ट केल्यानंतर या परीक्षार्थ्यांमध्ये एकच आनंदाचे वातावरण बनले होते. दरम्यानच्या काळात परीक्षार्थी दररोज जाहिरातीची प्रतीक्षा करीत राहिले.
मात्र, अद्यापही जाहिरातीचा पत्ता नसल्याने पदभरतीचे घोडे नेमके कुठे अडले याचीच चर्चा आता त्यांच्यात होत आहे.याबाबत कुठल्याही स्तरावर परीक्षार्थ्यांना स्पष्टीकरणही मिळत नसल्याने गोची आणखी वाढलेली आहे. तातडीने पदभरती व्हावी यासाठी हे उमेदवार मागणी करीत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.