
Nashik News चांदवड, जि. नाशिक : आम्ही आता जगावं की नाही, शासन जगूही देत नाही अन् मरूही देत नाही. द्राक्षांना भाव नाही, व्यापारीही घेत नाहीत, म्हणून मुंबईत थेट ग्राहकांना द्राक्षे (Grape) विकण्याचा प्रयत्न केला असता मुंबई महापालिकेचे अधिकारी ती विकूही देत नाहीत. आमचे असे हाल का, असा उद्विग्न सवाल करीत दरसवाडी (ता. चांदवड) येथील शेतकरी गोविंद डोंगरे (Nashik Farmer News) यांना रडू कोसळले.
मुंबई महानगर पालिका कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पाच ते सहा कॅरेट द्राक्षांचेही नुकसान केले व रस्त्यावर विक्रीही करू दिले नाही. मग सरकारची ‘शेतकरी ते थेट ग्राहक’ही संकल्पना कुठं गेली, महापालिकेला ती माहिती नाही का, असे प्रश्नही शेतकऱ्याने उपस्थित केले आहेत.
याबाबत माहिती अशी, की गोविंद डोंगरे व त्यांच्या भावाची दरसवाडी येथे दोन एकर द्राक्ष बाग आहे. मात्र व्यापारी २३ रुपये किलोने द्राक्षे मागत होते. त्यामुळे त्यांनी बुधवारी (ता. ८) माल खुडून ५० क्रेट द्राक्षे मुंबईमध्ये विक्रीसाठी नेली.
नवी मुंबईतील घनसोली परिसरात रस्त्याच्या कडेला थांबून ५० रुपये प्रतिकिलो दराने दिवसभर काही द्राक्षे विकली. मात्र काही माल उरल्याने ते रात्री मुंबईतच थांबले. गुरुवारी (ता. ९) सकाळी ६ वाजता ते द्राक्ष विक्रीसाठी रस्त्यावर थांबले. सकाळी दोन-तीन कॅरेट द्राक्षांची विक्रीही झाली.
मात्र येथे नवी मुंबई महापालिकेच्या वॉर्ड अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना द्राक्ष विक्री करण्यापासून रोखत हुज्जत घातली. माल उचलताना द्राक्षांचे नुकसान झाले. त्यांच्या वाहनाला त्यांनी जॅमर लावले. त्यानंतर वॉर्ड कार्यालयात बोलावून दंड भरण्यास सांगून मानसिक त्रास देण्यात आला.
हतबल झालेल्या शेतकऱ्याने हा घडलेला प्रकार प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर व सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर कांगुणे यांना कळविला. त्यावर या दोघांनी त्यांना धीर देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नितीन लालसरे यांना प्रकार कळविला.
त्यावर त्यांनी तत्काळ दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना समज देऊन शेतकऱ्यांना सहकार्य करावे असे सांगितले. त्यानंतर गाडीला बसविलेले जॅमर काढले गेले आणि शेतकऱ्याने परतीचा मार्ग धरला.
मुंबईतील अधिकाऱ्यांनी आम्हाला द्राक्ष विक्री करू दिली नाही. आमचे काय चुकले? आज मला त्रास झाला, उद्या इतर शेतकऱ्यांना असाच त्रास देतील. मग आम्ही काय करायचे, यावर ठोस उपाययोजना व्हायला हवी. आमचा शेतीमाल आम्हाला कुठेही विक्री करू द्यावा.
- गोविंद डोंगरे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, दरसवाडी
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.