‘पैलवान’ यांनी केले विधवा प्रथेला ‘चितपट’

दोन मुलांसह आयुष्य सुंदर चाललेलं. मुलांना मोठं करत चौकोनी आयुष्य जगत असतानाच कोरोनानं दृष्ट लावली. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ‘सौभाग्य’ हरवलं. अवघ्या पस्तिशीत कपाळावरची टिकली आणि मंगळसूत्राची साथ तुटली.
Widow Tradition
Widow TraditionAgrowon

कोल्हापूर : दोन मुलांसह आयुष्य सुंदर चाललेलं. मुलांना मोठं करत चौकोनी आयुष्य जगत असतानाच कोरोनानं दृष्ट लावली. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ‘सौभाग्य’ हरवलं. अवघ्या पस्तिशीत कपाळावरची टिकली आणि मंगळसूत्राची साथ तुटली.

कोल्हापूर जिल्ह्यातील अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील अंजली पैलवान यांची ही कहाणी. मात्र त्यांच्या या प्रथेविरोधातील संघर्षामुळे हेरवाड गावाने विधवा प्रथा बंद करून एक आदर्श निर्माण केला आहे. या पार्श्‍वभूमीवर वैधव्याचे प्रत्यक्ष भोग भोगलेल्या अंजलीताई व्यक्त झाल्या.

या प्रथेच्या विरोधात स्वतः पुढाकार घेऊन त्या लढल्या आणि सन्मान परत मिळवला. त्यांची संघर्षमय वाटचाल त्यांनी कथन केली. पतीचे निधन झाल्यानंतर दोन दिवस सोबत असणाऱ्या स्त्रियांनी दिवस कार्य करतेवेळी मंगळसूत्रा बरोबरच पायातील जोडवी ही अक्षरशः ओरबाडून काढली. जीव कासावीस झाला. जोडवी, मंगळसूत्राबरोबरच प्रतिष्ठाही धूसर झाली.

ज्या आया बाया येता-जाता बोलवायच्या. कार्यक्रमात सहभागी करून घ्यायच्या त्या आयाबायांनी अक्षरश: पाठ फिरवली. कौतुकाचे बोल हिणकस नजरेत बदलले. स्वतःचे अस्तित्वच नसल्यासारखे झाले. कुणाच्या नजरेला पडायचे नाही, कुठल्या कार्यक्रमात जायचे नाही, अथवा त्याच्या आसपासही फिरकायचे नाही. अगदी जवळच्या लोकांकडूनही निर्बंध लादले गेले. केवळ मुलांसाठी जगायचं. मंगळसूत्राविना गळा म्हणजे ‘गिधाडांचे खाद्यच’. अशा नजरांपासून दूर राहत एकाकी जीवन कंठायचे म्हणजे अग्निदिव्य. पूर्ण आयुष्य समाजाला घाबरूनच काढायचे?.. स्वतःचा अपराध नसताना का म्हणून मान खाली घालायची?...

ठरले... कुणी काहीही म्हणो, अडथळे आणो, अथवा हेटाळणी करो. आपल्याला हवे तसे जगायचे. विचार बदलला. मृदू, सोशिक मन खंबीर झाले. ज्या समाजामध्ये पती निधनानंतर मंगळसूत्र व टिकलीकडे बघण्याचाही गुन्हा होता. त्याच्या विरोधातच आव्हान स्वीकारले.

ओरबाडून काढलेली आभूषणे पुन्हा सन्मानाने परिधान केली. आत्मविश्‍वास वाढला. कुणीही हेटाळले नाही किंवा कुणी विचारलेही नाही. उलट सन्मान वाढला. धाडसी पावलाला ही मूक संमतीच होती. दोन वर्षे कधीच वाढदिवस साजरा केला नव्हता. तो चक्क ग्रामपंचायतीत साजरा केला.

प्रवास इतर महिलांसाठी प्रेरणादायी

जुन्या प्रथेला आव्हान देऊन आयुष्याला नवी उभारी मिळाली. आता कुठल्याही कार्यक्रमात सन्मानाने जाते. सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेते. अकाली वैधव्याचा डाग पुसून गेलाय. त्यांचे आडनाव ‘पैलवान’, अगदी पैलवानाप्रमाणेच त्या लढल्या. केवळ लढल्याच नाहीत तर या प्रथेरूपी तुल्यबळ प्रतिस्पर्ध्याला संघर्षपूर्ण लढतीत ‘चितपट’ केले. हा प्रवास निश्‍चितपणे इतर महिलांसाठी प्रेरणादायी असाच आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com