
पुणे ः जुन्नरच्या बिबट्या सफारीचा (Leopard Safari) सविस्तर प्रकल्प अहवाल १५ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी वन विभागाला (Forest Department) दिल्या आहेत. यामुळे बिबट सफारीची भेट जुन्नरवासीयांना शिवजयंतीच्या निमित्ताने मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जुन्नरच्या बिबट्या सफारीबाबत नुकतीच वनमंत्री मुनगंटीवर यांनी मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीला शिवसेना (शिंदे गटाचे) उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे उपस्थित होते.
पर्यटन केंद्र निर्माण करण्यासाठी शिवसेना भाजप युतीमधील तत्कालीन वनमत्र्यांनी जुन्नरला बिबट्या सफारीची घोषणा केली होती. त्यानंतर सत्तेत आलेल्या ठाकरे-पवार सरकारमधील अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांनी बिबट्या सफारी बारामतीला प्रस्तावित करून अर्थसंकल्पात ६० कोटींची तरतूद केली होती.
या तरतुदीमुळे जुन्नरची बिबट्या सफारी बारामतीला पळविल्याचा आरोप करण्यात आला होता. ठाकरे सरकारचे नेते, माजी आमदार शरद सोनवणे यांनी उपोषण केले होते. या उपोषणाला मोठा जनाधार मिळाल्याने, अखेर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जुन्नरला बिबट्या सफारी करण्याचे आश्वस्त केले.
दरम्यान, पुन्हा एकदा सत्तांतर होऊन, शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर आढळराव पाटील आणि शरद सोनवणे यांनी शिंदे गटात जात, बिबट्या सफारीसह विविध विकासकामे पुन्हा खेचून आणली. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी बिबट्या सफारीबाबत बैठक घेऊन, बारामतीची बिबट्या सफारी रद्द करत, जुन्नरला सफारी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी (ता.१३) झालेल्या बैठकीत सविस्तर प्रकल्प अहवाल १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अंतिम करण्याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
आंतरराष्ट्रीय बिबट्या सफारी आंबेगव्हाण येथेच
दरम्यान, बिबट्या सफारी आंबेगव्हाण, खानापूर, की नारायणगड परिसरात होणार याकडे देखील नागरिकांचे लक्ष लागले होते. मात्र बिबट्या सफारी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हायची असेल, तर त्यासाठी आंबेगव्हाणचा नैसर्गिक अधिवास योग्य असून, केनिया ऑस्ट्रेलियांसारख्या देशांतील सल्लागाराची नियुक्ती करत, सफारी आंतरराष्ट्रीय दर्जाची करावी, अशी मागणी सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेच्या वतीने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे प्रत्यक्ष भेटीत निवेदनाद्वारे केली होती.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.