
मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे, ज्यांना मी ते पद सांभाळायला पात्र नाही असे वाटते त्यांनी मला हे समोर येऊन सांगावे, मी हे पद सोडायला तयार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये स्पष्ट केले.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार दोन्ही अडचणीत सापडले आहे. दरम्यान शिवसेनेचे अनेक आमदार शिंदे यांच्या गोटात सामिल झाले आहेत. यादरम्यान शिवसेनेचे सर्वेसर्वा आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.
ज्या बंडखोरांना मी या पदासाठी नालायक वाटतो, त्यांनी मला समोर येऊन सांगावे, मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे. त्यासाठी सुरतमध्ये जाण्याची गरज नाही. अगदी तुम्हाला समोर यायला संकोच वाटत असेल, तर तसा फोन करावा, फोनवरून बोलावे, मी हे पद सोडायला तयार आहे. मला पदाचा मोह नाही, मी पदाला चिकटून राहणारा व्यक्ती नाही, असे सांगताना ठाकरे यांनी, माझ्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर मला आनंद होईल, असेही म्हटले.
माझ्याच लोकांकडून माझ्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे, हे खूप वाईट, धक्कादायक आहे. एका आमदारानेही मला समोर येऊन सांगितले तर मी राजीनामा द्यायला तयार असल्याचे सांगताना ठाकरे यांनी कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ठरत असल्याचा दाखला दिला. मी राजीनाम्याचे पत्र तयार करून ठेवतो आहे, ज्यांना मी या पदावर नको आहे त्यांनी इथे माझ्या राजीनाम्याचे पत्र राज्यपालांकडे नेऊन द्यावे.
या संवादात ठाकरे यांनी सरकारने कोरोना महामारीच्या काळात केलेल्या कामाचा उल्लेख केला. कुठलाही प्रशासकीय अनुभव नसताना मी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालो. महाविकास आघाडीत सहभागी होण्याबाबतची बोलणी झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी माझ्यावर ही जबाबदारी सोपवली. मी इच्छेपेक्षा जिद्दीने आव्हाने पेलणारा माणूस आहे. पदे येतात अन जातात, मात्र गेल्या अडीच वर्षात सर्वसामान्य जनतेचे जे प्रेम, पाठींबा मला मिळाली ती आपल्यासाठी सर्वात महत्वाची कमाई ठरल्याचेही ठाकरे म्हणाले.
सध्या काही आमदार शिवसेना पूर्वीसारखी राहिली नाही, ती बाळासाहेबांची राहिली नाही, असे सांगत आहेत. पण शिवसेना तीच आहे. तिने हिंदुत्व सोडलेले नाही. स्वतंत्र लढलो त्यावेळीही शिवसेना तीच होती. महाविकास आघाडीत सहभागी झाल्यानंतर ज्यांना पदे मिळाली, त्यांना त्याच शिवसेनेमुळे पदे मिळाली आहेत, हे लक्षात घ्यावे. मी त्यांना आपला मानतो, ते मला आपले मानतात का, ते माहीत नसल्याचेही ठाकरे यांनी नमूद केले.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या ट्विटमुळे विधानसभा बरखास्त होणार का? अशी चर्चा सुरु होती. दरम्यान या घडामोडीबद्दल मुख्यमंत्री ठाकरे (Uddhav Thackeray) काय बोलतात, याकडे सर्वांचेच लक्ष होते. ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार, अशीही चर्चा सुरु होती. तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांच्याकडून संख्याबळाचा दाखला दिला जात असताना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा हा निर्णय सर्वस्वी ठाकरे यांचाच असेल, असे स्पष्ट केले होते. आता मुख्यमंत्री ठाकरे यांच्या फेसबुक लाईव्हननंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.