Agriculture Export : हातकणंगलेत ‘ड्रायपोर्ट’ उभारू

कोल्हापूर, सांगलीसह देशभरातील कृषी मालाच्या निर्यातीसाठी हातकणंगले येथे ‘ड्राय पोर्ट’ उभारू. येथे रेल्वेची सुविधा उपलब्ध करून देऊ.
Nitin Gadkari
Nitin GadkariAgrowon

शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर ः कोल्हापूर, सांगलीसह देशभरातील कृषी मालाच्या निर्यातीसाठी (Agriculture Export) हातकणंगले येथे ‘ड्राय पोर्ट’ (Dry Port) उभारू. येथे रेल्वेची सुविधा उपलब्ध करून देऊ.

त्यासाठी राज्य शासनाने जमीन उपलब्ध करून द्यावी. येथून जगभरात कृषी मालाची निर्यात करता येईल. तसेच राष्ट्रीय महामार्गांतर्गत असणाऱ्या रस्त्यांच्या विकासासाठीही निधी उपलब्ध करून देऊ.

Nitin Gadkari
Agricultural Export : निर्यातवाढ होण्यासाठी प्रत्येक घटकाने प्रयत्न करावे : रामामूर्ती

सांगली-कोल्हापूर महामार्गाचे काँक्रिटीकरण लवकरच करणार असून, या रस्त्यावर पुढील ५० वर्षे या रस्त्यावर एकही खड्डा पडणार नाही. राष्ट्रीय महामार्गावरील सातारा, कागल या अंतराचे सहा पदरीकरणही लवकरच सुरू होईल, असे आश्‍वासन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी येथे दिले.

नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावरील ‘आंबा ते पैजारवाडी आणि पैजारवाडी ते चोकाक’ या पॅकेजचे भूमिपूजन श्री. गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शहरात प्रवेश करण्याच्या बास्केट ब्रीजची पायाभरणीही डिजिटल कळ दाबून त्यांनी केली. या वेळी ते बोलत होते.

Nitin Gadkari
Agriculture Export : शेतीमाल निर्यातीत नेतृत्वाची संधी

श्री. गडकरी म्हणाले, ‘‘कोल्हापूर जिल्हा हा नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध आहे. येथे औद्योगीकरणही झाले आहे. त्यामुळे आता शहरासह जिल्ह्याच्या विकासाचा पुढचा टप्पा सुरू झाला पाहिजे. हातकणंगले तालुक्यात राज्य सरकारने जमीन उपलब्ध करून दिली, तर इथे ड्रायपोर्ट विकसित करता येईल.

याठिकाणी रेल्वेची सेवा सुरू करता येईल. कृषी माल सुरक्षित साठवण्यासाठी अत्याधुनिक गोदामे असतील. देशभरातून कृषी माल येथे येईल. इथून हवाई मार्गाने तो परदेशात निर्यात करता येईल. कोल्हापुरातील साखरही याच पद्धतीने निर्यात करता येईल.

अशाच प्रकारचा ड्रायपोर्ट आम्ही वर्धा येथे बनवला आहे. हातकणंगले तालुक्यात लॉजिस्टिक पार्कही उभारले जाणार आहे. भविष्यात ऑटोमोबाईल आणि ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे. ट्रॅक्टरचे पार्ट कोल्हापुरात होतात मग ट्रॅक्टर का बनत नाही? भविष्यात पुणे आणि मुंबईनंतरची गुंतवणूक कोल्हापुरात आली पाहिजे.

इथे नवे उद्योग उभारले पाहिजेत. साखर कारखान्यांनी आता इथेनॉल, हायड्रोजन बनवले पाहिजे. यातून शेतकऱ्यांनाही जादा पैसे देता येतील. सर्व सोयी, सुविधांनी युक्त आणि प्रदूषणमुक्त शहराची निर्मिती स्मार्ट सिटीअंतर्गत झाली पाहिजे. बास्केट ब्रिजमुळे कोल्हापूर शहराला कधीच पुराचा फटका बसणार नाही.’’

या वेळी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार धनंजय महाडीक, संजय मंडलिक, धैर्यशील माने, संजयकाका पाटील, आमदार प्रकाश आवाडे, पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडीक, माजी आमदार अमल महाडीक, शौमिका महाडीक, प्रा. जयंत पाटील, जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, माजी नगरसेवक सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com