
जैविक खते शेतीसाठी उपयुक्त आहेत. जैविक खतांचा (Biofertilizers) वापर वाढवल्यास जमिनीचे आरोग्य सुधारते. युरियाचा (Urea) अति वापर कमी करून त्यासोबत जैविक खतांचा वापर वाढवावा, अशी कृषितज्ज्ञांची शिफारस आहे.
त्यामुळे युरियासोबत जैविक खतांची सक्ती करावी, असा विचार सरकारी पातळीवर सुरू होता. परंतु सक्तीच्या मुद्यावर सरकारने आता एक पाऊल मागे घेतले आहे.
युरियासोबत जैविक खतांचा वापर बंधनकारक करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, अशी माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली.
परंतु सर्व पिकांमध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी तसेच सेंद्रिय शेतीसाठी जैविक खतांचा वापर करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
काही वर्षांपूर्वी सरकारने स्फुरद, पालाशयुक्त खतांवरील अनुदान कमी केले. मात्र नत्रयुक्त खतांचे अनुदान कमी केले नव्हते. त्यामुळे इतर खतांच्या तुलनेत युरिया स्वस्त मिळतो.
त्यामुळे युरियाचा वारेमाप वापर केला जातो. त्याचा जमिनीच्या आरोग्यावर परिणाम होतो.
जैविक खतांचा फायदा काय?
जैविक खतांमुळे पिकांच्या उत्पादनात १० ते २५ टक्यापर्यंत वाढ होऊ शकते. जैविक खतांचा वापर केल्यास रासायनिक खतांवरिल खर्च २० ते २५ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी जैविक खतांचा वापर करण्याची गरज आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.
रासायनिक खतांचा असंतुलित आणि अतिरेकी वापर टाळून एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्याचा सल्ला तज्ज्ञ देत असतात.
पिकांच्या वाढीसाठी विविध अन्नद्रव्यांची आवश्यकता भासते. त्याची पूर्तता करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची सेंद्रिय आणि रासायनिक खते वापरली जातात.
जैविक खतांमध्ये सुक्ष्मजीव असतात. ते पिकाला जमिन व हवेतून उपलब्ध न होणारे पोषक घटक उपलब्ध करुन देण्याच काम करतात.
भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून (आयसीएआर) ऑल इंडिया नेटवर्क प्रोजेक्ट ऑन सॉइल बायो डायव्हर्सिटी अॅन्ड बायो फर्टीलायझर्स हा संशोधन प्रकल्प राबवला जातो.
त्यामध्ये विविध पिकांसाठी मातीच्या प्रकारानूसार विविध जैविक खतांचे सुधारित आणि कार्यक्षम प्रकार विकसित करण्यात आले आहेत.
जैविक खतांचे प्रकार
रायझोबियम, अॅझोटोबॅक्टर, अझोस्पिरिलम, स्फुरद विरघळविणारे जिवाणू, मायकोरायझल जीवाणूसंवर्धके, पोटॅशियम मोबिलायझिंग जैविकखते, झिंक विरघळविणारे जिवाणू,
एसीटोबॅक्टर, कॅरियर बेस्ड कन्सोर्टिया, लिक्विड कंसोर्टिया आणि फॉस्फेट विरघळविणारी बुरीशीजन्य जिवाणू खते ही ११ प्रकारची जैविक खते पिकांसाठी वापरण्याची शिफारस करण्यात आलेली आहे.
खत नियंत्रण आदेश ११ मध्ये या जैविक खतांचा समावेश करण्यात आला आहे. या जैविक खतांच्या गुणवत्तेचे निकष एफसीओ, १९८५ अन्वये निश्चित करण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांनी जमिनीच्या सुपीकतेसाठी जैविक खतांचा वापर करावा, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.