कृषी विकासाशिवाय देश आत्मनिर्भर होणार नाही

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी; राज्यस्तरीय साखर परिषद सुरू
कृषी विकासाशिवाय देश आत्मनिर्भर होणार नाही
Sugar ConferenceAgrowon

पुणे ः “देशाची अर्थव्यवस्था (Economy) पाच ट्रिलियनपर्यंत नेण्यासाठी केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारताची (Atmnirbhar Bharat) संकल्पना स्वीकारली आहे. मात्र, कृषी व ग्रामीण भागाचा विकास (Rural Development) झाल्याशिवाय देश आत्मनिर्भर होणार नाही,” असे स्पष्ट मत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केले.

‘व्हीएसआय’ अर्थात वसंतदादा साखर इन्स्टिट्यूटने (VSI) मांजरी मुख्यालयात आयोजित केलेल्या दोन दिवसीय साखर परिषदेच्या (Sugar Conference) उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून गडकरी बोलत होते. अध्यक्षस्थानी​ माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar) होते. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील तसेच विश्वजित कदम, सतेज पाटील, शंभुराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील व हेमंत पाटील, साखर आयुक्त शेखर गायकवाड, राष्ट्रीय सहकारी कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, “आत्मनिर्भर भारताला दिशा देण्याची ताकद कृषी क्षेत्रात आहे. त्यात पुन्हा साखर उद्योगाची क्षमता मोठी आहे. शेतकऱ्यांशी निगडित मुद्दा असल्यामुळे उसाचे दर कमी होणार नाहीत. मात्र, साखरेचे दर कमी होऊ शकतात. अशावेळी कारखान्यांकडे इथेनॉल हेच प्रमुख साधन राहील. इथेनॉल हे हरित इंधन आहे. ते थेट पेट्रोलपंपांवर विकले गेल्यास शेतकऱ्यांचा फायदा होईल. त्यासाठी पुण्यात आम्ही तीन पंप सुरू करणार आहोत. शासनानेदेखील इथेनॉलचे पंप सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण २०२५ पर्यंत २० टक्के करण्याचे उद्दिष्ट केंद्राने ठेवले आहे. परंतु, त्यासाठी किमान एक हजार कोटी लिटर इथेनॉलची गरज भासेल. तितकी उत्पादन क्षमता साखर कारखान्यांमध्ये नाही. त्यामुळे कारखान्यांनी भीती न बाळगता भरपूर इथेनॉल तयार करावे. ते सर्व विकत घेण्याची हमी आम्ही देतो.”

‘‘देशात यापुढे जीवाश्म इंधनाला पर्याय म्हणून इथेनॉल, मिथेनॉल, ग्रीन हायड्रोजन, इलेक्ट्रिक ऊर्जा क्षेत्राचा विकास होईल. बदलत्या पर्यायांचा फायदा साखर उद्योगाने करून घ्यावा. त्यासाठी येणाऱ्या अडचणींसाठी माझी केंद्रीय पातळीवर सदैव मदत राहील,’’ असे आश्वासन गडकरी यांनी दिले.

साखर उद्योगाला मदत हे कर्तव्यच ः ठाकरे
​‘‘​​​ऊसतोड कामगार, शेतकरी, साखर कारखा​ने ​​​​हे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना ​देत आहेत. त्यांना मदत​ ​करणे ​शासनाचे कर्तव्यच आहे.​ ​साखर उद्योग हा ​राज्याच्या प्रगतीत मोठी भूमिका बजावतो आहे. ​त्यामुळे या उद्योगातील​ समस्यांची सोडवणूक व नियोजनासाठी सर्वांनी एकत्रित यायला हवे," असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी उदघाटनपर भाषणात केले.

​‘‘साखर कारखाने​ चांगली कामगिरी करीत असले तरी काही कारखाने​ तोट्यात ​का चालतात, तोट्यामागे व्यवस्थापनाच्या काही उणिवा आहेत का? याचा शोध घ्यावा, कारखान्यांनी तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा. ऊस पीक​ जास्तीत जास्त​ सूक्ष्म सिंचना​वर आणावे. ऊस वाह​तूक,​​ ​थकहमी ​ याबाबत ​शासनाची भूमिका सहकार्याची राहिली आहे. शेतकऱ्यां​चे हित सांभाळणारा हा उद्योग असल्याने या उद्योगातील समस्या मार्गी लागण्यासाठी यापुढेही राज्य सरकार मदतीसाठी पुढाकार घेईल,’’ अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.

साखर उद्योग विशिष्ट वळणावर ः पवार
“राज्यातील साखर कारखान्यांनी देशात अव्वल स्थान निर्माण केले आहे. त्याचे श्रेय राज्यातील सहकारी व खासगी कारखाने, उत्पादकांचा कष्टाला द्यावे लागेल. या प्रगतीचा आनंद आहे. पण तेव्हड्यावरच समाधान न मानता साखर उद्योगाला विकासाच्या दिशा शोधाव्या लागतील. साखर उद्योग विशिष्ट वळणावर आला आहे. आपल्याला आता समस्यांचे बिनचूक विश्लेषण, सूक्ष्म नियोजन करीत धोरणात्मक पावले टाकावे लागतील. त्यासाठी ही परिषद दिशादायक ठरेल,’’ असे प्रतिपादन शरद पवार यांनी केले.

‘‘देशातून यंदा साखर निर्यात १०० लाख टनापर्यंत जाईल. यात राज्याचा वाटा ५० टक्क्यांपेक्षा जास्त असेल. मात्र, निर्यातदार देश म्हणून तयार झालेली ओळख टिकवून ठेवण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. राज्यातून चालू हंगामात १३२२ लाख टन गाळप होईल. १३८ लाख टन साखर निर्मिती होईल. मात्र, आता राज्याची ऊस उत्पादकता वाढवून हेक्टरी २५० टन आणि सरासरी साखर उतारा १२.५० टक्के ठेवण्यासाठी साखर कारखान्यांना ठोस पावले उचलावी लागतील,’’ अशी सूचना पवार यांनी केली. “विदर्भात ऊसवाढीला चालना देण्यासाठी तेथे व्हीएसआयची शाखा सुरू करण्याची मागणी गडकरी यांनी केली आहे. त्याबाबत निर्णय आम्ही घेत आहोत, “ अशी घोषणा पवार यांनी केली.
---------
चौकट ः
शरद पवार यांचे साखर उद्योगाविषयीचे भाष्य ः
- ऊस उत्पादकता वाढ, साखर उतारावाढ, ऊर्जा, रसायने व उपपदार्थ निर्मिती ही भविष्याची उद्दिष्टे हवी.
- देशात ३५० लाख टन साखर तयार होईल. त्यापैकी २६५ लाख टन वापर होऊन उर्वरित शिल्लक राहील.
- ऊस तोडणी कामगार व हार्वेस्टर अभावी हंगाम लांबला. या मुद्यावर पुढे गांभिर्याने काम करावे लागेल.
- राज्य शासनाने सहवीजेची खरेदी वाढवावी. त्यासाठी नवे धोरण आखावे लागेल.
- शेतकऱ्यांना सौर ऊर्जेचे पंप उपलब्ध करून देण्यासाठी साखर कारखान्यांची मदत घ्यावी.
- इथेनॉलसाठी तेल कंपन्या व बॅंकांनी आपले दृष्टिकोन बदलावे.
- कारखान्यांनी उत्पादन खर्च कमी करावा तसेच संगणकीकरण, पर्यावरणावर लक्ष द्यावे.
- हंगाम व जातीनिहाय ऊस लागवड, बेणे बदल, जमीन सुपीकतेकडे दुर्लक्ष नको.
—-----------------
चौकट ः
मी कधीही साखर कारखाना काढणार नाही ः ठाकरे
साखर परिषदेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या अभ्यासपूर्ण भाषणाने साखर उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी चकित झाले होते. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “ साखर उद्योगाची मोठी क्षमता गडकरी यांनी आपल्या अभ्यासातून दाखवून दिली आहे. त्यांचे भाषण ऐकून आपणही एखादा साखर कारखाना काढावा, असे मला जाणवले. परंतु, मी तसे करणार नाही. कारण, मला त्यांनीच यापूर्वी एका भाषणात दिलेला सल्ला आठवला. एखाद्याला आयुष्यातून उठवायचे असेल तर त्याला साखर कारखाना काढून द्यावा, असे गडकरी म्हणाले होते. त्यामुळे मी कधीही साखर कारखाना काढणार नाही.’’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com