Bhide Controversy : पोरांनो, भिडेंच्या मागे जाण्याऐवजी पोटार्थी व्हा

पश्चिम महाराष्ट्रातील तरुणाई पुढे आज खूप प्रश्न आहेत. नोकऱ्या नाहीयेत. शेतीची वाताहत आहे. पोलिस भरती, मिलिटरी भरती ह्या पलीकडं जगण्याचा मार्ग दिसत नाहीये. कामा अभावी टोकदार दाढी वाढवून, चंद्रकोर कपाळी लावुन मोबाइलमध्ये डोके खुपसून बसलेली तरुणाई सगळीकडे दिसते.
Sambhaji Bhide
Sambhaji BhideAgrowon

नीरज हातेकर

भिडे गुरुजींचे (Sambhaji Bhide Statement) वक्तव्य निश्चितच चुकीचे आहे. भिडे गुरुजी कुठेही काहीही बोलतात. किती वेळा प्रतिसाद देणार? किती निषेध करणार? भिडे गुरुजी, अनेक मुल्ला मौलवी, ही सगळी तालिबानी माणसे. ह्यांचा काय भरवसा? पण शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान (Shiv Pratishthan Hindusthan) म्हणून भिडे गुरुजींची संघटना आहे. पश्चिम महाराष्ट्रात खुप मोठ्या संख्येने तरुण त्यांच्या सोबत आहेत. त्यांना असली वक्तव्ये पटतात का ? त्यांच्या सुद्धा विधवा आया असतीलच की. त्या माउलींना ही मुले अमंगळ, अपवित्र समजतात का? आंबा खाऊन मुलगा होतो हे त्यांना पटते का? मला नाही वाटत..

पश्चिम महाराष्ट्रातील तरुणाई पुढे आज खूप प्रश्न आहेत. नोकऱ्या नाहीयेत. शेतीची वाताहत आहे. पोलिस भरती, मिलिटरी भरती ह्या पलीकडं जगण्याचा मार्ग दिसत नाहीये. कामा अभावी टोकदार दाढी वाढवून, चंद्रकोर कपाळी लावुन मोबाइलमध्ये डोके खुपसून बसलेली तरुणाई सगळीकडे दिसते. शिवाजी महाराज आम्हांला पूज्य आहेत. शिवाजी महाराजांच्या वीरश्रीच्या कथा थोर आहेत.

पण त्या भडकपणे ऐकवून ह्या पोरांचं adernalin आधी वाढवायचं आणि मग त्यांच्या डोक्यात भलतीच गरळ ओतायची असला व्यवहार सूरू आहे. नक्की सांगतो. स्वराज्याचे तेंव्हाच शत्रु आजच्या परिस्थितीकडे पाहून खुश होत असतील. महाराष्ट्राचा पाडाव तेव्हा जमला नाही, पण आजची अवस्था पाहून तेव्हा जे शत्रूंना जमले नाही ते आज स्वतच्या हाताने महाराष्ट्रातले तरुण करुन घेत आहेत हे पाहून ते खुशच होणार.

Sambhaji Bhide
Agriculture : शेतीचे प्रश्‍न एकमेकांत गुंतलेले

तरुणांनी भविष्याकडे पाहाणे गरजेचे आहे. भूतकाळातील विभूती कडून स्फुती घ्यावी पण दृष्टी भविष्याकडे असावी. आजच्या महाराष्ट्राचे खरे गड किल्ले हे इथले तरुण आहेत. ते बुलंद तर देश बुलंद. महाराजांच्या सिंहासनासाठी बत्तीस मण सोने गोळा करण्यापेक्षा वाड्या वस्त्यांवर चांगल्या शाळा, कॉलेजे, उत्तम आरोग्य सुविधा महत्वाच्या आहेत.

आज शिव प्रतिष्ठानच्या शाखा असलेल्या तालुक्यात कित्येक शाळांमधून मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह नाहीयेत. सातवी आठवीनंतर ह्या मुली शाळा सोडतात. सिंहासनापेक्षा मुलींसाठी स्वच्छतागृह अधिक महत्त्वाचं. नवीन उद्योग काढणे, शेतीत नवीन प्रयोग करणे, तंत्रज्ञान आत्मसात करणे आणि त्याचा लोकांसाठी उपयोग करणे, हे सगळे आजचे काम आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर हेच म्हणाले असते.

Sambhaji Bhide
Agriculture University : कृषी विद्यापीठातर्फे ५० पेक्षा जास्त गावात शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम

भिडे गुरुजी म्हणतात पोटार्थी होऊ नका. मी म्हणतो पोटार्थी व्ह्या. शिका, चांगली नोकरी मिळवा, चांगले धंदे काढा. स्वतः च घर स्थिरस्थावर करा, इतर चार जणांना सुद्धा पुढे आणा.शेवटी आपल्याला छत्रपती शिवाजमहाराजांच्या मार्गावर चालायचे असेल तर भविष्याकडे गेले पाहिजे. वेगळा विचार केला पाहिजे.

भाले, बरच्या, तलवारी, ज्योत घेऊन धावणे हे श्रद्धा म्हणून ठीक आहे, पण पुढे घेऊन जाणार नाहीत. मात्र महाराष्ट्राचा नायनाट करायला आलेल्या औरंगझेब बादशहाच्या दिशेने जायचे असेल तर भिडे गुरुजी आणि तत्सम तालिबानी आहेतच. दगडा मातीचे गड किल्ले कालबाह्य होऊन अडीचशे वर्ष झालीत. आजच्या लढाईत तंत्रज्ञान, आर्टिफिशियल intelligence, जैविक हत्यारे महत्वाची. भाले बरच्या घेऊन युद्ध आता होत नाहीत.

युद्ध जिंकण्यासाठी आता आधुनिक विज्ञान आणि बक्कळ पैसा लागतो. सुदृढ अर्थव्यवस्था लागते. म्हणून माणसात गुंतवणूक करावी लागते. आजच्या काळचे गड किल्ले म्हणजे आजची तरुणाई. त्यांनी स्वतःला बुलंद करावे. चांगले शिकावे. जगातल्या नवनवीन गोष्टी आत्मसात कराव्यात. व्यवस्थित पोटार्थी व्हावे.

चांगली नोकरी करावी, उत्तम धंदे काढावेत .स्वतःला, स्वतःच्या कुटुंबाला सुस्थिर करावे. ते करतांना जमेल तितक्या मागे पडलेल्या लोकांना हात द्यावा, वर ओढून घ्यावे. विषमता, जातीय, धार्मिक आंधळेपणा, अन्याय ह्या विरूद्ध आवाज उठवावा. आपला खांदा कुणाला बंदूक ठेवायला देउ नये. नुसत्या घोषणा करणाऱ्यांचे दुकान ओळखावे आणि त्यांना पळवून लावावे. खऱ्या राष्ट्र निर्मितीचा हाच मार्ग आहे. नुसतेच भूतकाळाकडे डोळे लावून बसणे निव्वळ गाढवपणा आहे. भूतकाळात फक्त भुतेच रहातात.

एकलव्य म्हणून एक initiative आहे. पहिल्यांदाच शाळा कॉलेज बघितलेली एक पिढी पुढे येतेय. ही मुले मुली मागे सुटून गेलेल्या समुहातील, भटके, आदिवासीं वगैरे असतात. पदवीपर्यंत त्यांचा प्रवास खूप खडतर असतो. पण प्रचंड चिकाटी, मेहनत घेण्याची तयारी, आशावाद, ह्याच्या जोरावर हि मुले इथपर्यंत पोचलेली असतात. पण पुढे काय करायचे ह्याचे मार्गदर्शन नसते. एकलव्य ती त्रुटी भरून काढते.

ही संस्था चालविणारी मुलेसुद्धा अशीच पहिल्या पिढीतली आहेत. एकलव्यच्या प्रयत्ना मुळे खुप मुलं मुली उत्तम उच्च शिक्षणं संस्थातून प्रवेश घेऊन शिकताहेत, परदेशात सुद्धा जात आहेत. चांगल्या नोकऱ्या मिळवून सुस्थितीत येऊन बाकीच्यांना पण हात देताहेत. आमच्या विद्यापिठात सुद्धा एकलव्यच्या मुला-मुलींचा मोठा समूह आहे. हेच खरं राष्ट्र निर्मितीचे काम आहे. ह्यातूनच देश आणि समाज मजबूत होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात तर ह्याची खूपच गरज आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com