उत्पादनवाढीचा उद्देश बाळगतानाच जमीन सुपीकतेवरही भर हवा

उत्पादनवाढीचा उद्देश बाळगतानाच जमीन सुपीकतेवरही भर हवा
उत्पादनवाढीचा उद्देश बाळगतानाच जमीन सुपीकतेवरही भर हवा

जळगाव : शेतकरी आपल्याला अधिक उत्पादन मिळावे यासाठी प्रयत्नशील असतात. त्यासाठी खते टाकतात. मोठ्या प्रमाणात मेहनत घेतात. परंतु जसे अधिक उत्पादन येण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो, तशी मेहनत जमीन सुपीकता टिकेल, वाढेल यासाठीदेखील घेतली पाहिजेत. उत्पादनवाढीसाठी खते व पाण्याचा अनियंत्रित वापर. जमिनीची धूप, वृक्ष संवर्धनाकडील दुर्लक्ष व जमिनीत पिके घेतल्यानंतर शिल्लक राहणारे अवशेष जाळण्याचे प्रकार या बाबी जमीन सुपीकता धोक्‍यात आणण्यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत, असे मत ॲग्रोवनतर्फे बुधवारी (ता. ३०) शहरात आयोजित जमीन सुपीकता चर्चासत्रात वक्ते, तज्ज्ञांनी व्यक्त केले. या चर्चासत्रात राज्याच्या कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, धुळे येथील अॅग्रोवनचे स्मार्ट सेंद्रिय शेतकरी पुरस्कारप्राप्त प्रभाकर भिला चौधरी व कोल्हापूर येथील प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर यांनी मार्गदर्शन केले. 

जमिनीत न दिसणारे कोट्यवधी सूक्ष्मजीव महत्त्वाचे - प्रताप चिपळूणकर

मी कृषी विषयातील पदवी घेतल्यानंतर १९७० मध्ये शेती करू लागलो. २० वर्षे चांगले उत्पादन आले. परंतु नंतर उत्पादन कमी झाले. त्याची कारणमिमांसा केली असता जमिनीतील सूक्ष्मजीवांचा विषय माझ्यासमोर आला. त्याचा अभ्यास मी नंतर काही वर्षे केला. शेतीकडे त्यादरम्यान दुर्लक्ष झाले. पण हा अभ्यास केल्यानंतर मी सूक्ष्मजीव संवर्धनाच्या दृष्टीने शेती करू लागलो. शेती तिच, शेती करणारा मीच, तंत्रज्ञान तेच, पिकेही तीच. पण जमिनीतील सूक्ष्मजीवांच्या संवर्धनासंबंधी कार्यवाही केल्याने उत्पादन वाढू लागले. माझ्याकडे उसाची शेती आहे. त्यात नंतर भात लागवड केली जाते.  उसाचे जे पाचट व खोड असायचे ते जमिनीत कुजविले. पाचटापेक्षा खोडे कुजविल्याने जमिनीची सुपीकता वाढते, असे लक्षात आले, असे कोल्हापूर येथील प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर म्हणाले. जमिनीत पिकांचे अवशेष कुजविणारे, पिकांना अन्नपुरवठा करणारे जीवाण असतात. जमिनीत कुजविण्याची प्रक्रिया चांगली असेल तर ती जमीन सुपीक म्हटली जाते. जमिनीत कुजविण्याची व पिके वाढण्याची प्रक्रिया ही एकाच वेळी सुरू असते. कुजण्याची प्रक्रिया शेतात कमी होणे म्हणजे जमिनीची सुपीकता ढासळली आहे, असे मानले जाते. सेंद्रिय कर्ब वाढीसाठी सोपे उपाय आहेत. आपण जी पिके घेतो, त्याचे अवशेष जमिनीला परत द्या. ते जाळू नका. मागच्या पिकाचे अवशेष, खोड म्हणचे पुढच्या पिकाचे खत असते. यामुळे जमिनीबाहेरून काहीही घटक, शेणखत न आणता जमीन सुपीकता वाढविता येते. हे प्रयोग आम्ही केले आहेत. पिकाचे खोड किंवा मुळ्यांपासून चांगले खत जमिनीला मिळते.  आपल्या भागाला अनुरूप अशी पीक पद्धती त्यासाठी असावी.  खानदेशात केळी अधिक असते. मग केळी घेतल्यावर त्यात मशागत, नांगरणी न करता कापूस, तूर घेता येईल. कापूस असेल तर त्यात मशागत न करता फक्त पऱ्हाटीच्या सरीत काड्यांचे तुकडे करून नंतर दुसरे पीक त्यात घेता येईल. पिकांची फेरपालट करा. तणांचा खत म्हणून वापर करा.  तणापासून जे सेंद्रिय घटक जमिनीला मिळतात. बाहेरून खते आणणे, मजूर लावून पशुधन पाळणे हे पुढे शक्‍य होणार नाही. आताच पशुधन पाळणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे जमिनीतून जे मिळते, त्याच अवशेष, खोडांचा वापर खत म्हणून करा. उत्पादन जसे महत्त्वाचे असते, तशी जमीन सुपीकताही महत्त्वाची आहे, हे लक्षात घ्या असेही चिपळूणकर म्हणाले. 

सेंद्रिय शेतीमुळे कुठलाही खर्च न करता उत्पादन मिळतेय - प्रभाकर चौधरी

मी २००२ पासून सेंद्रिय शेती करीत आहे. परंतु, त्यापूर्वी मी जी शेती केली त्यात रासायनिक खते व कीडनाशकांचा वापर केला. मी अगदी द्राक्षांची शेतीही केली. धुळ्यालगत वरखेडी शिवारात माझी २० एकर शेती आहे. परंतु जी शेती मी रासायनिक खतांच्या, किडनाशकांच्या वापराने करीत होतो, ती नफ्याची नव्हती. कारण मोठा खर्च येत होता. हा खर्च कसा कमी होईल, यासंबंधी मला सेंद्रिय शेतीचे धडे धुळ्यातील एका कार्यशाळेत मिळाले, असे धुळे येथील अॅग्रोवनचे स्मार्ट सेंद्रिय शेतकरी पुरस्कारप्राप्त प्रभाकर चौधरी म्हणाले. ते म्हणाले, मी सेंद्रिय शेती सुरू केली. १४ वर्षांपासून गांडूळ खत युनिट शेतात आहेत. त्यासाठी फार काही खर्च केलेला नाही. वृक्षांचे संगोपन केले असून, मोठी वृक्षराजी शेताच्या बांधावर व आवश्‍यक ठिकाणी वाढविली आहे. गिरी पुष्पाचे वृक्षही आहेत. त्याचा उपयोग सेंद्रिय खत तयार करायण्यासाठी चांगल्या प्रकारे होतो. गांडूळ खत युनिटमध्ये वृक्षांचा पाला, पाचोळा, शेण सतत टाकले जाते. शेतात जैविक कचरा अधिकाधिक कसा होईल यावर भर असतो. किडनियंत्रणासाठी दशपर्णी अर्क वापरतो. तर पिकांना खत म्हणून जीवामृत देतो. रसायनांचा कुठलाही वापर मी जमिनीत केलेला नाही. विषमुक्त अन्नधान्य निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. मला गिलके व मोगरा फुलांच्या शेतीत कुठलेही सेंद्रिय खत न टाकता उत्पादन मिळते. चार -चार महिने मोगरा व गिलक्‍यांची शेती करतो.  चांगला नफा मला या शेतीत मिळतो. शेतीमुळे माझे कुटुंब शिकून सावरून मोठे झाले आहे. उच्चशिक्षित मुला मुलींची पिढी आम्ही उभी करू शकलो. काही वेळेस गरज असली तर मी निंबोळी अर्काचा वापर करतो. इतर शेतकऱ्यांनीही सेंद्रिय शेतीची कास धरावी, असेही चौधरी म्हणाले. 

पीक उत्पादनवाढीचा हव्यास जमीन सुपीकतेला मारक - डॉ. हरिहर कौसडीकर पृथ्वीवर जैवविविधता आहे. जमिनीत सूक्ष्मजीव, हवा आदींचा समावेश आहे. त्यामुळे जमिनीला जिवंतपणा आहे. आपल्याला चांगले उत्पादन मिळते. परंतु, फक्त अधिक उत्पादन हवे, हा हव्यास वाढला आणि जमीन सुपीकतेवर परिणाम झाला, असे मत राज्याच्या कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ. हरिहर कौसडीकर यांनी व्यक्त केले. खानदेशात तापी, गिरणा खोऱ्यात जमिनीची स्थिती बरी आहे. पण मागील १० - १२ वर्षांत सेंद्रिय कर्ब कमी झाला आहे. सेंद्रिय कर्ब वाढीसाठी आपल्याला बाहेरून शेणखते व इतर घटक आणावे लागत आहेत. कापूस, सोयाबीन ही पिके आपण अधिक घेत आहोत. सोयाबीनची पेरणी मध्य प्रदेशात अधिक व्हायची. तेथे पीक फेरपालट न झाल्याने सोयाबीनचे उत्पादन एकरी चार क्विंटलवर खाली आले. नंतर सोयाबीन विदर्भाचे पीक म्हणून पुढे येऊ लागले आहे. एका उर्जेचे रुपांतर दुसऱ्या ऊर्जेत होत नाही. उत्पादन जसे आपण घेतो, ते महत्त्वाचे आपण मानतो, तशी जमिनही महत्त्वाची आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. पंजाब, हरियाणात अनेक ठिकाणी जमीन सुपीकतेकडे दुर्लक्ष झाल्याने शेती आता क्रिकेटचे मैदान झाली आहे. जेवढे वर्ष आपल्याला जमीन खराब करायला लागतात, तेवढीच वर्षे जमिनीची सुपीकता वाढवायला लागतात. जमीन सुपीक नसल्याने अन्नधान्यही निकस येत आहे. पूर्वीचे धान्य व आताचे धान्य यात फरक दिसतो. अशा सगळ्या स्थितीत शासनही जमीन सुपीकतेसंबंधी काम करीत आहे. शेतकऱ्यांना जमीन आरोग्यपत्रिका दिल्या जात आहेत. ५ डिसेंबर हा जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्याकडे जमिनीच्या किमती ठरविण्याची पद्धतही चुकीची आहे, आपल्याकडे जर जमीन महामार्गालगत, शहरालगत, मुख्य रस्त्यानजीक असली तर तिला अधिकचे दर द्यायला अनेक जण तयार असतात. परदेशात अनेक ठिकाणी जमिनीत सेंद्रिय कर्ब कसे आहे, हे लक्षात घेऊन जमिनीला भाव मिळतो. खानदेशात केळीची शेती आहे. त्यापासून जे अवशेष मिळतात, ते जमिनीला परत दिले पाहिजेत. चिकण माती, काळी माती खानदेशात चांगली आहे, तिचाही उपयोग शेतात वापरता येईल. जमिनीत एखादे अन्नद्रव्ये कमी असले तर उत्पादनावर परिणाम होतो, त्यामुळे माती परीक्षण आवश्‍यक आहे. पिकांची फेरपालट महत्त्वाची आहे. स्फूरदच्या अधिक वापराने सूक्ष्मजीवांवर परिणाम होतो. यामुळे असमतोल तयार होतो. पाणी, खतांचा अनियंत्रित वापर जमिनीला घातक आहे. कमी मशागत करावी. शेताचे पाणी, माती, पाला पाचोळा शेतातच, हे सूत्र बांधावे. कडधान्यांचा उपयोग आंतरपिकांत करावा. पिकाला वाढीच्या अवस्थेत अन्नद्रव्ये मिळाली नाहीत तर पिकावर परिणाम होतो. युरियाच्या अधिक वापराने प्रदूषण होते. जमिनीचा सामू ६.५ पर्यंत असावा, असेही कौसडीकर म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com